‘कोरोना’ आणि कंपनी-कर्मचार्‍यांमधील बदलांची नांदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs



कोरोनामुळे उद्योगजगतात व्यवसायाबरोबर कर्मचार्‍यांच्या कार्यशैलीतही आमूलाग्र बदल झाले. अनेक आव्हानांचा सामना करत कामकाजाचा वेग मात्र कायम राहिला. तेव्हा, आता या पहिल्या टप्प्यातील यशानंतर गरज आहे ती पूर्णपणे सावरण्याची आणि जिद्दीने उभं राहण्याची...



‘कोविड-१९’ म्हणजेच कोरोना विषाणूमुळे जागतिक स्तरावर आर्थिक-औद्योगिक, राजकीय-आरोग्यविषयक स्तरावर दूरगामी परिणाम झाले. त्यातच उद्योग-व्यवसायातील कंपनी-कर्मचार्‍यांच्या कामकाजात झालेले बदल अनेकांसाठी आणि अनेकार्थांनी परिणामकारक ठरले आहेत.कोरोनाच्या निमित्ताने कंपनी आणि कर्मचारी, या उभयंतांना प्रामुख्याने काही गोष्टी ध्यानात आल्या. अनपेक्षित व अकल्पितपणे झालेल्या बदलांमुळे कंपन्यांना त्यांचा उद्योग-व्यवसाय व कर्मचार्‍यांना त्यांचे कामकाज आणि कामाचे स्वरूप यामध्ये तातडीने व महत्त्वपूर्ण बदल करावे लागले. मुख्य म्हणजे, अशा अनपेक्षित व अकल्पितपणे बदलांसाठी कुणाचीही पूर्वतयारी नव्हती. या बदलांच्या पार्श्वभूमीवर मार्च ते मे २०२०च्या दरम्यान कंपनी आणि कर्मचार्‍यांना वैयक्तिक स्तरावर मोठे बदल अल्पावधीत आत्मसात करावे लागले व त्यांची अंमलबजावणीही करावी लागली. मोठ्या इंजिनिअरिंग-वाहननिर्मिती उद्योगांनी व्हेंटिलेटर्स बनविणे, जुजबी कौशल्यधारक व्यक्तींनी कापडी मास्कची निर्मिती करणे, तर हॉटेल्सचे हॉस्पिटलमध्ये झालेले व्यावसायिक परिवर्तन इत्यादीचा यासंदर्भात प्रामुख्याने व प्रातिनिधिक उल्लेख करता येईल. कर्मचार्‍यांच्या संदर्भात सांगायचे तर, ‘लॉकडाऊन’, त्यातील विविध बंधने, पगारकपात अथवा त्याला विलंब, घरातील ताणतणाव, सद्यस्थितीसह भविष्यकाळातील अनिश्चितता इ. विपरीत स्थितीतही कर्मचार्‍यांनी संयम कायम ठेवला. आपले पारंपरिक व प्रिय कामकाज सोडूनही, आपण आपल्या कौशल्य व कामगिरीच्या आधारे व्यावसायिक आव्हानांवर अल्पावधीत व यशस्वीपणे मात करू शकतो, हे त्यांनी साधार सिद्ध केले. कर्मचार्‍यांनी कंपन्यांच्या व्यावसायिक गरजांना दिलेला हा सकारात्मक प्रतिसाद म्हणूनच कौतुकास्पद आणि लक्षणीय ठरतो.





परंपरागत स्वरुपात सांगायचे झाल्यास, व्यवस्थापन-कंपनी स्तरावर प्रत्येक कर्मचार्‍याच्या कामकाजाचे निर्धारण करून त्याला शब्दबद्ध केले जाते. कर्मचार्‍यांच्या कामकाजाची ही विहित चाकोरी ठरवून त्यानुसारच प्रत्येक कर्मचार्‍याची मुलाखत घेऊन, त्याची विशिष्ट पदावर व कामासाठी निवड केली जाते. त्यानंतरही तंत्रज्ञान-कामकाज, कार्यपद्धती, व्यावसायिक गरजा, कर्मचार्‍यांचा अनुभव, त्यांचा विकास, प्रशिक्षण इत्यादी नुसार व संबंधित कर्मचार्‍यांची क्षमता-कार्यक्षमतेच्या आधारे त्यांचे काम, जबाबदारी यामध्येही कालसापेक्ष बदल होत असतात. कालांतराने त्यामध्ये वाढही होत जाते. मात्र, रुढार्थाने व मोठ्या संख्येत कर्मचार्‍यांच्या कामाचे मूळ स्वरूप साधारणपणे कायम राहते. कोरोनामुळे मात्र कंपनीतील कर्मचार्‍यांच्या कामकाजासंदर्भातील धारणेलाही छेद देण्यात आला आहे. ‘कोविड-१९’नंतरच्या २०२०या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या उद्योग-व्यवसाय क्षेत्राने बदलाचे नियोजन-व्यवस्थापन कसे करावे व ते कशा प्रकारे यशस्वीपणे अंमलात आणावे, याची शिकवण केवळ समाजालाच नव्हे, तर उभ्या जगातील व्यवस्थापन-व्यावसायिकांना आपल्या कृतिशीलतेद्वारा घालून दिली आहे. तसे पाहता, व्यक्तिगत स्वरुपापासून व्यावसायिक स्तरापर्यंत, व्यावसायिक नीतीपासून वैयक्तिक कामकाजापर्यंत बदल करणे व या बदलांची अंमलबजावणी करणे, हे बरेचदा व वेळोवेळी आवश्यक व गरजेचे असले तरी ते सहजसाध्य मात्र नसते. कामकाज वा कार्यपद्धती, उत्पादन-सेवा प्रक्रिया, कर्मचार्‍यांची बदली इ. विविध प्रकारच्या बदलांना सर्वसाधारणपणे विरोधसुद्धा होतो. व्यवस्थापन-व्यवस्थापकांचा मोठा वेळ व प्रयत्न वरील प्रकारचे बदल घडवून आणण्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यात तर जातो. मात्र, त्यामुळे यश मिळतेच असे नाही. कोरोनानंतरची स्थिती मात्र याबाबतही आश्चर्यजनक स्वरुपात अपवादात्मक ठरली. बदलांच्या अंमलबजावणीचे हे सकारात्मक स्वरूप भारतीय औद्योगिक क्षेत्राचे सामर्थ्य असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले.




याशिवाय कोरोनामुळे जागतिक स्तरावर उद्योग-व्यवसायाच्या संदर्भात स्पष्ट झालेली बाब म्हणजे, केवळ व्यापार-उद्योग, व्यवसाय-व्यवस्थापनच नव्हे, तर थेट कर्मचारी स्तरापर्यंत लवचिक, कार्यक्षम पद्धतीने बदलण्याची क्षमता व मानसिकता असणे नितांत आवश्यक आहे. आपल्याकडे हीच आवश्यक बाब तुलनेने अल्पावधित व पुरेशा कार्यक्षम पद्धतीने सिद्ध झाली आहे. कंपनी-कर्मचार्‍यांनी कठीण परिस्थितीत व अनपेक्षितपणे उद्भवलेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जाऊन त्यावर यशस्वीपणे मात केली. त्यासाठी जबाबदारी, सहकार्य, समन्वय, कार्यक्षम प्रतिसाद, परस्पर संबंध, आपले काम आणि कार्यक्षमतेवर कर्मचार्‍यांनी विश्वास ठेवला. अत्यंत विपरीत स्थितीतही संयुक्त स्वरुपात यश प्राप्त केले जाऊ शकते, हे भारतीय कर्मचार्‍यांनी सिद्ध केले. हे बदल आत्मसात करण्यासाठी कंपनी-व्यवस्थापन स्तरावर धोरणात्मक निर्णय, तर कर्मचारी स्तरावर त्याची व्यक्तिगत अंमलबजावणी होणे, ही बाब आगामी काळाची सामूहिक व्यावसायिक गरज ठरणार आहे. या बदलत्या परिस्थितीत, कोरोनामुळे फार मोठ्या संख्येने कामगारांनी आपल्या गावची वाट धरल्यानंतर नव्याने निवृत्त झालेल्या वा सल्लागार अथवा अंशकालीन काम करणार्‍या अनुभवी व तज्ज्ञ मंडळींना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्याचीही सकारात्मक उदाहरणे आहेत. बंगळुरु येथील ‘रिफनर्स डॉट कॉम’ या व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे संस्थापक नमन सरावगी यांच्या मते तर ‘कोविड-१९’ मुळे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व विशेषतः नव्याने निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना बदलत्या व्यावसायिक परिस्थितीत मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून हीच स्थिती नजीकच्या भविष्यात कायम राहील, असे स्पष्टपणे दिसून येते. ‘रिफनर्स डॉट कॉम’तर्फे कोरोनानंतरच्या परिस्थितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना उपलब्ध झालेल्या वा उपलब्ध होऊ घातलेल्या संधींच्या संदर्भात विशेष अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये अंशकालीन स्वरुपात काम करणारे १४हजार अनुभवी तज्ज्ञ-अधिकारी सहभागी झाले होते, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. या अभ्यासात प्रतिसाद देणार्‍यांपैकी अधिकांश म्हणजे ६४टक्के व्यक्तींनी असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, मार्चच्या तुलनेत मेमध्ये त्यांच्याकडील कामकाजात लक्षणीय स्वरुपात वाढ झाली असून, यामुळे त्यांना नव्याने व्यावसायिक स्थिरताही प्राप्त झाली आहे.

‘कोरोना काळानंतर व्यावसायिकांची व्यवसायवाढ’ या शीर्षकासह नव्यानेच प्रकाशित झालेल्या या अभ्यासपूर्ण अहवालात देशांतर्गत व्यावसायिक स्थितीवर साधार भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मार्च २०२०मध्ये म्हणजेच, राष्ट्रीय स्तरावर ‘लॉकडाऊन’ सुरू होण्यापूर्वी करण्यात आलेल्या एकूण व्यावसायिक देयकांपैकी ६३ टक्के देयकांचे देणे संबंधित उद्योग-व्यावसायिकांना होणे, ही बाबही उद्योग-व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणारी ठरली आहे. कोरोनाच्या निमित्ताने देशांतर्गत आर्थिक-औद्योगिक पातळीवर, तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तीपासून ते व्यवस्थापन-व्यावसायिक स्तरावर जे बदल अंमलात आणले गेले, त्याला या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात यश मिळाल्याचे दिसते. आता अर्थातच गरज आहे ती या सर्वस्तरीय प्रयत्नांना अधिक परिणामकारक व खर्‍या अर्थाने व दूरगामी स्वरुपात ‘अर्थपूर्ण’ बनविण्याची!


- दत्तात्रय आंबुलकर

(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@