करतारपूर कॉरिडोर सुरू करण्यामागे पाकिस्तानचा नवा डाव

    27-Jun-2020
Total Views |

kartarpur_1  H




नवी दिल्ली :
पाकिस्तानने २९ जूनपासून करतारपूर कॉरिडोर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या या प्रस्तावावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. करतारपूर कॉरिडोर उघडण्यासाठी दोन दिवसांचा नोटीस कालावधी हा द्विपक्षीय कराराच्या विरोधात असल्याचे भारताने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील करारानुसार नोटीस कालावधी हा सात दिवसांचा आहे.


महाराजा रणजित सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी करतारपूर कॉरिडोर पुन्हा सुरू करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सांगितले. कोरोना विषाणूच्या साथीमुळे हा कॉरिडॉर गेल्या तीन महिन्यांपासून तात्पुरते बंद आहे. भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानने २९ जून रोजी दोन दिवसांच्या सूचनेवर करतारपूर कॉरिडोर पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव देऊन आपली सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, द्विपक्षीय करारानुसार यात्रा सुरु करण्याच्या तारखेच्या किमान सात दिवस अगोदर भारताला पाकिस्तानबरोबर माहिती सामायिक करणे आवश्यक आहे. यासाठी भारताला नोंदणी प्रक्रिया अगोदरच सुरु आवश्यक आहे. कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता भारताने सीमाबाहेरील यात्रांवर तात्पुरते निर्बंध आणले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांचा सल्ला घेतल्यानंतरच सरकार पुढील निर्णय घेईल. पुढे मिळालेल्या माहितीत असेही म्हटले आहे की, “द्विपक्षीय करार बंधनकारक असूनही पाकिस्तानने पूरग्रस्त भागात रवी नदीवर आपल्या बाजूने पूल बांधलेला नाही. पावसाळ्यात हा मार्ग कॉरिडॉरकडे जाण्यासाठी सुरक्षित आहे की नाही हेदेखील पाहावे लागेल."