देखो 'मगर' प्यार से...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

crocodile_1  H

 


मानव-वन्यजीव संघर्षामधला दुलर्क्षित राहिलेला संघर्ष म्हणजे मानव आणि मगरींचा. मगर म्हटलाबरोबर आपल्या शरीरात भीती संचारते. परंतु, जलीय परिसंस्थेत मगरी का महत्त्वाच्या आहेत ? त्याविषयी आढावा मांडणारा हा लेख...


 

अमोल जाधव - मागील काही वर्षात समाज माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवरून मगरींचे दर्शन किंवा मगरीचा हल्ला अशा बातम्या आपण पाहिल्याच असतील. त्या वृत्तांकनामधून मगरीसाठी वापरले जाणारे नेहमीचेच शब्द जसे की, अक्राळविक्राळ, हिंस्त्र, अजस्त्र इ. हे शब्द भीतिदायक वाटतात. परंतु, सत्य काय आहे, हे आपण जाणून घेऊया. संपूर्ण भारतामध्ये मगरी या नद्या, तळी, तलाव, दलदली अशा ठिकाणी आढळून येतात. मगरींचे अस्तित्व आपल्याकडे पूर्वीपासून आहे. मात्र, पूर्वी त्यांचे दर्शन इतके सहजासहजी होत नव्हते. कारण, त्यावेळी त्यांचे अधिवास अबाधित होते. आता बहुतांश नदीकाठ हे वाळू आणि माती उपसा करून आपण बोडके करून ठेवले आहेत. त्यामुळे मगरींचे दर्शन सहजरित्या होऊ लागले आहे.

 
 
 

मगर हा मांसभक्षक सरपटणारा प्राणी आहे. स्वतः शिकार करून खाण्याबरोबरच तो संधीचा फायदा घेऊनही अन्नग्रहण करतो. मेलेली किंवा सडलेली जनावरेही तो खातो. मगर शीत रक्ताची असल्यामुळे तिला अन्नाची गरज फार कमी असते. तिचे शारीरिक तापमान आजुबाजूच्या वातावरणातील उष्णतेवर अवलंबून असते. त्यामुळे मगरीला एकदाच पोटभर खाल्ल्यानंतर वर्षभर काहीही खाण्यास मिळाले नाही तरी चालते. सहा ते आठ फुटांची एक मगर दिवसात जेवढ्या वजनाचे मासे खाते, त्यापेक्षा जास्त वजनाचे मासे एका बगळ्याला रोज खाण्यासाठी लागतात. मगर आपली हद्द राखून त्यामध्ये अधिवास करणारा जीव आहे. मगरी पृथ्वीवरती अगदी डायनासोरसच्या काळापासून आहेत. इतक्या लाखो वर्षात त्यांनी स्वतःमध्ये बरेच शारीरिक बदल करून घेतले. उदाहरणार्थ- मगर आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रित करू शकते. एकदा श्वास घेतल्यानंतर तासभर पाण्यामध्ये बुडून राहू शकते. आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हवा तसा बदलू शकते. साधारण जानेवारी ते जून हा मगरीचा विणीचा हंगाम असतो. यादरम्यान जोडीदार शोधणे, मिलन, अंडी घालणे या प्रक्रिया पूर्ण होतात. अंडी जमिनीत किंवा कुजलेल्या पाल्यापाचोळ्यात नैसर्गिकरित्या ऊबवून पिल्ले जन्मास येईपर्यंत नर आणि मादी दोघे मिळून पिल्लांची काळजी घेतात.

 
 

मगरींची सगळीच पिल्ले मोठी होत नाहीत. मगरींच्या पिल्लांचेदेखील शिकारी आहेत. जसे की, मुंगूस, घोरपड, शिकारी पक्षी, मोठे मासे, स्वतः मोठ्या मगरी लहान पिल्लांना मारून खातात. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांच्या संख्येवर देखील मर्यादा राहते. जलीय पर्यावरणीय परिसंस्थेमध्ये मगर हा सर्वोच्च भक्षक किंवा शिकारी प्राणी आहे. मगरींच्या अस्त्विवामुळेच जलीय पर्यावरण संस्था सुस्वरुप आणि आरोग्यदायक राहते. वाढणारी मानवी लोकसंख्या आणि त्यामुळे मगरीच्या अधिवासावर होणार्या मानवी अतिक्रमणामुळे तिला जगण्यास लागणार्‍या गोष्टींची कमतरता भासत आहे. म्हणून मानव-मगर संघर्ष अलीकडल्या काळात वाढीस लागलेला आहे. त्यातल्या त्यात मगरीच्या वस्तीस्थानाजवळील माणसाचे बेजबाबदार वर्तन, हेच मगरीचे हल्ले वाढण्यास कारणीभूत आहे.मगरी आहेत म्हणून आपल्या नद्या जीवंत आहेत.मगरी संपल्या तर आपल्या नद्यांच्या गटारगंगा व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.

 
 
 

मगरीकडून होणाऱ्या हल्ल्यांची कारणे

1) हद्द निष्ठा - मगर आपल्या हद्दीतच वावरत असते. तिच्या उन्हात बसायच्या आणि अंडी घालायच्या जागा ठरलेल्या असतात. अशावेळी त्या हद्दीमध्ये वाळू उपसा, माती उपसा आणि इतर कारणाने जर आपण लुडबुड केली, तर आपल्या भागाचे संरक्षण करण्यासाठी म्हणून मगर हल्ला करू शकते.

2) गैरसमज - बर्‍याच वेळा मगरीला माणसावर हल्ला करायचा नसतो. परंतु,फसगत झाल्यामुळे त्या माणसाला पाण्यावर आलेले जनावर समजून ती हल्ला करते.

3) स्वसंरक्षण- वाईट हेतूने जाणीवपूर्वक किंवा चुकून मगरीच्या जवळ गेल्यास, तिला डिवचल्यास, स्वतःच्या संरक्षणासाठी ती हल्ला करते.

4) पिल्लांचे रक्षण - अंडी घातल्यावर आणि त्यातून पिल्ले निघाल्यानंतर पुढील काही महिने मगर त्यांचे संरक्षण करत असते. या वेळेत तिच्या घरट्याजवळ किंवा अंड्यांजवळ कोणी गेल्यास, पिल्लांना पकडायचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या संरक्षणासाठी ती प्राणघातक हल्ला करते.

5) अन्नासाठी- मगर ही संधीसाधू शिकारी आहे. आपण चूक केली, तर आपण तिची शिकार ठरु शकतो. मात्र, आपल्याकडे अजून हा प्रकार घडत नाही. आपल्याकडील मगरी माणसाला भक्ष म्हणून अजून तरी बघत नाहीत.

 

 
 
 
मगर असलेल्या भागात काय काळजी घ्यावी ?
 

1) कपडे धुणे, पोहणे, जनावरे धुण्यासाठी सुरक्षित घाटाचाच वापर करावा.

2) पाणवठ्यावर जाताना आधी आजूबाजूला अंदाज घेऊन सावधानतेने जावे. पाण्यात एखादा दगड मारून बघावा

3) एकट्याने पाणवठ्यावर/ नदी काठाला जाऊ नये. रात्री तर मुळीच नाही.

4) नदीकाठची सर्व कामे समूहाने करावीत आणि एकमेकांच्या नजरेमध्ये राहावे.

5) मगरीचा वावर असणार्‍या पात्राजवळ मासे पकडणे, अंघोळ करणे, पोहणे, कपडे धुणे, अन्न शिजवणे इत्यादी गोष्टी अजिबात करू नयेत. मगरीच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.

6) मगरींना कधीही खायला टाकू नये. मेलेली जनावरे नदीकाठी टाकणे, मासे स्वच्छ करणे टाळावे. या गोष्टींकडे मगरी आकर्षित होतात.

7) मासेमारी करताना पाण्यापासून दूर उभे राहा किंवा बोटीचा वापर करावा. बोटीतून हात-पाय बाहेर काढू नये.

 

 
 
 
मगरींना का वाचवावे ?

1) उष्णकटिबंधीय अन्नसाखळीमध्ये मगरी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्याप्रमाणे ज्या जंगलात वाघ आहे तिथली अन्नसाखळी सुस्थितीत असते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मगर आहे त्या ठिकाणची पाण्यातली अन्नसाखळी देखील अतिशय उत्तम असते.

2) मगर धोकादायक तीलापिया, मांगुर आणि कॅटफिशच्या इतर काही विनाशकारी माश्यांच्या प्रजातींना खाऊन नदीमध्ये अन्नसाखळी चांगली ठेवतात. (जिथे मगर असते तिथे माश्यांची संख्या देखील चांगले असते)

3) नदीमध्ये मरून पडलेल्या आणि कुजणार्‍या गोष्टी खाऊन मगरी पाणी स्वच्छ ठेवतात.

4) सर्व मगरींना भारतीय वन्यजीव अधिनियम कायदा 1972 - कलम प्रमाणे विशेष कायदेशीर संरक्षण आहे.

(लेखक सांगलीच्या’नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी’चे वन्यजीव अभ्यासक आहेत)

@@AUTHORINFO_V1@@