‘एव्हरीबडीज लाईव्हज मॅटर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020   
Total Views |


black live matter_1 

 



नो जस्टीस नो पीस
ब्लॅक लाईव्हज मॅटर...

 



सध्या जगभरात ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन सुरू आहे. अमेरिकेमध्ये ऐतिहासिक परंपरा असलेले श्वेत-कृष्णवर्णीयांचा संघर्ष. मात्र, या संघर्षाची किनार घेत, जगभरात छोटे-मोठे उठाव होताना दिसत आहेत. नव्हे नव्हे कुठची तरी छुपी शक्ती या उठावांना अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक प्रोत्साहन देत असावी, असे दिसते. अमेरिका, युरोप, ऑस्टे्रलिया आणि जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही खंडातल्या कोणत्याही देशात माणसाने कसे दिसावे, याचे मापदंड आखलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जरा काही वेगळे दिसले की लगेच त्या वेगळेपणाचे एक तर कौतुक तरी होते किंवा त्या वेगळेपणाची कठोर निंदा तरी होते. अर्थात, जर वेगळेपण सशक्त असेल, शक्तिमान आणि वर्चस्ववादी असेल तर त्याचे कौतुकच होणार. माझे जे काही तेच श्रेष्ठच, हा भ्रम निर्माण झाला की तिथेच दुसर्‍याच्या ‘लाईफ’चा प्रश्न निर्माण होतो.

 


असो, पण खरे पाहिले तर मानवतावादाच्या नावाखाली सुरू असलेल्या सर्वच आंदोलनांचे हे अपयश म्हणावे लागेल की, ते भेदभाव आणि संकुचितवादाविरोधात संघर्ष करतात. मात्र, संघर्ष करताना त्यांचा पाया हा स्वत:च संकुचितवादी असतो. याचे उत्तम उदाहरण आहे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ आंदोलन. ‘ब्लॅक’ अर्थात कृष्णवर्णीय व्यक्तीचे ‘लाईफ’ ‘मॅटर’ करते असा याचा अर्थ. मग बाकीच्यांचे जगणे ‘मॅटर’ करत नाही का? समान धर्म, समान आर्थिक व्यवस्था माणसातील भेद मिटवू शकतो का? या सगळ्या प्रश्नांना भेदत आज जगात एकच वास्तव समोर आले आहे की, जोपर्यंत विघातक मानसिकता आहे, तोपर्यंत कोणी कितीही समान असले तरी एका पातळीवर असमानता शोधून त्याचे भांडवल केले जाणारच.

 


याचा अर्थ असा नाही की, कृष्णवर्णीयांवर अत्याचार होतच नसतील. होतातच, पण मग प्रश्न येतो की, आजही पाश्चिमात्य चित्रपटसृष्टीत कृष्णवर्णीय कलाकार आहेत. मोठे मोठे उद्योगपती कृष्णवर्णीय आहेत. त्यांच्याबाबतीत ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे तंत्र लागू पडते का? याबाबत असे दिसते की, हे सगळे जण ‘ब्लॅकपणा’च्या भावनात्मक न्यूनगंडापासून, साामजिक ‘घेट्टो’तून मोठा संघर्ष करून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे जगभरातले सगळेच श्वेतवर्णीय फारच मौलिक आणि अतिशय स्वर्गीय जगणे जगत आहेत का? तर असेही नाही. बालमजूर, वेश्या व्यवसाय आणि कसल्या-कसल्या अमानवीय उद्योगांमध्ये कृष्णवर्णीयांसोबत श्वेतही आहेतच. फरक इतकाच की, त्याचे प्रमाण कमी आहे. त्यांचे प्रमाण कमी, यांचे प्रमाण जास्त असे म्हणण्यापेक्षा श्वेत आणि कृष्ण दोघांनाही अमानवीय जगणे जगावे लागू नये, यासाठी कोण विचार करणार? ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन शाश्वत मानवी मूल्यांच्या आधारे सुरू झाले असेल. पण, जगभरात आजही सगळ्या भेदापलीकडे जाऊन अन्याय-अत्याचार घडतोच आहे. अर्धे जग नशेच्या अधीन आहे. त्यात रंगभेद नाही. आज जग कोरोनाच्या विळख्यात आहे. हा विळखा तर सगळेच भेद पार करतो. दहशतवादी कारवाई करणारे ही दहशतवादी कृत्य करताना सरसकट रंगभेद न करता अत्याचार करतच आहेत. मग या सगळ्यामध्ये भरडल्या जाणार्‍यांचे ‘लाईव्हज मॅटर’ करत नाही का? जगात नव्हे, या ब्रह्मांडात जे जे अस्तित्वात आहे, ते सगळे मॅटर’ असते.

 


अर्थात, यावर आपल्या येथील काही व्यक्ती आसुरी आनंदाने ‘ब्लॅक’ आणि ‘दलित’ यांचे सख्खेपण व्यक्त करतात. पण, ‘ब्लॅक’ आणि ‘दलित’ या दोघांमध्येही कसलीच समानता नाही. समानता आहे ती या दोघांच्याही परिस्थितीचा फायदा उठवत स्वत:चा स्वार्थ साधणार्‍या विघातक शक्तींमध्ये. तीच शक्ती जी पाश्चिमात्य राष्ट्रांत ‘अँटिफा’ म्हणजे ‘अँटी फॅसिस्ट’ म्हणून श्वेत-कृष्णवर्णीयांमधली दरी कमी करण्याऐवजी त्यांच्यामध्ये द्वेष वाढवते. आपल्या भारतात ‘तुकडे-तुकडे गँग’ म्हणून सदासर्वदा देशाच्या नावाने बोंबलत असते. हीच तुकडे तुकडे गँग’ ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या आड भारतामध्ये विघातक वृत्ती पेरण्याच्या प्रयत्नात आहे. पण, इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. या संविधानात ‘एव्हरीबडी लाईव्हज मॅटर’ असणारी तत्त्वे/हक्क/कर्तव्य सांगितली आहेत आणि तीच सगळ्या भारतीयांच्या विविधतेतली शक्ती आहे.

 

 
@@AUTHORINFO_V1@@