सेवा ही यज्ञ कुंड समिधा सम हम जले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2020
Total Views |


rss nashik_1  H



नाशिक (प्रवर देशपांडे) : जीवनाचे सत्य म्हणजे मृत्यू. मरणपश्चात प्रवास सुखकर व्हावा अशी सगळ्यांचीच मनीषा असते. मात्र, कोरोना विषाणूच्या लागणमुळे मृत्यू आल्यास अंतिम समयी ही मनीषा पूर्ण होताना सध्या दिसत नाही. असे असली तरी, कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा अंतिम प्रवास सुखकर करण्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती अमोल कार्य करत आहे. समितीच्या मार्फत कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर संबंधित व्यक्तीच्या धार्मिक पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. याबाबत प्रत्यक्ष कार्य करणारे मंगेश खाडिलकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आजमितीस समाजमनात कोरोना बाबत भीती आहे. याबबात चर्चा करत असताना जाणवले की, कोरोनामुळे एखादी व्यक्ती मृत झाल्यास तिला वारस असूनही तिच्या नशिबी मात्र, ‘बेवारस’ मृतदेहासारखी स्थिती येते. कोणतेही नातेवाईक त्या व्यक्तीकडे मृत झाल्यावर मनात प्रेम , दु:ख असूनही पाहू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही रा. स्व. संघाचे शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांच्याशी चर्चा करून अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निलेश जेजुरकर यांना जनकल्याण समिती मार्फत रुग्णाच्या धार्मिक पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविणारे पत्र दिले. त्यास मान्यता मिळाल्यानंतर कार्य हाती घेतल्याचे खाडिलकर सांगतात.

 

कार्य सुरु केल्यावार पहिल्यांदाच एका मुस्लीम व्यक्तीचा दफनविधी समिती मार्फत पार पाडण्यात आला. तसेच आजवर चार हिंदू नागरिकांवर देखील समितीमार्फत विद्युत दाहिनीत दहन संस्कार करण्यात आले आहेत. आजवर समितीच्या मार्फत अन्नपाकीट वाटप, औषधे वाटप, शिधा वाटप असे अनेकविध सेवाकार्य बंधुभाव जागृत ठेवून करण्यात आले. कोरोनामुळे जे नागरिक मृत होत आहेत तेही बांधव आहेत. मात्र, कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने आणि सामाजिक दक्षता म्हणून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक पुढे येत नाहीत. त्यामुळे आपल्याच बांधवाचा मृतदेह बेवारस होऊ नये त्यांचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा या हेतून कार्य समितीमार्फत केले जात आहे. हे कार्य करत असताना आलेले अनुभव हे निश्चितच हृदयस्पर्शी असून समाजाचे धन्यवाद मिळत असल्याचे खाडिलकर यांनी सांगितले. या कामी जिल्हा रुग्णालयाच्या सर्वच अधिकारी व कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य समितीच्या कार्यकर्त्यांना लाभत आहे.

 

कार्य सुरु करण्यापूर्वी मनात असणारी शंका आत दूर झाली असून या कामास प्रोत्साहन मिळत असल्याचे खाडिलकर आवर्जून नमूद करतात. तसेच, या कार्यास समाज व कार्यकर्त्यांच्या घरातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. नाशिकमध्ये सद्यस्थितीत अनेक संस्था विविध माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. मात्र, अंत्यसंस्कार या विषयात केवळ रा. स्व. संघ जनकल्याण समिती कार्य करत आहे. समितीच्या कार्याचे महत्व लक्षात आल्याने अनेक नागरिक या कार्यात सहभागी होऊ इच्छित आहेत. बंधुभाव जोपासण्याच्या या कार्यात त्यांचेही स्वागत असल्याचे खाडिलकर सांगतात. हे काम करताना माणूस म्हणून छान वाटले, मानवधर्म जोपासण्याची संधी मिळाली, जीवनाच्या अंतिम सत्यासमवेत काम करता आले, त्यामुळे जीवनाचे मोल अधिक सजगतेने समजल्याची भावना समितीचे सर्वच कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसेच, आजवर आमचे कुटुंब सांभाळले आता इतरांच्या कुटुंबातील सदस्यांचा अंतिम प्रवास सुखकर करा अशा आशीर्वाद रुपी भावना कुटुंबाच्या असल्याचे समितीचे सर्वच सेवाव्रती आवर्जून नमूद करतात.

 

जोपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची भीती जात नाही तोपर्यंत कार्यरत राहण्याचा निश्चय या सर्वच कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्य करताना सुरक्षा म्हणून पिपिई कीट परिधान करणे, मास्क, हातमोजे, शिल्ड मास्क वापरले जातात. तसेच, अंतिम संस्कार झाल्यावर सहभागी सर्व कार्यकर्ते २४ तासासाठी क्वारंटाईन होत आहेत. वैद्याकीत तपसणी अंतीच हे कार्यकर्ते समजात पुन्हा सक्रीय होत आहेत. तसेच, सजगता बाळगण्यासाठी डॉ. भरत केळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यकर्त्यांना लाभत आहे. सेवा ही यज्ञ कुंड समिधा सम हम जले या विचारानुसार कार्य करणाऱ्या मनोज कुलकर्णी, मंदार ओलतीकर, जयेश क्षेमकल्याणी, ज्ञानेश्वर काळे, अद्वैत देशपांडे आदींसह इतर कार्यकर्त्यांना रुग्णांचे नातेवाईक आणि समाजमन मनापासून धन्यवाद देत असल्याचे नाशिकमध्ये पहावयास मिळते.

 
 

कोरोना ही जागतिक महामारी आहे, धीर , धैर्य आणि विश्वास हे कोरोना बाधितांसाठी खरे औषध आहे. त्यामुळे कोरोना रुग्णास त्याच्या नातेवाईकांनी धीर देणे आवश्यक आहे. काही दुर्दैवी घटना घडलीच तर, नातेवाईकांनी खचून न जाता धीराने परिस्थितीचा सामना करावा. तसेच, या कार्यात स्वयंप्रेरणेने जे सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांचे रा स्व. संघ जनकल्याण समिती नेहमीच स्वागत करेल.

 

- मंगेश खाडिलकर, नाशिक शहर जिल्हा सह कार्यवाह, रा. स्व. संघ

@@AUTHORINFO_V1@@