दिव्य ही निसर्ग नौका...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2020
Total Views |
Boat_1  H x W:




इतकी सुंदर निसर्गरुपी ‘नाव’ मिळाली असताना मानवाचे तेच ते रडणे! तिचे रक्षण त्याने प्रयत्नपूर्वक करावयास हवे. पण, असे न करता हा दुर्दैवी माणूस आपल्याच हातांनी या नौकेला खिळखिळे करून सोडतोय. हिच्या साहाय्याने नानाविध दुःखांना दूर सारत त्याने जीवनाचे अंतिम ध्येय ‘मोक्ष’ गाठावयाचे सोडून तो एकाच ठिकाणी थांबला आहे. तेही दैन्य-दारिद्य्राची गाणी गात!


सुत्रामाणं पृथिवीं द्यामनेहसं सुशर्माणमदितिं सुप्रणीतिम्।
दैवीं नावं स्वरित्रामनागसो अस्त्रवन्तीमा रुहेमा स्वस्तये ॥
(ऋ. १०/६३/१०, यजु. २१/५, अथर्व. ७/६/३)

अन्वयार्थ-
(सुत्रामाणम्) अतिशय चांगल्या प्रकारे रक्षण करणारी, (पृथिवीम्) मोठा विस्तृत आश्रय, आधार देणारी) (द्याम्) ज्ञानाचा प्रकाश करणारी (अनेहसम्) कधीही कष्ट, हानी व दुःख न प्रदान करणारी (सुशर्माणाम्) उत्तम प्रकारचे सुख देणारी (सुप्रणीतिम्) श्रेष्ठ मार्गाने घेऊन जाणारी, (स्वरित्राम्) उत्तर प्रकारे किनार्‍यांवर पोहोचवणारी (अस्त्रवन्तीम्) कधीही न टपकणारी, छिद्र नसलेली, (अशी ती) (अदितिम्) अखंडपणे कार्य करणारी, परिपूर्ण असलेली प्रकृतीरुपी, निसर्गरुपी (दैवी) दिव्य अशी, परमेश्वराची म्हणजेच प्राकृतिक दिव्यशक्तींची (नावम्) नाव आहे. अशा त्या नावेला प्राप्त करून आम्ही (अनागसः) सर्वजण पापविहीन होत होत (स्वस्तये) कल्याणाकरिता (आ रुहेम) आरूढ व्हावे, चढावे, बसावे.


विवेचन
नदी किंवा समुद्र पार करण्याकरिता जशी नौका हवी असते, त्याचप्रमाणे जीवनरुपी सागर तरून जाण्याकरितादेखील उत्तम प्रतीच्या नौकेची गरज असते. जन्मापासून लयापर्यंतचा जो कालावधी आहे. त्याला ‘जल’ म्हणजे ‘जीवन’ म्हणतात. जन्माने सुरुवात होते आणि मृत्यूने शेवट होतो. या जीवनयात्रेचा! हा शतायुषाचा अथांग कालप्रवास यशस्वी करण्यासाठी जर काय साधनच सुयोग्य नसेल, तर जन्मरुपी पहिल्या किनार्‍यापासून निघून मृत्युरुपी किनार्‍याचे पैलतीर कसे काय गाठता येईल? याकरिता त्या महान प्रभू भगवंताने आम्हा जीवात्म्यांकरिता सुंदरतम अशी दिव्य नौका प्रदान केली, ती म्हणजे ही प्रकृती होय. यालाच निसर्ग किंवा सृष्टी असे म्हटले जाते. काही जण शरीराला देखील ‘नौका’ म्हणून संबोधतात. पण, उपरोक्त मंत्रात प्रकृतीला नौकेची उपमा दिली आहे. ही निसर्गनाव सर्वदृष्टीने परिपूर्ण आहे. वैदिक त्रैतवादी सिद्धांतातील हे तिसरे तत्त्व! प्राकृतिक तत्त्वांचा योग्य प्रकारे विनिमय करीत व त्यांना उपभोगत जीवात्मा जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटू शकतो. पण, त्यासाठी या सर्व नैसर्गिक वस्तूंचा ज्ञानपूर्वक आणि त्यागपूर्वक उपयोग करण्याचे उत्तरदायित्व मानवाचे आहे.


मंत्रोक्त दिव्य नौका कशी आहे? या प्रकृतीरुपी नावेची कोणकोणती विशेषणे आहेत, त्याचे सुंदर विश्लेषण या मंत्रात आढळते. ही नाव सर्वांचे ‘सु+त्रामणाम्’ चांगल्या प्रकारे रक्षण करते. या नौकेत बसणार्‍यांना ती अगदी सुरक्षितपणे पुढे घेऊन जाते. प्राकृतिक तत्त्वे... पृथ्वी, पाणी, पावक, पवन पोकळी, झाडे, नद्या या सर्वांमध्ये सर्व प्राण्यांना सांभाळण्याचे, सुरक्षित ठेवण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच तर निसर्ग आम्हा सर्वांचा वैद्य व चिकित्सक आहे, असे आपण म्हणतो. अशी ही निसर्गनौका लहानसहान नाही, तर ती फारच मोठी विस्तारलेली आहे. तिचे दुसरे विश्लेषण आहे ‘पृथ्वी!’ पृथ् (म्हणजे पसरणे) या धातूपासून ‘पृथ्वी’ शब्द तयार होतो. निसर्गरुपी नाव फारच विस्तारलेली व दूरवर पसरलेली आहे. तिसरे विशेषण ‘द्याम्!’ द्युलोक जसे चमकणारे आहे, तशीच ही नावदेखील ज्ञानाने चमकणारी आहे. समग्र सृष्टीत ज्ञानविज्ञान दडलेले आहे. स्थूल असो की सूक्ष्म! निसर्गातील प्रत्येक तत्व विचारपूर्वक व ज्ञानपूर्वक रचलेले आहे. ही रचना म्हणजे परमेश्वराचे प्राणिमात्रासाठी मिळालेले अमूल्य असे वरदान! या निसर्गनौकेत बसणार्‍याला कधीही भिण्याचे कोणतेच कारण नाही. कारण, ती ‘अनेहस’ म्हणजे कोणालाही दुःख किंवा कष्ट पोहोचवत नाही. ती ‘सुशर्मा’ आहे. उत्तम प्रकारचे सुख व आनंद मिळवून देणारी आहे. अगदी सर्वांना जीवनाच्या अंतापर्यंत सत्य देणारी म्हणजेच शेवटच्या पैलतीरावर अलगदपणे घेऊन जाणारी आहे. साधारणपणे नावेत बसताना सर्वात मोठी भीती ही असते की, या नावेला कुठे छिद्र तर नाही ना? अगदी बारीकसारीक छिद्रसुद्धा विनाशाला कारण ठरणारे असते. ही प्राकृतिक नौका मात्र ‘अस्त्रवन्ती’ म्हणजे कुठूनही गळणारी नाही. तिला कुठेच नकळतदेखील छिद्र नाही. ती अगदी मजबूत आहे. ती ‘अदिती’ आहे. कधीही खंडित होत नाही. तिचा प्रवाह एकसारखा आहे. थांबत नाही. विभाजनाचे दोष निसर्गात नाहीत. याउलट त्यात सर्वांना जोडण्याची शक्ती आहे.


अशा या दिव्योत्तम नावेत बसणारा मात्र तितकाच सुपात्र हवा! यात आरूढ होणारे ‘अनागसः’ म्हणजेत निर्दोष पापरहित, विशुद्ध मनोवृत्तीचे सज्जन असावेत. त्यांचा या नावेत बसण्याचा उद्देशदेखील ‘स्वस्तये’ म्हणजे कल्याणाकरिताच असायला पाहिजे. ध्येयविहीन वेडा नाविक अशा सुंदरतम नौकेला कुठे घेऊन जाईल? सांगता येत नाही.

आजची परिस्थिती मात्र सदरील मंत्राच्या नेमकी विपरीत होत चालल्याचा प्रत्यय पदोपदी सर्वत्र येतोय. प्रकृतीरुपी या नावेला विकृत करण्याचा मोठा अपराध माणूस करतोय. मात्र, त्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण उपभोगत आहोत. निसर्गाची ही नाव वरदानाच्या ऐवजी अभिशाप ठरत आहे. याचे कारण काय तर मानवाची दुर्बुद्धी! हा निसर्ग सबंध जीवांच्या सर्वंकष कल्याणासाठी तत्पर आहे. याचा सर्वाधिक उपभोग घेण्याचा अधिकारही मानवाचाच! पण, भोगण्याचे कार्य करीत असताना त्यागाचाही विचार व्हावयास हवा! ‘सर्व काही मलाच मिळावे, इतरांना काहीच मिळता कामा नये,’ अशी ही स्वार्थाची प्रवृत्ती म्हणजे माणसाची ‘मानवतेकडून दानवतेकडे’ वाटचाल होय. अनिष्ट वृत्तीचे परिणाम सार्‍या जीवमात्रांना भोगावे लागत आहेत. इतकी सुंदर निसर्गरुपी ‘नाव’ मिळाली असताना मानवाचे तेच ते रडणे! तिचे रक्षण त्याने प्रयत्नपूर्वक करावयास हवे. पण, असे न करता हा दुर्दैवी माणूस आपल्याच हातांनी या नौकेला खिळखिळे करून सोडतोय. हिच्या साहाय्याने नानाविध दुःखांना दूर सारत त्याने जीवनाचे अंतिम ध्येय ‘मोक्ष’ गाठावयाचे सोडून तो एकाच ठिकाणी थांबला आहे. तेही दैन्य-दारिद्य्राची गाणी गात! अशावेळी दुर्बल मानवी मनाला उभारी देणार्‍या गीतकार जगदीश खेबूडकरांच्या भक्तिगीतातील या प्रेरक ओळी फारच प्रासंगिक वाटतात-


तुझ पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी सरिता सागरा!
सोडी सोन्याचा पिंजरा
आकाशी झेप घेरे पाखरा!!




मंत्रात वर्णिलेली निसर्गनौका ही जीवनाचा अखंड प्रवास करू इच्छिणार्‍या जीवात्म्यांसाठी अतिशय सक्षम आहे. याद्वारे सर्वांची यात्रा मंगलदायी ठरो.


- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य



@@AUTHORINFO_V1@@