बांगलादेशींचा चीनविरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2020   
Total Views |

China_1  H x W:

 

भारताशी सीमेवर आगळीक केल्यानंतर चीनचा जळफळाट त्याच्या अशा अनेक कृतींमधून प्रकट होताना दिसतो. पाकिस्तान, नेपाळबरोबरच चीनने आता आपला मोर्चा वळवला आहे तो बांगलादेशकडे. तोच बांगलादेश, जो केवळ आणि केवळ भारतामुळे जागतिक नकाशावर आज अस्तित्वात आहे. पण, केवळ व्यापारी हितासाठी आता बांगलादेशही चीनच्या जाळ्यात अलगद अडकतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
 


भारताशी लडाख सीमेवर मानहानिकारक पराभव पत्करल्यानंतर चीन त्याचा वचपा काढण्यासाठी सर्वोपरी प्रयत्नशील आहे. चीनच्याच सांगण्यावरुन पाकिस्तान भारताशी पुन्हा सीमेवर एकीकडे आगळीक करतोय. त्याचबरोबर पाकिस्तानने इस्लामिक राष्ट्रांकडे भीक मागत अखेर ‘ओआयसी’ची बैठक बोलवून पुन्हा काश्मीरचा रागही आळवला.





दुसरीकडे नव्या नकाशावरुन नेपाळचे नखरे सुरुच आहेत. कोणे एकेकाळी ‘हिंदूराष्ट्र’ म्हणून मिरवणार्‍या नेपाळची आज भारताशी रोटी-बेटी संबंध तोडण्यापर्यंत मजल गेली. त्याच पार्श्वभूमीवर नेपाळी मुलाशी भारतीय मुलीने लग्न केल्यानंतर तिला नेपाळी नागरिकत्वासाठी सात वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असा कायदा आणण्याचा घाट कम्युनिस्ट ओली सरकारने घातला आहे. पण, याच दरम्यान नेपाळच्या उत्तरी सीमेवरील रुई गाव चीनने काबिज केल्याच्या बातम्याही झळकल्या. पण, महागाईच्या
गर्तेत रुतत चाललेल्या, जनआंदोलन भडकलेल्या नेपाळला आता चीनने कितीही जन्मभूमीचा तुकडा हडप केला, तरी वेदना जाणवणार नाहीत. कारण, आता ‘नेपाळी चिनी भाई भाई’ची हाक तेथील सरकारने दिलेली दिसते.




तेव्हा, भारताशी सीमेवर आगळीक केल्यानंतर चीनचा जळफळाट त्याच्या अशा अनेक कृतींमधून प्रकट होताना दिसतो. पाकिस्तान, नेपाळबरोबरच चीनने आता आपला मोर्चा वळवला आहे तो बांगलादेशकडे. तोच बांगलादेश, जो केवळ आणि केवळ भारतामुळे जागतिक नकाशावर आज अस्तित्वात आहे. पण, केवळ व्यापारी हितासाठी आता बांगलादेशही चीनच्या जाळ्यात अलगद अडकतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
भारताला चहुबाजूने घेरण्यासाठी चीनने मूलभूत सोयीसुविधांच्या विकासाचे आणि व्यापारहिताचे लालुच बांगलादेशला दाखवले. त्या अनुसार, चीनमध्ये बांगलादेशकडून आयात होणार्‍या ९७ टक्के वस्तूंना ‘ड्युटी फ्री’ करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला. त्याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होऊ शकते. या निर्णयानंतर आधी करारानुसार आयात शुल्क माफ केलेल्या ३,०९५ बांगलादेशी उत्पादनांमध्ये आता ५,१६१ आणखीन नव्या उत्पादनांची भर पडेल. याचा साहजिकच मोठा फायदा बांगलादेशला आणि तेथील व्यापार्‍यांनाही होईल. त्याचबरोबर भारताकडून सध्या उपलब्ध न होणार्‍या वस्तूही चीनला बांगलादेशकडून कमी किमतीत मिळाल्यामुळे या कराराचा दोन्ही देशांना दुहेरी फायदा आहे. त्यातच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यादरम्यान यापूर्वीही व्यापारी कराराबाबत सहमती झाल्याचे समजते.




इतकेच नव्हे तर कोरोनाच्या या महामारीत चीनने बांगलादेशच्या मदतीसाठी वैद्यकीय पथकही रवाना केले होते. त्यामुळे सरकारी स्तरावर याबाबत पूर्ण अनुकूलता असली तरी सामान्य बांगलादेशी जनतेने या कराराला तीव्र विरोध दर्शविला आहे. राजधानी ढाक्यामध्ये चीनविरोधी निदर्शनेही करण्यात आली. चीन सातत्याने उघूर मुस्लिमांवर अन्याय-अत्याचार करतोय. १० लाख उघूर मुस्लिमांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना बांगलादेश सरकारने ही चिनी खैरात कबूल करु नये, असा या आंदोलनाचा एकूणच सूर. एकीकडे पाकिस्तान, ओआयसी उघूर मुसलमानांविरोधातील चिनी अत्याचारावर ‘ब्र’ही काढत नसताना, कोणे एकेकाळी पाकिस्तानचाच हिस्सा असलेल्या बांगलादेशातील नागरिकांनी मात्र रस्त्यावर उतरुन आपला रोष व्यक्त केला. त्यातच चीन कशाप्रकारे आमिश दाखवून देशांना कर्जाच्या जाळ्यात कायमस्वरुपी अडकवतो, हे आता लपून राहिलेले नाही. जे पाकिस्तानचे झाले, ते आता बांगलादेशचे व्हायला नको, हीच अपेक्षा बांगलादेशी जनतेने व्यक्त केली. पण, सद्यस्थिती पाहता, आधीच भारतातील ‘सीएए’, ‘एनआरसी’मुळे दुखवलेले हसिना सरकार चीनच्या या कराराला स्वीकारेल, यात शंका नाही.


चीनने यापूर्वीच बांगलादेशात रस्तेबांधणी, पूलबांधणीची मोठी कंत्राटेही घेतली आहेत. २०१८ साली १७.८ अब्ज डॉलर इतकी बांगलादेशशी चिनी निर्यात होती, ज्यामध्ये मागील वर्षापासून वाढ झाली आहे. दुसरीकडे बांगलादेशची चीनमधील निर्यात मात्र १ अब्ज डॉलरपेक्षाही कमी आहे. त्या तुलनेत भारत-बांगलादेशमधील व्यापारी तूटही कमी असून दोन्ही देशांना सांस्कृतिक संबंधांचीही किनार आहे. त्यामुळे मोदी सरकारला युद्धपातळीवर नेपाळ, बांगलादेश यांची नाराजी तर दूर करावी लागेलच, पण चीनपेक्षा अधिक आर्थिक मदत आणि व्यापारी, संरक्षण करारांतून या देशांना चीनच्या ताटाखालचे मांजर होण्यापासून वेळीच रोखावे लागेल.
@@AUTHORINFO_V1@@