आज पुन्हा एकदा सिंहनाद होऊ दे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |
emergency_1  H




भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वथा निंदनीय, देशातील जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्यास बाधक, जुलमी हुकूमशाहीचा ‘काळा कालावधी’ ठरावा असा २५ जून १९७५ मध्यरात्रीपासून २१ मार्च १९७७ या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागू केलेली ‘आणीबाणी.’ त्यावेळी भगूरसारख्या क्रांतिकारी गावातून रा. स्व. संघाच्या प्रमुख व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यामध्ये भगूरचे तत्कालीन शहर संघचालक स्व. तुकाराम बुवा तथा दादा राहाणे, ज्येष्ठ स्वयंसेवक मधुकर अण्णा जोशी, शंकरराव सहादू शेटे, श्रीधरपंत तुकाराम राहाणे, रामदास मुरलीधर आंबेकर आणि एकनाथराव सहादू शेटे यांचा समावेश होता. या आणीबाणीस आता ४५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर मी एकनाथराव शेटे यांची भेट घेतली. त्यातून त्यांच्याकडून प्रत्यक्ष आणीबाणीमध्ये अटक झाल्याचे स्वानुभव व तत्कालीन सर्व परिस्थितीची जवळून माहिती मला प्राप्त झाली.


दि. १३ नोव्हेंबर १९७५ रोजी रविवार कारंजा, नाशिक येथे असताना पोलीस अधिकारी वर्गाने एकनाथ शेटे यांना प्रत्यक्ष अटक केली आणि सरळसरळ रा. स्व. संघाचे सक्रिय स्वयंसेवक आहेत, म्हणून त्यांच्यावर ‘मिसा’ कायदा लावून सेंट्रल जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे मोठे बंधू स्व. शंकरराव सहादू शेटे यांनादेखील अटक करण्यात आली. यावेळी आपण समजू शकतो की, जेव्हा एकाच कुटुंबातील दोन ज्येष्ठ बंधूंना जेलमध्ये डांबण्यात येते, तेव्हा घरच्या मंडळींवर काय किती मोठे संकट कोसळले असेल? परंतु, तरीही न डगमगता त्यांच्या कुटुंबीयांनी या संकटास मोठ्या धीराने तोंड दिले. या भगूरमधील संघ स्वयंसेवकांसोबत परिसरातील दे. कॅम्प येथील शाम बालानी, हरिभाऊ दोंदे, विंचुरी दळवी येथील नामदेव दळवी यांनादेखील अटक करण्यात आली.



त्याचवेळी समाजातून जुलमी शासनाच्या भीतिपोटी सर्व स्तरांवर विरोध, अपमान व क्लेशदायक अनुभव वाट्याला येत होते. ‘मिसाबंदी’च्या कुटुंबीयांना उधारी बंद करण्यात आली. एकनाथराव शेटे यांना जेलमध्ये ‘सेपरेट-४’ मध्ये ४८ क्रमांकाच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत पेठ (नाशिक)चे अण्णा गजभार हे स्वयंसेवक त्यांच्या कोठडीत स्थानबद्ध होते. सुरुवातीच्या काळात त्यांना घरच्यांना भेट देण्यास टाळले जाई. परंतु, नंतर घरच्यांची महिन्यातून दोनच वेळा भेट होत असे. अशा घातक वातावरणातसुद्धा शेटे कुटुंबात या स्थितीचे आश्चर्य तथा भीती त्यांच्या मनात नव्हती. कारण, हे देशकार्य आहे, देशसेवा आहे, हीच भावना त्या कुटुंबात प्रामुख्याने होती. एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी काहीही अडचण असल्यास आपल्या इतर स्वयंसेवकांच्या माध्यमातून त्या गरजू कार्यकर्त्यांच्या घरी पैसे तथा आवश्यक साहित्य पोहोचवले जायचे.


 
जेलमध्ये अनेक स्वयंसेवकांना त्यांच्या घरची मंडळी भेटण्यात येत असत. परंतु, एक औरंगाबादचे स्वयंसेवक कार्यकर्ते होते, त्यांना जवळजवळ एक वर्ष होत आले. परंतु, त्यांच्या घरून त्यांना भेटण्यास कोणीच आले नव्हते. शेटे सरांनी त्या कार्यकर्त्यास सहज विचारले, “वर्षभर तुम्हाला कोणीच भेटण्यास का नाही आले?” त्यावेळी त्या औरंगाबादच्या स्वयंसेवकाने सांगितलेले उत्तर हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यांनी सांगितले की, “घरून नाशिकला येण्यासाठी एका माणसास एका बाजूने २५ रुपये भाडे लागते. येऊन जाऊन ५० रुपये आणि पत्नीला यायचे तर अजून एक व्यक्ती सोबत आणावी म्हणजे अजून दुप्पट भाडे. तेवढे पैसे माझ्या कुटुंबाकडे नाहीत.” अशा परिस्थितीमध्येसुद्धा प्रत्येकजण किती धैर्याने तोंड देत होता, हे यावरून समजते. पुढे या औरंगाबादच्या कार्यकर्त्यांच्या घरी पैसे पाठवून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घडवून आणली.


जेलमध्येसुद्धा रोज संघशाखा लागत असे. परंतु, ती वेगळ्या पद्धतीने. एका रांगेत न बसता गोल वर्तुळाकार बसत असत. तेथे पद्य, खेळ, बौद्धिक, प्रार्थना होत असे. त्यावेळच्या जेलमधील अन्य सहकार्‍यांमध्ये रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रल्हादजी अभ्यंकर, बाबाराव भिडे, अनंतराव भालेराव (मराठवाडा संपादक), बाळूकाळ दाते, मोहन धारिया (काँग्रेस बंडखोर), तसेच भाजपचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सर्वांच्या सहवासाने एकमेकांना उत्साह अधिक मिळाला. त्यातून पुढे संघटनेचे कार्य वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले. पुढे सर्वांची २१ मार्च, १९७७ रोजी १६ महिन्यांनंतर आणीबाणी संपुष्टात आली आणि सुटका झाली. आजसुद्धा त्यांच्या जेलमधील अनेक सहकार्‍यांशी वैयक्तिक संपर्क आहे. आजसुद्धा विजयादशमी पथसंचलनात एकनाथराव शेटे ‘आज पुन्हा एकदा सिंहनाद होऊ दे’, हे पद्य म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देशप्रेमाचा संस्कार करत असल्याचे जाणवते.

(शब्दांकन - मृत्युंजय कापसे, भगूर)




@@AUTHORINFO_V1@@