उघूरांवरील अघोरी अत्याचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2020   
Total Views |

China Muslims_1 &nbs


नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, चीनमध्ये केवळ उघूरांवरील अत्याचारच सुरु नसून, महिलांची बळजबरीने नसबंदीही केली जाते, जेणेकरुन उघूरांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल. चीनमधून हाती आलेले काही स्थानिक दस्तावेज आणि स्थानिक महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखतींच्या माध्यमातून ही माहिती समोर आल्याने चीनमध्येही एकच खळबळ उडाली.



कोरोना महामारीच्या फैलावाचे केंद्र असलेल्या चीनला सर्वतोपरी घेरण्याची जागतिक तयारी सध्या सुरु आहे. कारण, चीनचे एकट्या भारताशी नव्हे, तर आसपासच्या १५ पेक्षा जास्त देशांशी सीमाविवाद आहे. भरमसाठ जमिनीचा हव्यास, समुद्रातील वर्चस्वाची भूक चीनला अजूनही स्वस्थ बसू देत नाही. पण, आता चीनची दादागिरी सहन करायचे दिवस संपले. आता कंबोडियापासून ते केनियापर्यंत चीनच्या विरोधात वातावरण चांगलेच तापलेले दिसते. त्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांचेही चीनमधील घडामोडींकडे बारीक लक्ष आहे. आधीच चीनमधील शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांवरील अनन्वित अत्याचाराचे आरोप चीनने साफ फेटाळले आहेत. पण, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अहवालात चीनच्या उघूरांवरील क्रूरतेचा पदार्फाश झाला आहे.

 
नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, चीनमध्ये केवळ उघूरांवरील अत्याचारच सुरु नसून, महिलांची बळजबरीने नसबंदीही केली जाते, जेणेकरुन उघूरांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल. चीनमधून हाती आलेले काही स्थानिक दस्तावेज आणि स्थानिक महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखतींच्या माध्यमातून ही माहिती समोर आल्याने चीनमध्येही एकच खळबळ उडाली. पण, अपेक्षेप्रमाणे चीनने हे आरोप फेटाळूनही लावले. खरं तर उघूर मुसलमानांचा वंशसंहार करण्याचे चीनचे मनसुबे काही लपून राहिलेले नाहीत. जवळपास लाखोंच्या संख्येने उघूर मुसलमान चीनच्या कॅम्पमध्ये बंदिवान आहेत. त्यांनी इस्लाम सोडावा, निधर्मी व्हावे म्हणून हरप्रकारे त्यांचा छळ केला जातो. नोकरी आणि पैशाचे आमिश दाखवून या कॅम्पमध्ये त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या नावाखाली भरती केले जाते. पण, हे कॅम्प म्हणजे नाझी जर्मनीच्या गॅस चेंबरइतकेच भयावह. कारण, कित्येक डांबलेल्या उघूर मुसलमानांची शस्त्रक्रिया करुन त्यांच्या किडन्या व इतर अवयवांच्या विक्रीचा व्यवसायही चीनमध्ये तेजीत आहे. त्याचबरोबर शिनजियांगमधील काही भागांमध्ये दाढी वाढवलेल्या पुरुषांना आणि बुरखादारी महिलांनाही बसमधून प्रवास करण्यास मनाई आहे. इतकेच नाही, तर उघूरांच्या शेकडो मशिदीही चीनने आजवर जमीनदोस्त केल्या. एकूणच, शिनजियांगमध्ये एकही मुस्लीम वा अन्य अल्पसंख्य नागरिक जीवंतच राहू नये, यादृष्टीने हा नरसंहार सुरु आहे.
 
महिलांची नसबंदी, त्यांची मासिक पाळीच्या वेळी आरोग्यसेविकांकडून होणारी तपासणी, औषधे-गोळ्या हा त्याचाच एक भाग. एकीकडे आहे त्या लोकसंख्येला संपवायचे आणि दुसरीकडे नवीन पैदाईशच होणार नाही, म्हणून जबरदस्ती महिलांची नसबंदी, गर्भपात करायचा, असे हे अमानवीय धंदे चीनमध्ये सुरु आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञांनी संयुक्त राष्ट्रसंघाला, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे. परंतु, चीनचा आडमुठा आणि सर्व काही दडवण्याची वृत्ती पाहता, पुढील काही वर्षांत शिनजियांगमध्ये एकही मुस्लीम उरलेला नसून चिनी हान वंशीयांचे वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित झाले तर नवल वाटायला नको. अमेरिकेनेही उघूरांवरील अत्याचाराशी निगडित चिनी अधिकार्‍यांवर निर्बंधांची मागणी केली असली तरी पुरेशी नाही. मुस्लीम राष्ट्रांनी तर जणू चीनमधील उघूर मुसलमान ‘अल्लाके बंदे’ नाहीच, असे समजून याकडे सपशेल डोळेझाक केलेली दिसते. पण, चीनची ही मुसलमानांवरील जबदरस्ती केवळ शिनजियांगपुरती मर्यादित नाही, तर चक्क ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हणून टेंभा मिरवणार्‍या पाकिस्तानमध्येही चिनी कंपन्यांनी मुसलमानांच्या धर्मनिष्ठेला त्यांच्याच देशात बाहेरचा दरवाजा दाखवला आहे. पाकिस्तानातील चिनी कंपन्यांमध्ये कार्यरत पाकिस्तानी कर्मचार्‍यांना कामाच्या वेळेत नमाज अदा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासंबंधीचा रोष व्यक्त करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पाकिस्तानमध्येही खळबळ उडाली. पण, याविरोधात सरकारने एक चकार शब्दही काढलेला नाही. चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायद्यामुळे मुलींची कमी झालेली लोकसंख्या पाहता, पाकिस्तानातील मुलींना फसवून त्यांची लग्नही चिनी मुलांशी पार पडली. पण, तरीही चीनसमोर गुडघे टेकलेले पाकिस्तान सरकार गप्पच राहिले. गुलाम तो शेवटी गुलामच म्हणा! त्यामुळे आता चीनच्या या वांशिक नरसंहाराला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांनी एकत्र येऊन दबावतंत्राचा वापर केला नाही, तर ज्यूंप्रमाणेच उघूरांच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.

 
@@AUTHORINFO_V1@@