...म्हणून ‘हिंदुजा’ उद्योग समूहात कौटुंबिक संघर्ष!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2020
Total Views |
Hinduja _1  H x



कोरोना महामारीच्या काळात ब्रिटनमधून आलेल्या एका बातमीने संपूर्ण जगाच्या उद्योगविश्वाचे आणि गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. बातमी अशी आहे की, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आणि ब्रिटन मधले दुसऱ्या क्रमांकांचे श्रीमंत नागरिक श्रीचंद हिंदुजा यांनी ब्रिटनच्या उच्च न्यायालयात आपल्या इतर तीन भावा विरुद्ध एक दावा दाखल केला आहे. त्यांचा दावा दाखल करून घेताना न्यायालयाने स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या ८४ वर्षीय श्रीचंद हिंदुजा यांची लीगल फ्रेंड म्हणून विनू हिंदुजा या त्यांच्या मुलीला या खटल्यात श्रीचंद हिंदुजा यांना साहाय्य करायलादेखील ब्रिटिश न्यायालयाने परवानगी दिली आहे. 


हिंदुजा समूहाची थोडक्यात माहिती


मुळात या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हिंदुजा ग्रुप हा अत्यंत कर्मठ आणि कौटुंबिक तत्त्वांशी बांधला गेलेला उद्योगसमूह म्हणून प्रसिद्ध आहे. एक आदर्श हिंदू अविभक्त कुटुंबांचा व्यवसाय कसा असावा. याचे एक उदाहरण म्हणजे हिंदुजा उद्योगसमूह. १९१४ साली परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी मुंबईमध्ये या समूहाची स्थापना केली. १९१९ साली परमानंद हिंदुजा यांनी तेव्हाच्या इराणमधून समूहाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांची सुरवात केली. इराणमध्ये इस्लामिक क्रांती होवेपावतो म्हणजेच १९७९ पर्यंत या समूहाच मुख्यालय हे इराणमध्ये होते, नंतरच्या काळात ते लंडनला हलविण्यात आले. परमानंद हिंदुजा यांच्या चार मुलांनी हा समूह आणखीनच नावारूपाला आणला. श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा या चारही भावांनी वडिलांच्या पश्चात हिंदुजा समूहाला जागतिक ओळख मिळवून दिली.

आज कुटुंबांची तिसरी पिढी समर्थपणे व्यवसायाचा गाडा पुढे नेत आहे. भारतातील ट्रक बनविणारी प्रख्यात कंपनी ‘अशोक लेलंड’ याच समूहाच्या मालकीची असून याशिवाय भारतातील इंडसइंड बँकसुद्धा हिंदुजा समूहाच्या अखत्यारित येते. याशिवाय खनिज तेल क्षेत्रामधील मोठा ब्रॅण्ड असणारी गल्फ आँईल यावरसुद्धा हिंदुजा समूहाचा मालकी हक्क आहे. याशिवाय मीडिया, आयटी, आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांत समूहाचा वावर आहे. ‘फोर्ब्स’ मासिकानुसार आज या समूहाचा आर्थिक पसारा हा ११ बिलियन डॉलर इतका असून जगातील ३८ देशात त्यांचा विस्तार आहे, ज्यात जवळपास १,५०,००० अधिक लोक यात काम करतात.


नक्की प्रकरण काय आहे?

२ जुलै, २०१४ रोजी चारही भावांनी एका समझोता पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यानुसार चारही भाऊ हे एकमेकांना एकमेकांचे Executors (कार्यकारी सदस्य) म्हणून नेमणूक केली. याच पत्रानुसार कोणतीही मालमत्ता जी एखाद्या भावाच्या वैयक्तिक मालकीची असेल त्यामध्ये इतर तीन भावांचा हक्क या समझोतापत्रानुसार मान्य करण्यात आला. कायद्याच्या भाषेत सांगायचे झाले Everything belongs to everyone and nothing belongs to anyone, and that each man will appoint the others as their executors. हे पत्र या कायदेशीर लढाईच्या केंद्रस्थानी आहे. श्रीचंद हिंदुजा आणि विनू हिंदुजा यांनी हे पत्रच रद्द करण्याची मागणी केली आहे.


मात्र, हा प्रश्न उद्भवण्यामागचे खरं कारण हे स्वित्झर्लंडस्थित हिंदुजा बँकेच्या व्यवस्थापन नियंत्रणवरून उद्भवला आहे. श्रीचंद हिंदुजा यांनी १९७८ साली एका वित्तीय आस्थापनेची स्वित्झर्लंडमध्ये केली, ज्याला १९९४ मध्ये स्वित्झर्लंडच्या कायद्याने बँक म्हणून व्यवहार करायची परवानगी मिळाली. हा परवाना मिळविण्यासाठी स्वित्झर्लंड कायद्यानुसार केवळ एका व्यक्तीच्या नावाने करण्याची अट होती. त्यामुळे तेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून ते श्रीचंद हिंदुजा यांच्या नावाने करण्यात आले होते असा दावा इतर तीन हिंदुजा बंधूंनी केला आहे. त्यामुळे हिंदुजा बँक हीसुद्धा संपूर्ण परिवाराच्या एकत्रित मालकीची आहे असा त्यांचा दावा आहे.
सध्या श्रीचंद हिंदुजा हे हिंदुजा बँकेचे अध्यक्ष आहे. २०१८ मध्ये श्रीचंद यांना साहाय्य करण्यासाठी त्यांची मोठी मुलगी शनु हिंदुजा यांची सह-अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यामध्ये शनु हिंदुजा यांचा २९ वर्षीय मुलगा करम हिंदुजा याची बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे.



श्रीचंद हिंदुजा यांच्यासाठी काम करणाऱ्या क्लीफोर्ड चान्स या लॉ फर्मने २ मे, २०१५ मध्ये इतर तीन भावांना पाठवलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, श्रीचंद मेहता हे कायदेशीररित्या २०१४ च्या समझोता-पत्राला बांधील नाही आहेत, असे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अजून एक खटला हिंदुजा बँकेच्या नियंत्रणावरून स्वित्झर्लंडच्या न्यायालयात प्रलंबित आहेत, असे एका वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे. तीन आठवड्यांपूर्वी इतर तीन भावांनी परिवाराचे प्रमुख असणाऱ्या श्रीचंद हिंदुजा यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याचा अर्ज ब्रिटनच्या न्यायालयात केला आहे.



या सगळ्या विवादामध्ये मुलींचा वडिलांच्या संपत्ती मधला हक्क हा केंद्रस्थानी आहे. २ जुलैच्या त्या पत्रामुळे श्रीचंद हिंदुजा यांच्या मुलींचा वडिलांच्या संपत्ती मधला हक्क नाकारला जातो आहे, असा दावा शनु आणि विनु हिंदुजा यांच्या कडून केला जातोय. मात्र इतर तीन हिंदुजा बंधूनी हे फेटाळताना असे म्हटले आहे की, शनु आणि विनु हिंदुजा या परिवाराचाच भाग असून, परिवाराच्या मूलभूत मूल्यानुसार, सर्व काही सर्व परिवाराचे एकत्रित मालकीचे असून कोण्या एका व्यक्तीकडे त्याची मालकी नाही या सूत्राचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे या कुटुंबाच्या मूल्यानुसार श्रीचंद हिंदुजा यांच्या पश्चात त्यांची संपत्ती ही हिंदुजा ट्रस्टकडे हस्तांतरित व्हावी, असा इतर तीन हिंदुजा भावांचा दावा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यात परिवाराचा भाग म्हणून शनु आणि विनु हिंदुजा एकत्रित हिस्सा असणार आहे, मात्र, कोण्या एकाचा त्यावर हक्क नसेल. हे तत्त्व समूहाचे संस्थापक परमानंद हिंदुजा यांनी घालून दिले आहे आणि त्यावरच आतापर्यंत हिंदुजा समूहाचा कारभार हा चालत आला आहे. श्रीचंद हिंदुजा यांची ढासळत चाललेल्या प्रकृतीमुळे या खटल्याच्या सुनावणीकडे साऱ्या उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे. बाकी काही असो या खटल्याचा निकालाचा परिणाम हा भारतीय उद्योग क्षेत्रावर नक्कीच होणार आहे.

-सुमेध हिंगे




@@AUTHORINFO_V1@@