“मोर्टिमर व्हीलर हाजीर हो....”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2020
Total Views |

मोर्टिमर व्हीलर _1 &




गेल्या तीन लेखांपासून आपण वेदांमधील लढाया शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातून आर्यांच्या तथाकथित आक्रमणाचा कोणताच पुरावा आपल्या हाती लागलेला नाही. इंद्राचे एक वैदिक नाव ‘पुरंदर’. ‘पुर’ म्हणजे नगर – ते फोडणारा तो ‘पुरंदर’. अशा अर्थाने ‘इंद्राने अनेक नगरे फोडली, अर्थात उद्ध्वस्त केली’ असा इंद्रावर आरोप ठेवून त्याला इथल्या तत्कालीन मूलनिवासी समाजाचा विध्वंस करण्यासाठी जबाबदार धरले गेले. आणि विध्वंस केल्याचा पुरावा तरी कोणता? तर मोहेंजोदरो, हरप्पा, वगैरे ठिकाणी उत्खननात सापडलेली उद्ध्वस्त नगरे आणि त्यात मिळालेले काही मानवी सांगाडे. काय सांगतात हे पुरावे? चला जरा आढावा घेऊ.


मोर्टिमर व्हीलरची पार्श्वभूमी


सन १९४४ मध्ये हे मोर्टिमर व्हीलर महोदय इंग्लंडमधून भारतात आले. तत्कालीन ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’ अर्थात Archaeological Survey of India (ASI) खात्यात शिमला येथील कार्यालयात नोकरी करण्यासाठी आले. आल्यापासून भारतीय जनजीवन, राहणीमान, खाणे-पिणे, वागणे-बोलणे, कामाची पद्धत, विचार, संस्कृती, इत्यादि गोष्टींवर सातत्याने नाखूष राहिले. आपल्या मायभूमीत – ब्रिटनमध्ये असलेल्या आपल्या मित्रमंडळींना त्यांनी त्या काळी अनेक पत्रे लिहिली. त्यात त्यांनी भारतीय समाजाविषयी अतिशय टोकाची अप्रीती आणि तिरस्कार सातत्याने व्यक्त केलेला दिसतो. भारतीय लोकांविषयी वांशिक तिरस्कार आणि हीनतेची भावना त्यात आकंठ भरलेली दिसते. त्यांची पुरातत्त्व विषयामधली एक शिष्या ‘जकेटा हॉक्स’ (Jacquetta Hawkes) हिने व्हीलरच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या ‘Mortimer Wheeler: Adventurer in Archaeology’ या लंडनमधून प्रकाशित झालेल्या (१९८२) एका प्रबंधवजा पुस्तकात यापैकी अनेक पत्रांचे संदर्भ आणि उतारे दिले आहेत. एकूणच व्हीलर महोदयांची भारतातील कारकीर्द म्हणजे एखाद्याला आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागलेल्या आणि सतत नाखुषीनेच चाललेल्या संसारासारखीच म्हणावी लागेल. अशा जोडप्यामधले दोघेही एकमेकांविषयी तिसऱ्याशी बोलतात, तेव्हा सहसा कधीच बरे बोलताना दिसत नाहीत.


मोर्टिमर व्हीलरचे मत


तर वाचकहो, अशा मानसिकतेतून व्हीलर महोदयांनी भारतात राहून जे संशोधन केले, त्यातला सूर भारताचा गौरव करणारा कसा काय बरे असणार? हे व्हीलर महोदय भारतात येण्याच्या सुमारे दोन दशके आधी सिंधू नदीच्या काठी मोहेंजोदरो, हरप्पा, वगैरे ठिकाणी उत्खननात काही उद्ध्वस्त झालेली नगरे सापडली होती. तिथेच काही मानवी सांगाडे सुद्धा मिळाले होते. त्यांच्याविषयी विविध विद्वानांचे उलट-सुलट लेखन, संशोधन, निष्कर्ष लोकांसमोर येत होते. पैकी एक म्हणजे मोर्टिमर व्हीलरने केलेले संशोधन होय. यानुसार काढलेला निष्कर्ष असे सांगतो: आधी सिंधू नदीच्या काठी अतिशय प्रगत आणि सुबत्तेत असलेली नागरी संस्कृती होती. पण त्यानंतर ‘आर्य’ नावाची एक परकीय जमात त्यांच्यावर आक्रमण करून आली. त्यांनी ती प्रगत नगरे फोडून उद्ध्वस्त केली. तिथल्या मूलनिवासी ‘द्रविड’ लोकांची कत्तल केली आणि उरलेल्या लोकांना तिथून दक्षिणेत हाकलून लावले. त्यानंतर त्यांनी तिथे सिंधू नदीच्या परिसरात राहून वेदांची रचना केली. अशा पद्धतीने भारतात ‘वैदिक’ संस्कृतीचा प्रवेश झाला. आर्यांचे जे कोणी देव वेदांमध्ये आपल्याला दिसतात, त्यांच्यापैकी प्रमुख नायक ‘इंद्र’ याच्याच ‘पुरंदर’ या नावात नगरे फोडल्याचा उल्लेख दिसतो. त्याने फोडलेली नगरे म्हणजे सिंधूकाठची मोहेंजोदरो, हरप्पा हीच. आणि त्याने मारलेले मूलनिवासी म्हणजे तिथे ज्यांचे सांगाडे सापडले, तेच लोक. त्यामुळे त्यांच्या विध्वंसाला इंद्रच जबाबदार आहे. हे सर्व निष्कर्ष मांडणारा ‘Indra stands accused’ या मथळ्याचा त्यांचा एक दीर्घ निबंधच आहे. या संशोधनाद्वारे व्हीलर यांनी इंद्राला एकप्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यातच आणून उभे केले, एका वैदिक नायकाला खलनायक करून टाकले. नुसते इतकेच नव्हे, तर याद्वारे प्राचीन भारतीय मानचिह्नांचे प्रतिमाहनन करून त्यांच्याविरुद्ध संशयाचे बी सुद्धा लोकांच्या मनात पेरले.


पुरावे काय सांगतात


आतापर्यंत आपण या विषयात एकूण जेवढा विचार केला, तो काय सांगतो? सगळ्यात पहिली गोष्ट आपण विविध पुराव्यांनिशी पाहिली, ती म्हणजे ‘आर्य’ हे काही कुठल्या एखाद्या विशिष्ट जमातीचे किंवा वंशाचे नाव नाही. तो ‘उदार-चरित’, ‘थोर’, ‘श्रेष्ठ’, ‘पूज्य’, ‘आदरणीय’ अशा अर्थाचा गुणवाचक शब्द आहे. व्याकरणाच्या भाषेत सांगायचे तर, तो शब्द म्हणजे नाम नाही, तर विशेषण आहे. या शब्दाचा हाच अर्थ सातत्याने अनेक शतके प्रचलित राहिलेला आहे. दुसरी एक गोष्ट विविध पुराव्यांनिशी पाहिली, ती म्हणजे या तथाकथित आक्रमणानंतर आर्यांनी जे वेद निर्माण केले, त्यांच्यात इंद्राचे पराक्रम बरेच सापडतात, पण त्यांच्यापैकी कुठल्याही कथेचा अर्थ ‘इंद्राच्या नेतृत्वात आर्यांनी आक्रमण केले आणि निष्पाप नागरिकांचा विध्वंस केला’ असा होत नाही. यासाठी उदाहरणे म्हणून अशा काही कथाही आपण पाहिल्या, अजूनही सांगता येतील. इंद्राचे तिथे वर्णन केलेले जे शत्रू दिसतात, ते तत्कालीन स्थानिक लोकांचे शत्रू होते, त्रासदायक व उपद्रवी लोक होते, समाजकंटक होते. त्यांचे निर्दालन करणारा तत्कालीन राजा (उदाहरणार्थ राजा सुदास) एतद्देशीय स्थानिक राजाच होता, कुणी परकीय आक्रमक नव्हता. त्याची सहायक देवता इंद्र स्वत: आणि असे अनेक स्थानिक राजे मिळून अशी लोकोपयोगी कामे करीतच असत – भले त्या कामांमध्ये त्यांना शत्रूची नगरेही फोडावी लागली, तरी बेहत्तर. उपद्रवी आणि समाजकंटक लोकांचा बिमोड करताना दयामाया नाहीच! अगदी मध्ययुगीन काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज अथवा त्यांच्यासारख्या इतरही महापुरुषांच्या चरित्रात अशाच प्रकारचे प्रसंग सापडतात. हा शिरस्ता सार्वकालिक आहे. इथे ‘आर्य वंश / जमात’ म्हणजे एक कपोलकल्पित कुतर्क ठरतो, त्यांचे आक्रमण म्हणजे पाश्चात्त्य विद्वानांनी उठवलेला नुसताच एक वैचारिक धुरळा ठरतो, तर त्यामुळे ‘इंद्र’ इथे निर्दोष सुटतो! उत्खननात सापडलेल्या मानवी सांगाड्यांच्या बाबतीत आपण पुढे स्वतंत्र विचार करणारच आहोत, त्यातले तथ्य-मिथ्य आपण तेव्हा पाहू.



खरा आरोपी

एकूणच या सर्व संशोधनात इंद्राला विध्वंसक मानणे, त्याला त्याबद्दल जबाबदार धरणे, या सर्व तर्कांची संगती लागताना कुठेच दिसत नाही. हा व्हीलर महोदयांचा तर्क तर चुकलेला दिसतोच. पण त्यांचीच री ओढत आपला अभ्यास पुढे नेणारे आणि त्याच्या आधारे भारतीय समाजात दुफळी माजवून देणारे तरी कुठे बरोबर ठरतात? अशा भरकटलेल्या संशोधनातून भारतीय समाजात वैमनस्य पसरवणे, सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवून टाकणे, प्राचीन भारतीय संस्कृतीचे आणि मानबिंदूंचे खच्चीकरण करणे, या सर्व आरोपांखाली उलट मोर्टिमर व्हीलर यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे. हे त्यांच्यावरचे नुसतेच आरोप नाहीत, तर ते सिद्ध करणारे असंख्य पुरावे आणि दाहक प्रसंग भारताच्या आधुनिक इतिहासात पदोपदी दिसतात. त्यामुळे मोर्टिमर व्हीलर हे भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक विश्वातले नुसतेच आरोपी नाहीत, तर साक्षात काळाचे गुन्हेगार ठरतात.


(क्रमश:)
- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात 'भारतविद्या' अथवा 'प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@