कलोपासक ‘पद्मश्री’ अम्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

pankajashi amma_1 &n


केरळमधील लोप पावत चालेल्या ‘नोक्कु विद्या पावकाली’या लोककलेचे संवर्धन करत वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करणार्‍या केरळच्या ‘पद्मश्री’ मुझक्कल पंकजाक्षी अम्मा यांच्याविषयी...



दक्षिण भारतातील केरळ राज्यात ‘ओणम’ उत्सवात वेलन समाजातील लोक ‘नोक्कु विद्या पावकाली’ नावाची कठपुतळीसारखी एक लोककला सादर करतात. ज्यामध्ये राम आणि रावण यांच्या पुतळ्या तोंडाच्या साहाय्याने काठीचा आधार घेत कलाकारांकडून रामायण गीतांच्या तालावर नाचविल्या जातात. आज काळाच्या ओघात ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या लोककलेचे सादरीकरण करणारे कलाकारही कमी झाले आहेत. परंतु, हीच लोककला जपत वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करणार्‍या केरळच्या मुझक्कल पंकजाक्षी अम्मा यांच्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया.

ओठांच्या वरच्या टोकांवर खेळणार्‍या मुझक्कल पंकजाक्षी अम्माच्या कठपुतळी महाभारत किंवा राम-रावण यांच्यातील युद्धाचे प्रसंग रंगविण्यासाठी प्रख्यात आहेत. ‘नोक्कु विद्या पावकाली’ या अद्वितीय परंपरेला जीवंत ठेवल्याबद्दल या कलेच्या एकमेव अभ्यासक मुझक्कल पंकजाक्षी अम्मा यांना यावर्षीच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८९वर्षीय पंकजाक्षी अम्मा यांना आपल्याला मिळालेल्या सन्मानाबद्दल सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या मते, ही त्यांच्या परिश्रम आणि समर्पणासाठी मिळालेली एक पावती आहे. पंकजाक्षी अम्मा वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘नोक्कु विद्या पावकाली’ आणि या कठपुतळीच्या कलात्मक सूक्ष्मतेबद्दल अभ्यासपूर्ण बोलू शकतात. तथापि, त्यांना आता असे वाटते की, त्यांचे वय आता साथ देत नाही. कारण, त्यांना आता बोलणे थोडे कठीण झाले आहे. त्यांची नात रंजिनी आता या कठपुतळ्याबद्दल माहिती देते. ही पारंपरिक कला लोप पावू नये म्हणून पंकजाक्षी यांनी आपली नात रंजिनीला याचे प्रशिक्षण देऊन अनोख्या कलाप्रकाराचा हा वारसा पुढील पिढीकडे सोपविला आहे.

पंकजाक्षी अम्मांना ही कला त्यांच्या पालकांकडून मिळालेली देणगी आहे. अम्मांचे पालक ही कला पूर्वी मंदिर तसेच घरगुती समारंभात सादर करत असत. ही कला पाहून चकित झालेल्या पंकजाक्षी यांना वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच ‘नोक्कु विद्या पावकाली’ शिकण्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या पालकांनी कधीही त्यांना ही कला शिकण्याचा आग्रह केला नाही. परंतु, अम्मांनाच स्वतः ही कला शिकण्यात रस होता. आईकडूनच पंकजाक्षींनी या परंपरागत कलेचे धडे घेतले. याचे सादरीकरण सहसा वेलन समुदायाद्वारे केले जाते. वरच्या ओठांवर कठपुतळ्यांचा समतोल साधणे सोपे काम नाही. पंकजाक्षी अम्मांचा असा दावा आहे की, त्या काळात या कलेचा बारकाईने अभ्यास केला जात होता. अम्मादेखील प्रशिक्षणाचा भाग म्हणून दररोज कित्येक तास छोटी शहाळी व नारळांना काठीच्या साहाय्याने वरच्या ओठांवर संतुलित करण्याचा प्रयत्न करीत असे. लग्नानंतरही त्यांनी आपला सराव सुरूच ठेवला. अम्मांचे पती आणि मुलांनीदेखील या सरावात त्यांना मदत केली. एका मुलाखतीत त्या म्हणतात, “मला अभिमान आहे की लग्न किंवा मुले दोघांनीही माझ्या कारकिर्दीला अडसर होऊ दिला नाही. ” ‘नोक्कु विद्या पावकाली’ साकारण्यासाठी डोळ्यांची दृष्टी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. जेव्हा डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागली व त्यांनी पुढचे दातदेखील गमावले तेव्हा मात्र पंकजाक्षी अम्मांनी आपला कलेचा हा वारसा नातीकडे सोपविला.




आपल्यापैकी बहुतेक लोक ‘थोल पावाकुथू’ आणि ‘नुल पावकुथू’ या लोकप्रिय कठपुतळीच्या प्रकारांबाबत ऐकून असतील. पण ‘नोक्कु विद्या पावकाली’ ही पारंपरिक शैलीची कठपुतळी आहे. या कलाप्रकारात कठपुतळी एका सपाट पृष्ठभागावर ठेवून नंतर एका काठीवर ठेवल्या जातात व ही काठी ओठांद्वारे नियंत्रित केलेली असते. या कठपुतळ्या लाकडावर कोरल्या जातात आणि दोन इंच लांब असतात. त्यांच्याशी जोडलेले धागे किंवा तार एका विशिष्ट मार्गाने खेचले जातात तेव्हा त्या बाहुल्या हालचाल करतात. गंजारा, थुडी व कैमानी ही पारंपरिक वाद्ये ‘नोक्कु विद्या पावकाली’ या कलाप्रकारात संगीत साथ देतात. यात महाभारत आणि रामायणातील विविध कथा ओळींवर प्रभुत्व मिळवले जाते. पार्श्वसंगीताच्या तालावर कठपुतळ्यांच्या तारा ओढल्या जातात. या अनोख्या शैलीमुळे ‘नोक्कु विद्या पावकाली’ कठपुतळीच्या इतर प्रकारांपेक्षा भिन्न आहे.
आज वयाच्या नव्वदीतदेखील पंकजाक्षी अम्मा खूप आनंदी आहेत.


कारण, त्यांची नात के. एस. रंजिनीने आजीच्या पावलावर पाऊल ठेवत या कलेच्या जतनासाठी प्रयत्न करण्याचा वसा घेतला आहे. पंकजाक्षी म्हणतात, “तिने प्रेमळपणे आणि उत्साहाने ही कला शिकण्यात रस दाखविला. तिला प्रशिक्षण देण्यासाठी तिने छोटे नारळ व शहाळे गोळा करण्यास सुरुवात केली. ती मन लावून सराव करते आहे.” तिच्या आजीच्या मार्गदर्शनाखाली रंजिनीचा हा प्रवास सुरु झाला. तिचा भाऊ एकामागून एक कठपुतळी देतो तर तिचे काका गायन व संगीत देतात आणि रंजिनी सादरीकरण करते. आज पंकजाक्षींच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. त्यांनी संपूर्ण जीवन या कलेच्या संवर्धनासाठी दिले व आजही त्या ही कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्नशील आहेत. रंजिनीच्या रूपात त्यांना या कलेचा वारसा जपणारी आशा व विश्वासदेखील मिळाला. सद्यस्थितीत लोप पावत चाललेल्या या लोककलेच्या संवर्धनासाठी व जतनासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणार्‍या ‘पद्मश्री’ मुझक्कल पंकजाक्षी अम्मा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
@@AUTHORINFO_V1@@