स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्यलढा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |

RSS indira gandhi_1 



दि. २५ जून, १९७५ या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली आणि 1947 पासून देशात असलेली लोकशाही जणू स्थगित केली आणि जनतेची विचार, लेखन, अभिव्यक्ती, भाषण, मुद्रण, अशी सर्व प्रकारची घटनादत्त स्वातंत्र्ये हिरावून घेऊन, आपल्या विरोधकांना तुरूंगात डांबून जवळजवळ दोन वर्षे पर्यंत सर्व देशाचाच एक मोठा तुरूंग बनविला होता. या घटनेला आता ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आणीबाणीच्या काळातील संघबंदी आणि स्वयंसेवकांच्या मनोधैर्याच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...



दि. १२ जून १९७५ या दिवशी इंदिराजींच्या निवडणुकीवर आक्षेप घेणार्‍या कै. राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल घोषित करून त्यांची निवड अवैध ठरविली होती. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. कारण, देशाच्या खुद्द पंतप्रधानांचीच निवड अवैध व भ्रष्ट मार्गांचा वापर करून झाल्याचे सिद्ध झाले होते. या निकालामुळे सामान्य जनता आनंदित झाली होती, तर काँग्रेस पक्ष व समर्थक नाराज होते. त्याचबरोबर निरनिराळ्या काँग्रेसशासित राज्यांमध्ये जो भ्रष्टाचार फोफावला होता, त्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड असंतोषही होता. या असंतोषाला वाचा फोडून त्याविरुद्ध जनतेला संघटित करून जयप्रकाशजी नारायण यांनी मोठे आंदोलन गुजरात-बिहारमध्ये उभे केले. अशातच न्यायालयाचा निकालही त्यांच्या विरोधात गेल्याने त्यांचा संताप झाला होता. राष्ट्रपतींनीदेखील आणीबाणीच्या हुकूमावर निमूटपणे सही केली. “मी संघ व संघाची विचारधारा चिरडून टाकेन,” असे जाहीरपणे म्हणणार्‍या व भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला संघाचा पाठिंबा व बळ असल्याने आणीबाणी लागू केल्यावर इंदिरा गांधी यांनी पहिले काम केले, ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. संघ कार्यकर्त्यांची देशभर धरपकड करून ‘मिसा’ कायद्याखाली त्यांना तुरूंगात डांबण्यास सुरुवात केली. त्यांना राजकीय विरोधकांचे व आंदोलन करणार्‍यांचे तेवढे भय वाटत नव्हते, जेवढे संघ व कार्यकर्त्यांचे वाटत होते. याचे कारण संघाचे जे एक देशव्यापी व अनुशासित संघटन होते, तसे अन्य कुठल्याही विरोधी पक्षाचे नव्हते. आणीबाणीच्या आधी दोन वर्ष मी धुळे जिल्ह्यात प्रचारक म्हणून काम करत होतो. १२ जूनला मी व गोविंदराव पूर्णपात्रे दोघेही शिरपूरला तेथील संघचालक बाबुराव वैद्य यांच्याकडेच होतो. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल तेथेच ऐकला. आमचे बोलणेही झाले की, आजसुद्धा रामशास्त्री प्रभुण्यांचे वारस भारतात आहेत. परंतु, त्यावेळी लवकरच आणीबाणीची घोषणा होऊन संघावरही बंदी येईल, याची कल्पनाही आली नाही. त्यामुळे कार्य चालू होते. त्यावेळी आजच्या इतकी संपर्काची साधने नव्हती.



२५ जूनला आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा नंदुरबारमध्ये होतो. संघावर बंदीची बातमी कळल्यावर कोणाच्या घरी उघडपणे जाणेही अवघड झाले. संघकामासंदर्भात जवळ असणारे कागद-वह्या नावांच्या याद्या इत्यादी तातडीने नष्ट कराव्या लागल्या. काही साहित्य (गणवेषासारखे) ज्यांच्याकडे पोलीस येण्याची शक्यता नाही, अशा घरांत लपवाव्या लागल्या. तेथून धुळे मार्गे नाशिकला निघालो, तर मालेगाव येथे आपले एक कार्यकर्ते चंदूजी शिंत्रे गाडीत चढले. त्यांना विचारले तर म्हणाले, “जिल्हा बैठकीसाठी नाशिकला चाललो आहे.” त्यांना तोपर्यंत संघावर बंदी घातली आहे, हेच माहीत नव्हते. संघबंदीचे निमित्त मिळताच शिंत्रेंवर सूड उगवण्याची संधी साधली गेली व त्यांनाही अटक करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचे येथे भिक्षुकीचा व्यवसाय करून अगदी सामान्य आर्थिक स्थितीतील, परंतु संघाशी एकनिष्ठ व संघकार्याविषयी अत्यंत कर्मठ असणार्‍या गोविंदशास्त्री जोशी यांना तर पहिल्या दिवशीच अटक केली गेली व कुठे नेत आहेत, कशासाठी पकडले आहे, याची काहीही कल्पना व माहिती न देता, प्रथम धुळे व नंतर विसापूर जेलमध्ये ठेवण्यात आले. गोविंदशास्त्रींनी आयुष्यात संघासाठी चारवेळा तुरूंगवास भोगला. परंतु, संघ विचारावरील त्यांची निष्ठा कधी तसूभरही कमी झाली नाही. अशी माणसे व स्वयंसेवक हीच संघाची शक्ती आहे व या शक्तीलाच इंदिराजी भीत होत्या. त्यांची भीती किती खरी होती, तेही नंतरच्या निवडणूक निकालाचे सिद्ध झालेच. परंतु, अशा दूर दुर्गम भागात राहणार्‍या सामान्य कुटुंबीयांना कोणत्या मानसिक छळाला सामोरे जावे लागले, त्याची कल्पनाही आज करवत नाही. हीच परिस्थिती देशभर सर्वत्र होती.


३० जूनला प. पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना अटक झाली आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यात हे अटकसत्र सुरू झाले. दरम्यानच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य व संकटाची व्याप्ती यांचे आकलन करून अनेक प्रमुख कार्यकर्ते भूमिगत झाले. गुप्त बैठकांतून चर्चा झाल्यावर संघ अधिकार्‍यांनी या आणीबाणी विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरविले, त्यास झळ बसलेल्या अन्य पक्ष व कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. आणीबाणी विरुद्ध आवाज उठविल्याने एक हजार संघ स्वयंसेवक व अन्य सर्व पक्षांचे मिळून ‘जमात-ए-इस्लामी’ इ. धरून २०० बंदिवान होते. अनेक स्वयंसेवकांना सत्याग्रहाची शिक्षा ही झाली होती व ती शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर पुन्हा ‘मिसा’खाली तुरुंगात डांबले गेले. नाशिकलाही सत्याग्रह केला गेला. वेगवेगळ्या दिवशी व ठिकाणी केला गेला. कार्यकर्ते गर्दीच्या ठिकाणी एकत्र येत, आणीबाणी विरोधात घोषणा देत पत्रके वाटीत. हा गोंधळ होत असतानाच पोलीस येत व या सत्याग्रहींना अटक करीत. या सत्याग्रहांचे नियोजन करीत होते राजाभाऊ गायधनी! आणीबाणीच्या काळातील किंवा एकूणच नाशिकच्या संघकामाचा विचार करताना, रविवार कारंजावरील गायधनींच्या घराची आठवण होणे अनिवार्यच आहे. इतके योगदान या घराचे व घरातील सर्व कुटुंबीयांचे संघकार्यासाठी राहिलेले आहे. पुढे जाऊन राजाभाऊंनाही ‘मिसा’ खाली अटक झाली व रमेश गायधनी यांनादेखील.


नानासाहेब गर्गे यांची शहर संघचालक म्हणून नव्यानेच ७२ साली म्हणजे केवळ तीनच वर्षे आधी नियुक्ती झाली होती. स्वतः प. पू. श्रीगुरुजींनी त्यांची नियुक्ती जाहीर केली होती. तीन वर्षांतच संघटनेवर बंदीचा व शहरप्रमुख म्हणून नानासाहेबांच्या अटकेचा गर्गे कुटुंबीयांवर मोठाच आघात होता. परंतु, या प्रसंगातही त्यांनी दाखविलेले धैर्य व प्रसंगावधान विलक्षण होते. राजाभाऊंनी मला या सत्याग्रहासंबंधीची पत्रके धुळे जिल्ह्यात पोहोचविण्यास सांगितले होते. तेथे रात्रीचे वेळी एका ठिकाणी स्वयंसेवकांचे एकत्रीकरण होते. नानाराव ढोबळेंचे अत्यंत भावपूर्ण ओजस्वी व प्रेरक भाषण झाले. तेथे पत्रके देऊन मी सकाळी शिंदखेड्याला गेलो. तेथेच मी प्रचारक होतो, त्यामुळे ओळखीचा प्रश्न नव्हता. तेथे संघचालक होते जयंतीभाई देसाई. त्यांचा मुलगा सुरेंद्रभाई हाही कार्यकर्ता होता. त्याही घरातील हे दोन्ही कर्ते पुरूष तुरूंगात गेलेले. मी प्रचारक असताना त्यांच्याचकडे जेवत असे. सकाळी तेथे गेल्यावर आधी भाभींना भेटलो. नंतर माझ्या कामाला लागलो. तेथेच कोणाकडे जेवणही झाले. शिंदखेड्याहून निघण्यापूर्वी पुन्हा एकदा भाभींना भेटायला गेलो दुपारी 3च्या सुमारास. गेल्याबरोबर भाभी म्हणाल्या, “आधी जेवण करून घ्या. मी तुमच्यासाठी थांबले आहे.” हे ऐकताच डोळ्यात अश्रूच तरळले. काय ही मानसिकता व संघकार्याविषयीची आत्मीयता व तळमळ! त्यांना बरे वाटावे म्हणून पुन्हा दोन घास खाल्ले आणि निघालो. या प्रसंगाचा माझ्या मनावर जो काही परिणाम झाला, तो शब्दांत सांगू शकत नाही.


नाशिकमधील अनेक संघ कार्यकर्ते या ‘मिसा’च्या वरवंट्याखाली भरडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कोणीही ना माफी मागितली वा तक्रार, कुरकुर केली वा संघाला दूषणे दिली. ही संघ संस्कारांची किमया आहे. उलट जेवढे ‘मिसाबंदी’ आत होते, ते सर्व जण निरनिराळे कार्यक्रम, उपक्रम करून निश्चिंतपणे काळ घालवत होते. संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे, त्याचे यश निश्चित आहे. बाहेर असणारी मंडळी या परिस्थितीतून मार्ग काढणारच, या विश्वासाने निश्चिंत होते. खरे तर बाहेर असणारे कार्यकर्तेच अधिक तणावाखाली वावरत होते. कारण, घडणार्‍या घटना त्यांना लगेच समजत व रोज नवीन समस्येला त्यांना सामोरे जावे लागत असे. या बाहेर राहिलेल्यांमध्ये कै. दिवाकर कुलकर्णी होते. या काळात त्यांनी दाखविलेले धैर्य, प्रसंगावधान, माणसे ओळखण्याची क्षमता याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या अभूतपूर्व अशा संकट काळातही संघकार्य सुरू राहावे, यासाठी सहलीसारख्या कार्यक्रमांचे त्यांनी नियोजन केले. जवळ जवळ दोन वर्षांपर्यंत हा यज्ञ देशात सर्वत्र सुरू होता. त्याची फलनिष्पत्ती निवडणुकांतून जनता पक्षाच्या विजयातून झाली. अशा या अग्निपरीक्षेतून संघ नुसताच सुरक्षितपणे बाहेर आला असे नाही, तर अधिकच तेजाने तळपू लागला. संघाच्या प्रयत्न व योजनांमुळे देशात लोकशाहीची पुन्हा स्थापना झाली हे सर्वांनीच मान्य केले.
एका गीतात म्हटले आहे-
तप्त मुशीतून आले उजळून सोने रसरसले
संघटनेने स्वातंत्र्याला चिरविजयी केले
हे अक्षरशः सत्य आहे. आणीबणीचा जसा त्रास झाला, तसे संघकमाला काही फायदेही झाले आहेत. संघ कार्यकर्त्यांचा आपल्या कामावरील विश्वास अधिक दृढ झाला,आत्मविश्वासही वाढला. आणीबाणी लागू केल्याला 45 वर्षे झाल्याच्या निमित्ताने मागे वळून पाहताना वाटते की, या कथित विचारवंतांना हे संघकामाचे मर्म व महत्त्व कधी उमजेल?


गोविंद यार्दी
(लेखक रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे प्रांत संस्कार आयाम प्रमुख आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@