बेस्टमध्येही `कोरोना मृत` कामगारांची लपवाछपवी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |

BEST_1  H x W:

प्रशासन म्हणते ८ जणांचा मृत्यू; कामगार संघटना म्हणते ५० हून अधिक मृत्यू

मुंबई : अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सेवा देताना बेस्ट उपक्रमाच्या आठ कामगारांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर ५० हून अधिक कामगारांचा मृत्यू झाल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे बेस्टमध्येही कामगारांची मृत्यूसंख्या दडवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा देताना बेस्टच्या ५७५ कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. बेस्ट कामगारांमध्ये कोरोना वाढत असला तरी ४३५ कामगार बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे हे प्रमाण ७५ टक्के असल्याचे बेस्टने म्हटले आहे. बेस्ट प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोनाने ५० पेक्षा अधिक कामगार दगावल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.


लॉकडाऊनच्या काळात बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी दिवस-रात्र काम करीत होते. आता लॉकडाऊन शिथील केल्यामुळे पूर्ण क्षमतेने आता गाड्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र बेस्टचे चालक-वाहक यांच्या सुरक्षेबाबत बेस्ट प्रशासन अजूनही संवेदनशून्य आहे. बेस्टच्या कामगारांना पालिका प्रशासनाने सुरक्षा विमाकवच मंजूर केले असले तरी चालकाच्या कॅबिनला संरक्षणासाठी योजलेले प्लास्टिक सुरक्षा कवच अजूनही कागदावरच आहे. आता बेस्टच्या सर्व आगारात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्याने कामगारांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याकडे चौकशी केली असता १० कामगारांच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे अधिकृत अहवाल येणे बंद झाले आहे. बेस्ट समितीच्या अध्यक्षांकडे १० मृत्यूची माहिती असेल तर प्रशासनाने दिलेली आठ मृत्यूची माहिती कमी संख्या दाखवणारी आहे. म्हणजेच प्रशासन मृत्यूसंख्या दडवत असल्याच्या संशयाला पुष्टी मिळते.


बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्याकडे चौकशी करता त्यांनी कोरोना मृतांचा निश्चित आकडा सांगण्यास असमर्थता व्यक्त केली. मात्र एकूण मृत्य़ू ४० च्या आसपास असण्याची त्यांनी शक्यता वर्तवली. बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी मात्र बेस्टमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ८० च्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली.


बेस्ट प्रशासनात मात्र याबाबत काहीही निश्चितपणे सांगितले जात नाही. प्रत्येक खात्याच्या प्रमुखाने याबाबतची माहिती आयटी विभागाकडे तेथून पर्सनल विभागाकडे देणे आवश्यक असताना ती दिली जात नाही. महाव्यवस्थापकांनी ते अधिकार स्वतःकडे ठेवले आहेत, असे समजते. त्यामुळे बेस्टमध्ये प्रत्येक खात्याचा अधिकारी दबक्या आवाजात बोलत आहे.

१० कामगारांचा मृत्यू
माझ्याकडे अधिकृत संख्या नाही. परंतु बेस्टच्या कर्मचाऱ्यांची १० मृत्यूपर्यंतची संख्या आहे. प्रशासनाकडे अजूनही पीएम रिपोर्ट आलेला नाही. काही संशयास्पद मृत्यू असल्याने निश्चित काही सांगता येत नाही. सीएमओशी आजच बोलणे झालेले आहे. दोन दिवसांत रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मृत कर्मचाऱ्यांची नक्की माहिती मिळेल.
-अनिल पाटणकर, अध्यक्ष, बेस्ट समिती



मृत्यू निश्चित सांगता येणे अशक्य
बेस्टचे ६१० कामगार पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी ४०७ बरे झाले आहेत. ७५.५ टक्के रिकव्हरी रेट आहेत. कोरोनाचे मृत्यू किती हे निश्चित सांगता येत नाही. मात्र ४० च्या आसपास मृत्यू आहेत. त्यापैकी बेस्टमध्ये कामावर असतान किती मृत्यू झाले आणि घरी असताना किती मृत्यू झाले हे महापालिका त्यांच्या नियमानुसार ठरवील. कारण मृत्यू दिनांकापासून चौदा दिवसांच्या आत जो कामावर होता त्याला ५० लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
- सुहास सामंत, अध्यक्ष-बेस्ट कामगार सेना


मृत कामगारांची संख्या लपवली जातेय
प्रशासन देत असलेल्या माहितीपेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. मृत कामगारांची यादी अजून अपडेट व्हायची आहे. तरीही ६ जूनपर्यंत ५८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांची यादी आहे. त्यानंतरचे मृत्यू पकडून ही संख्या अधिक होऊ शकते. यादी आल्यानंतर ते जाहीर करण्यात येईल. मात्र प्रशासन अजून पर्यंत आठ मृत्यू असल्याचे सांगत आहे. मृतांची आठ ही संख्या १७ मे पर्यंतची आहे. त्या दिवसापर्यंत आमच्याकडे १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तेव्हा १२० कामगार पॉझिटिव्ह होते. तर आता ५५० हून अधिक पॉझिटिव्ह आहेत. प्रशासनाने संख्या देणेच बंद केलेले आहे. त्यामुळे मृत कामगारांची संख्या लपवली जात आहे.
- शशांक राव, सरचिटणीस- बेस्ट वर्कर्स युनियन







@@AUTHORINFO_V1@@