गगनभरारी घेणारी अंतरा मेहता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2020
Total Views |
Antra Mehta_1  






राज्याची पहिला महिला ‘फायटर पायलट’ होण्याचा मान मिळवत महाराष्ट्राची मान संपूर्ण देशात उंचावणार्‍या अंतरा मेहता यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...



स्त्री ही आज प्रत्येक क्षेत्रांत अग्रेसर असून ती पुरुषांच्या तुलनेत अजिबात मागे राहिलेली नाही. क्रीडा, संशोधन, वैद्यकक्षेत्र, अंतराळ अशा सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अगदी रणांगणातही तिने आपले धैर्य, शौर्य सिद्ध केले आहे. भारतीय सैन्यदलात पुरुषांप्रमाणेच काही स्त्रियांनीही मोलाची कामगिरी बजावली असून ‘शौर्य पुरस्कारां’वर आपले नाव कोरले आहे.


अगदी लढाऊ विमानांमध्ये उड्डाण भरण्याची जबाबदारीही स्त्रिया सहजपणे आपल्या खांद्यावर घेत असल्याचे सध्याच्या काळात पाहायला मिळते. म्हणूनच आजघडीला स्त्रिया या पुरुषांशी बरोबरी नाही, तर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेल्याचे सांगण्यात येते. म्हणूनच स्त्रियांचे कौतुक करावे तितके कमीच असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. कारण, प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी विविध स्त्रियांनी आपल्या जीवनात जीवापाड संघर्ष केला असून अपार कष्टांच्या जोरावरच स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले आहे.


मातृत्वाचे प्रेमळ वात्सल्य ते दुर्गेसारखा अवतार धारण करण्याची क्षमता राखणार्‍या स्त्रियांच्या कर्तृत्वाला म्हणूनच सलाम केला जातो. असेच सलाम करण्यासारखे कर्तृत्व करत गाजवले आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान मिळवणार्‍या अंतरा मेहताने. तिच्या कौतुकाचे गोडवे सध्या राज्यभर गायले जात आहेत. महाराष्ट्राची पहिली महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान मिळवत अंतरा मेहताने गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रतीक्षेचा दुष्काळ संपवला असून संपूर्ण देशभरात तिच्या नावाची चर्चा आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र जोरदार कौतुक केले जात आहे.


आजघडीला भारतीय वायुसेनेत ‘लेडी फायटर पायलट’ म्हणून त्यांचा नावलौकिक असला तरी इथवरच्या प्रवासात अंतरा मेहताने आपल्या जीवनात जीवापाड संघर्ष केला. तिचे कर्तृत्व निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच तिच्या या यशाची गाथा सर्वत्र अभिमानाने सांगितली जात आहे. अंतरा मेहता या मूळच्या नागपूरच्या. नागपूर शहरातच त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच अंतरा मेहता या शिक्षणात हुशार. खूप शिकून मोठे व्हायचे आणि देशासाठी काहीतरी वेगळे करण्याची त्यांची आधीपासूनच इच्छा होती. यासाठी त्या आधीपासूनच तयारी करत होत्या.


आपल्याला मोठे होऊन देशासाठी काही तरी करून दाखवण्याची इच्छा बाळगणार्‍या अंतरा या शालेय शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्तीकडेही कटाक्षाने लक्ष देत होत्या. अभ्यासात हुशार असल्याने शालेय शिक्षणादरम्यानही त्यांनी उत्तम गुण मिळवत कुटुंबीयांचे मन जिंकून घेतले. अंतरा यांचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांमध्येही उत्तम गुण मिळवण्याच्या सपाटा त्यांनी सुरुच ठेवला. दहावीच्या परीक्षेतही उत्तम गुण मिळवल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेतून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.


त्यानंतर त्यांनी रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतरही त्या थांबल्या नाहीत. देशसेवा करण्याची इच्छा बाळगणार्‍या अंतरा यांनी ‘एसएसबी’ची तयारी केली. एकेकाळी महिलांना वायुसेनेत प्रवेश देण्याबद्दल अनेकांचा आक्षेप होता. कारण, या ठिकाणी काम करायचे म्हणजे प्रचंड शारीरिक कष्ट आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण, अंतरा मेहता यांनी भारतीय वायुसेवेत काम करत हे दाखवून दिले की, स्त्रियासुद्धा ‘फायटर पायलट’ होऊ शकतात. त्यांच्यातसुद्धा ही क्षमता नक्कीच असते.


फायटर पायलट होण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला. इथे त्यांनी ’पिलेटस पीसी-७’, दुसर्‍या टप्प्यात ’किरण एमके-१’ हे लढाऊ विमान उडवले. नुकत्याच झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह १२३ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा इथे ’हॉक्स’ या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील दहा महिला फायटर पायलटमध्ये अंतराचा समावेश झाला आहे. नागपूर संरक्षणच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली.


रवी आणि पूनम मेहता या दाम्पत्याची कन्या फ्लाईंग ऑफिसर अंतरा मेहता आता महाष्ट्राची पहिली महिला लढाऊ वैमानिक बनली आहे. फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या अंतरा ही आपल्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी. अंतराचे हे कर्तृत्व खरेच वाखाणण्याजोगे आहे. भारतीय वायुसेनेत महाराष्ट्रासाठी पहिल्या ‘महिला फायटर’ ठरलेल्या अंतराने सर्व तरुणींपुढे एक नवा आदर्श प्रस्थापित केला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या वाट्याला लढाऊ महिला वैमानिक होण्याचा योग आला नव्हता. मात्र, अंतराच्या रुपाने महाराष्ट्राला आता पहिली महिला लढाऊ वैज्ञानिक मिळाली असून त्याचे करावे तितके कौतुक कमीच. पुढील प्रवासासाठी अंतराला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा

.
- रामचंद्र नाईक 






@@AUTHORINFO_V1@@