तुझे नि माझे नाते काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2020
Total Views |

agralekh_1  H x



२००५-०६ मध्ये सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला चिनी दूतावास व चीनकडून सुमारे तीन लाख डॉलर्सची देणगी मिळाली होती. अशाप्रकारे चिन्यांकडून देणगी घ्यायची आणि नंतर भारताची अंतर्गत माहिती चीनला द्यायची, अशीही काही गांधी परिवाराची योजना होती का आणि त्या देणगीच्या बदल्यातच तसा करार करण्यात आला का?



चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले तर चीनच्या कमांडिंग अधिकार्‍यासह ४० ते ४५ सैनिक मारले गेले. दरम्यान, सीमेवरील संघर्षकाळात सुरक्षाव्यवस्थेत वाढ करतानाच भारत सरकारने चीनबरोबरील तणाव निवळावा, यासाठीही प्रयत्न सुरु ठेवले. मात्र, भारतीय सैनिकांनी चिन्यांच्या नृशंस हल्ल्याचा प्रतिकार करता करता प्राण गमावले तरी काँग्रेस व गांधी परिवाराने राजकारण खेळण्याचे व चीनविरोधात शब्दही न काढण्याचेच काम केले. असे का? अगदी मेच्या पहिल्या आठवड्यात सीमावादाला सुरुवात झाली, तेव्हापासून ते आजपर्यंत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या दोघांनी सातत्याने केंद्र सरकारवरच टीका केली व पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुन्हेगार ठरवण्यासाठी तोंड चालवले. मात्र, या सगळ्या काळात सोनिया गांधी व राहुल गांधी या मायलेकांनी एकदाही चीनचा किंवा चिनी सैनिकांच्या घृणास्पद कृत्याचा निषेध-विरोध केला नाही, असे का? सर्वपक्षीय बैठकीतही अन्य विरोधी पक्षांनी आपण केंद्र सरकारसोबत असल्याचे सांगितले तर काँग्रेस व गांधी परिवार त्यापासून अलिप्त राहिला आणि चिनी माध्यमांनी आपल्या सैन्यशक्तीचे दर्शन घडवत भारताला अगदी युद्धाच्या धमक्या देण्यापर्यंत मजल मारली, चिनी नेत्यांनी भारताविरोधात विधाने केली तरी काँग्रेस व गांधी परिवार त्याविरोधात न बोलता नरेंद्र मोदी व भाजपलाच प्रश्न विचारत राहिला, असे का? काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी प्रथम चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि नंतर एकाएकी शांत होत त्यांना चीनसंदर्भात केलेले ट्विटही डिलिट करावे लागले. तद्नंतर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आनंद शर्मा यांनी २१वे शतक, अर्थव्यवस्था, रणनीतिक भागीदारी यांसारखे शब्द वापरत अधिररंजन चौधरी यांचे चीनविषयक विचार वैयक्तिक असून ती पक्षाची भूमिका नाही, असे सांगितले, असे का? काँग्रेस, गांधी परिवार आणि चीनमधील नेमके नाते काय? देशातील सर्वसामान्य नागरिकांसह प्रत्येकालाच हे प्रश्न पडले आणि गांधी परिवाराच्या या चिनी नात्याचा उलगडा झाला, काँग्रेसने १२ वर्षांपूर्वी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी त्या देशात जाऊन केलेल्या गुप्त कराराची (मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग एमओयू) माहिती समोर आली तेव्हा.





७ ऑगस्ट, २००८ रोजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींच्या पुढाकाराने व उपस्थितीने चिनी कम्युनिस्ट पक्षाशी उच्चस्तरीय माहितीचे आदानप्रदान व सहकार्यासाठी हा करार झाला. विशेष म्हणजे सध्या मोदी सरकारला देशविघातक ठरवण्यासाठी वाट्टेल ते बरळणारे काँग्रेसचे तत्कालीन मुख्य सचिव असलेल्या राहुल गांधी यांनीच या करारावर स्वाक्षरी केली, तर चीनकडून कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन उपाध्यक्ष व चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यावर हस्ताक्षर केले. सदर कराराने दोन्ही पक्षांना महत्त्वपूर्ण द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विकासावर एकमेकांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळाल्याचे पुढे काँग्रेसकडून सांगण्यात आले. वस्तुतः अशाप्रकारचे करार किंवा एमओयू कोणत्याही दोन देशांदरम्यान अथवा दोन कंपन्यांदरम्यान होतात. पण इथे भारतासारख्या लोकशाही देशातील काँग्रेस पक्षाने चीनसारख्या हुकूमशाही देशातील कम्युनिस्ट पक्षाशी करार केला. उल्लेखनीय म्हणजे काँग्रेस किंवा गांधी परिवाराने हा करार नेमका काय, हे कधीच सार्वजनिकरित्या सांगितले नाही. सोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग या करारावेळी का उपस्थित नव्हते? तसेच या करारातली कलमे नेमकी काय होती? प्रत्येक स्तरावरील माहितीचे आदानप्रदान व सहकार्य याचा नेमका अर्थ काय? भारतीय हितांशी निगडित माहितीच्या देवाणघेवाणीचा मुद्दा यात होता का? गांधी परिवाराने तशी काही माहिती चिनी कम्युनिस्ट पक्षाला दिली का? कारण तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधानपदी असले तरी ‘सुपर प्राईम मिनिस्टर’ची भूमिका सोनिया गांधीच निभावत होत्या आणि सोनिया गांधींना सरकारमधील प्रत्येक घडामोडींची माहिती दिली जात असे. मग ती माहिती चीनपर्यंत पोहोचवली गेली का? तसेच या करारातून गांधी परिवाराला नेमका काय लाभ झाला? दरम्यान, २००५-०६ मध्ये सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दूतावास व चीनकडून सुमारे ३ लाख डॉलर्सची देणगी मिळाली होती. अशाप्रकारे चिन्यांकडून देणगी घ्यायची आणि नंतर भारताची अंतर्गत माहिती चीनला द्यायची, अशीही काही गांधी परिवाराची योजना होती का आणि त्या देणगीच्या बदल्यातच तसा करार करण्यात आला का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि काँग्रेस वा गांधी परिवाराला त्याची उत्तरे द्यावीच लागतील.





देशातील सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून गांधी परिवाराने राष्ट्रहिताशी तडजोड करण्यासाठी आणि चिनी एजंटची भूमिका वठवण्यासाठीच हा करार केल्याचे नंतरच्या काळात घडलेल्या अनेक प्रसंगांवरुन म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २००८साली राहुल गांधींनी या करारावर स्वाक्षरी केली आणि त्याचवर्षी चीनने टिया पांगनाक व चाबजी व्हॅली हे दोन भारतीय प्रदेश बळकावले. नंतर २००९साली डुम चेला, २०१२साली डेमचोक आणि २०१३ साली राखी नुला या प्रदेशांवर चीनने कब्जा केला. म्हणजेच गांधी परिवाराशी केलेल्या करारानंतर चीनने पाच भारतीय प्रदेश गिळंकृत केले, मग काँग्रेसने कम्युनिस्ट पक्षाशी करार यासाठीच केला होता का? चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखालील पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय प्रदेश हस्तगत केला तरी आम्ही मूग गिळून बसू! आमचा कठपुतळी पंतप्रधान कितीही भारतीय प्रदेश बळकावला तरी हुं की चूं करणार नाही! भारतीय सैन्याला चीनविरोधात उभे केले जाणार नाही, आम्ही गुपचूप तुमच्यापुढे समर्पण करु! असे काही गांधी परिवाराने सदर करारात कबुल केले होते का? नंतरही २०१७साली डोकलाम वादावेळी राहुल गांधींनी अंधारात लपूनछपून चिनी राजदुताची भेट घेतली आणि २०१८साली कैलास-मानससरोवर यात्रेला जाण्याच्या नावाखाली चिनी मंत्र्यांना भेटले. राहुल गांधींनी यावेळी नेमकी काय गुप्त चर्चा केली, याचेही पुरेसे स्पष्टीकरण कधीही दिलेले नाही. आणि आज सोनिया गांधी किंवा राहुल गांधी लडाखमध्ये नेमके काय झाले, हे सरकारला खोदून खोदून विचारताना दिसतात. केंद्र सरकारने आवश्यक ते सांगितले तरी आम्हाला आतल्या गोटातली माहिती मिळायला हवी, अशी गांधी मायलेकांची इच्छा असते, का? चिन्यांना सांगण्यासाठी? स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी? संवेदनशील माहिती चिन्यांना दिली की, त्यांनी ‘राजीव गांधी फाऊंडेशन’वर लाखो डॉलर्सची खैरात केली आणि यापुढेही करावी, यासाठी? कारण, ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला चीनकडून मिळालेल्या देणगीच्या आरोपांवर सोनिया गांधी व राहुल गांधी अजूनही गप्प आहेत आणि त्यांची चुप्पी बरेच काही सांगणारी आहे.




आणि अशा सोनिया गांधी व राहुल गांधींबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाराष्ट्रातल्या सत्तेत सहभागी आहे. शनिवारी शरद पवारांनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांना सुनावल्याची बरीच चर्चा झाली, पण मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा लोकांबरोबर अजूनही सत्तेत का आहे? की सगळ्याच जुन्या बाबी खोदल्या जात आहेत तर आपण संरक्षणमंत्री असताना काय केले, हे समोर येऊ नये म्हणून पवारांनी राहुल गांधींचे कान टोचण्याचे नाटक केले? उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठकीत चिन्यांचे डोळे काढून हातात देण्याची भाषा केली, पण ते तरी राष्ट्रहिताचा सौदा करणार्‍या काँग्रेसच्या टेकूवर का अजूनही मुख्यमंत्रिपदी बसलेले आहेत? देशाचा हजारो किमी प्रदेश गमावण्याला कारणीभूत आणि सैनिकांच्या हौतात्म्यावरुनही राजकारण करणार्‍या काँग्रेसच्या हाताची साथ का ठाकरेंना प्रिय वाटते? की काँग्रेसच्या चिन्यांबरोबरील नात्यांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनालाही वाटा हवा आहे? हे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याची उत्तरे या दोन्ही पक्षांनी दिलीच पाहिजेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने देशसुरक्षेला चूड लावणार्‍यांबरोबर केवळ खुर्चीसाठी पाट लावल्याची नोंद नक्कीच होईल व त्यांचीही हालत काँग्रेससारखी झाल्याशिवाय राहणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@