उपासमारीची भीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |


railway_1  H x



मुंबई उपनगरी रेल्वे १२ ऑगस्टनंतर सुरू होणार, हे आत रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याने उपनगरातील आणि दूरवरच्या भागात राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या पोटात भीतीचा गोळा येणे साहजिकच आहे. एकतर कोरोनाच्या भीतीने मुळातच त्यांना सुमारे अडीच महिने सक्तीने घरी बसावे लागले. काहींना ‘वर्क फ्रॉम होम’ची संधी मिळाली, काहींना त्यांच्या कंपनीने उदार झाल्यासारखे अर्धा पगार देऊन मेहेरबानी केली, तर काहींना तेवढीही मदत न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जी काही पुंजी होती ती ‘लॉकडाऊन’च्या काळात संपली. अर्थात, टाळेबंदीने कंपन्यांचे अर्थचक्र फसले असेल, तर त्या तरी कुठून मदत करणार, हा प्रश्न शिल्लक राहतोच. ‘कंपनी जगली तर कामगार जगेल आणि कामगार जगाला तर कंपनी जगेलहे एकमेकांना पूरक तत्त्व या कोरोनामुळे तकलादू ठरले. ‘लॉकडाऊन’ शिथील झाल्यानंतर आता लोकल सुरू होईल आणि आपली रोजीरोटी सुरू होईल, या आशेवर असतानाच रेल्वे मंत्रालयाने लोकल १२ ऑगस्टनंतर सुरू होणार असल्याचे जाहीर करून त्यांच्या आशेवर बॉम्बगोळाच टाकला. सध्या भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्या चकमकीमुळे कधीतरी संग्राम सुरू होऊन बॉम्बगोळ्यांचा मारा सुरू होईल, अशी भीती असतानाच दीड महिना उशिरा रेल्वे सुरू होण्याचा ’बॉम्बगोळा’ मुंबईकरांना जास्त घातक वाटू लागला आहे. आता ‘बेस्ट’ उपक्रमाच्या बसेस धावत आहेत. पण, त्यांचेच कामगार ‘लॉकडाऊन’मुळे कुठेना कुठे अडकल्याने पूर्ण क्षमतेने बस रस्त्यावर धावत नाहीत. ज्या बसेस धावत आहेत, त्या कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रवासी घेत आहेत. त्यामुळे २२ लाखांची प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेस आता सात लाखांपर्यंत प्रवासी वाहतूक करीत आहेत. ७५ लाखांची क्षमता करणारी रेल्वे २५ लाख प्रवाशांची वाहतूक करीत आहे. म्हणजेच ९० लाख प्रवाशांपैकी १० लाख प्रवासी इतर लोक गृहीत धरले, तर कामानिमित्त प्रवास करणार्‍या ५० लाख कर्मचार्‍यांना घरी बसून राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणार्‍यांच्या उपासमारीची दाखल घेणे आवश्यक आहे.
 

नवसंजीवनी


एखाद्या व्यक्तीला मिळणारे पुरस्कार समाजातल्या इतरांना प्रेरणादायी असतात. तो पुरस्कार योग्य व्यक्तींना मिळाला, तर त्या व्यक्तीपेक्षा पुरस्काराचे महत्त्व वाढते. नुकताच राज्य शासनाचा ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार’ मधुवंती दांडेकर यांना जाहीर झाला. सध्या संगीत नाटके आणि त्याचा रसिकवर्ग कमी झाल्याने अण्णासाहेब किर्लोस्कर आणि मधुवंती दांडेकर यांच्याविषयी आजच्या पिढीला फारच थोडी माहिती असेल. एका पानभर बातमीचा आशय एक छायाचित्र सांगून जाते. त्याचप्रमाणे दोन-अडीच तासांचे नाटक एका काळाचे वर्णन डोळ्यांपुढे उभे करते. त्यातून ते संगीत नाटक असेल तर त्यातील नाट्यगीत (पद) त्या काळातील प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे करते. राम गणेश गडकरी यांचे संगीत एकच प्यालाहे नाटक दारूमुळे कुटुंबाची कशी वाताहात होते ते सांगते. गोविंद बल्लाळ देवल यांचे संगीत ’शारदा’ हे नाटक बालविवाहाचे दुष्परिणाम सांगते. नाटकातील गीते, त्यांना लावलेल्या चाली, त्याचे संगीत आणि ते गीत गाणारी अभिनेत्री त्या नाटकाचा आशय सांगून जातात. आता ज्यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे, त्या मधुवंती दांडेकर यांची संगीत रंगभूमीवरील कारकिर्द मोठी आहे. सुमारे ५५ वर्षे त्या संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. शालेय वयापासूनच त्यांनी गायन व नाट्य स्पर्धांमधून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. स्वरराज छोटा गंधर्व, संगीतभूषण पंडित राम मराठे, पंडित ए. के. अभ्यंकर, पंडित यशवंतबुवा जोशी यांसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. सुमारे २५ मराठी संगीत नाटकांमधून त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या. त्यापैकी ’रणदुन्दुभी’ या नाटकात त्यांनी गायलेले पद ’परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे आजच्या अराजकतेच्या परिस्थितीवर प्रकाश टाकते. हे त्या गीतातील शब्दांचे सामर्थ्य असले, तरी ते सादर करण्याची मधुवंतीची कलाही तितकीच सामर्थ्यवान आहे. आज त्यांचे वय ७२ वर्षे आहे. ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ त्यांना योग्य वेळी जाहीर झाला आहे. या पुरस्कारापासून संगीत रंगभूमीला नवसंजीवनी मिळेल हे नक्की!
 

- अरविंद सुर्वे

 
@@AUTHORINFO_V1@@