मनोमार्गे आकळावा श्रीपती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2020
Total Views |


Viththal_1  H x




‘विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी’ ही वारीच्या अनुपम्य सोहळ्यातील अनुभूती आजपर्यंत लाखो वारकरी मंडळींनी अनुभवली ही गोष्ट खरी. पण, आज कोरोना महामारीच्या संकटामुळे जरी प्रत्यक्ष पंढरीत जाता येत नसले तरी पंढरीत प्रत्येक वारकर्‍यांच्या मनात ‘विठूचा गजर हरिनामाचा’ सुरूच आहे. वारकरी भक्तमंडळी विठ्ठलाविषयीच्या अपारश्रद्धेने केवळ वारीतच नव्हे, सर्व जीवनभरच ही विठ्ठल गर्जना आपल्या जिव्हेवर करून आनंद सोहळा अनुभवीत असतातच! आज त्यांची परिस्थिती अशी आहे की, पाय जरी घरी असले तरी मन मात्र द्रुतगतीने पंढरीच्या वाटेवरून पंढरीकडेच अश्वगतीनेच धावत आहे, हेच खरे! इतकी वर्षे १८-२० दिवस ज्या मार्गावरून त्यांचे दिंडी-पालख्यांसमवेत जाणे आहे, तो आनंद सोहळा ते कदापिही विसरणे, शक्यच नाही. मग ते आज कुठल्या मार्गाने पंढरीत जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत? तर त्याचे यथोचित उत्तर श्री ज्ञानदेवांच्या हरिपाठातील एका प्रसिद्ध अभंगातून आपल्याला पाहायला मिळेल. कसे म्हणाल तर ‘हरिपाठ’ उघडा आणि एक अभंग पाहा. माऊली तुम्हा-आम्हाला काय सांगते. त्यांतल्या नवव्या अभंगाशी मन बुद्धी थांबते आणि तेच सुखावतात... का बरे?
 
संतांसोबत मन घ्यावे


श्री ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग असा आहे की,


संतांचे संगती मनोमार्ग गती। आकळावा श्रीपती येणे पंथे ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा राम जपा ॥२॥
एक तत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बांधिले ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली जीवन कळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लक्ष विरळा जाणे ॥६॥

या अभंगात संतांची संगती कोणती? तर दोन प्रकारची - १) सहवास, २) अभंगवाणी.


यापैकी आज सहवास घडून येत नसेल, पण त्यांची नुसती अभंगवाणी जिव्हेवर ठेवून चिंतन, स्मरण, मनन केले तरी आपण विठ्ठलचरणापर्यंत जाऊन पोहोचू आणि ‘रुप पाहाता लोचनी। सुख झाले ही साधनी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा॥’ अशी भक्ती रोमरोमांत भरून राहील. रामजप असो की नामजप असो, देव भिन्न नाही आणि नामही भिन्न नाही. सर्वांमध्ये ‘एकतत्त्वनाम’ हेच भरून राहिले आहे. वैष्णवांना विठ्ठल नामाशिवाय आणखी दुसरे काय ठाऊक आहे? नाहीच! मग देहाने उपस्थिती असो नसो, मनाने तर तिथवर नामघोष करीत पोहोचता येते ना! यंदाची ही वारी अशी मनोमार्गे जाऊन विठ्ठलभेटीची ठरणार आहे. महत्त्व आहे ते नामानुसंधानाचे आणि विठ्ठलाच्या दर्शनसुखाचे! जीव त्या योगेच धन्य होईल!


नाम हेंच सुलभ साधन


श्री ज्ञानदेवांनी अभंगाचे शेवटी बहुमोलाचा कानमंत्र दिला आहे. कोणता म्हणाल, तर विठ्ठलाला प्राप्त करून घेण्याचे एकच सहज-सुलभ साधन म्हणजे देह पंढरीत पे्रमभक्तीने विठ्ठलनामाचा गजर करणे होय! ही एक वारीच आहे. देहातल्या आत्मदेवाला नामगर्जना करून प्रदक्षिणा घालणे आणि त्याला आलिंगन देणे ही वारी करूनच आपण धन्य होऊया.
 

- प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

 
@@AUTHORINFO_V1@@