कभी सुख कभी दुख, यही जिंदगी है...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

dipression_1  H
ज्यांनी आत्महत्येच्या काठावरून परंतु जीवन संपन्न करायचे ठरविले, त्यांना पुढे ते अमाप सुख मिळाले. ते त्यांच्या मुखातून ऐकून कान तृप्त होतात. जेव्हा मन काळोखात हरवते, तेव्हा संतोषाचा प्रकाश दिसण्याची सुतराम शक्यता मावळते. पण, आयुष्य काळोखाला भेदून प्रकाशाकडे जाऊ शकते आणि त्यासाठी उत्तम मार्गदर्शन, योग्य उपचार आवश्यक आहेत. डीप्रेशनमधून नक्की बाहेर येता येतं. मात्र, मदतीची हाक वेळीच मारता यायला हवी.


असे म्हणतात की, ‘आत्महत्या’ या विषयावर फारशी चर्चा कधी करू नये. तसे पाहिले तर या अशास्त्रीय विधानामागे काही तेवढ्याच तोडीच्या गैरसमजुतीही आहेत. पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार आले तर ती व्यक्ती जगातील कोणी दुर्मीळ किंवा दुर्लभ व्यक्ती नाही. अनेक लोकांच्या मनात हा विचार काही क्षणासाठी तरळून जातो, तर काहींच्या मनात हा विचार मधूनमधून परवानगीशिवाय वस्तीला येत असतो, अगदी अगोचर पाहुण्यासारखा. आपल्या या विश्वात तशी वस्ताद मंडळीही वास्तव्य करून आहेत. त्यांना व्यवस्थित माहिती आहे की, असा अपरिचित नापसंत विचार करणारे आपण काही एकटेदुकटे नाही. ते हुशारीने या अजब पाहुण्याला काही काळाने गाठोडे बांधून आपल्या जीवनातून कायमचे हुसकावून लावतात. लय भारी माणसे आहेतही. त्यांना पूर्णपणे विश्वास आहे की, असा अजबगजब विचार मधून कधीतरी येतो. पण, याचा अर्थ आपण कायम कामातून गेलो, असा होत नाही आणि यामुळे आपले डोके पुरते फिरले, असे तर अजिबात नसते. होते कधीकधी असे की, आपल्या जीवनात आपल्या ताकदीपेक्षा दुःख-दर्द अधिक प्रमाणात येतो. पण, हळूहळू जसा काळ पुढे सरकत जातो, तसतसे दुःख-दर्दसुद्धा मागे पडत जातो. साहजिकच आत्मविश्वासाची कळी उमलते आणि आत्महत्या मिटायला लागते. या जगात अपरिमित बुद्धिमत्ता असलेले, फेमस असलेले, जगाला प्रिय असलेले गुणी लोकसुद्धा, आता व्यथित व्यक्ती ज्या आत्मघाताच्या पायरीवर उभ्या आहेत, तिथे कधीकाळी उभ्या होत्या. पण, मनातल्या थिजवणार्‍या विचारांना मागे रेटून त्या पुढच्या पायर्‍या चढू लागल्या आणि सुखसमाधानाने फुललेल्या बागेत विसावल्यासुद्धा.

एक उत्तम गोष्ट बहुधा त्यांना त्यावेळी कळली म्हणजे, मनाची निराशा आणि नकारात्मक विचार काही शाश्वत नसतात. मानसिक क्लेश आणि दुःखाचा अनुभव समुद्रातील लाटांसारखा आहे. गर्जत धावून येणार्‍या आणि शांतपणे परतणार्‍या लाटांसारखा. या लाटांना झेलत, अंगावर घेत ठामपणे जो उभा राहिला तो बचावला आणि टिकला. जीवनात अशा वेदनेच्या, अपयशाच्या आणि निराशेच्या लाटा येतात आणि जातात. आपण स्वतःला सांभाळत ठामपणे उभे राहण्याचा प्रयत्न तर करायला हवा. आपली वाट पाहणारे आपले प्रियजन जिथे बदल घडविता येईल असे प्रसंग, ज्यांना वस्तुस्थितीच्या पटलावर यायचे आहे, अशी स्वप्ने आणि आयुष्यात जगणे किती बहुमोल आहे, हे पटवणारा जीवंत अनुभव... या सार्‍यांना आपली ओढ आहे. हे सगळे पूर्वचैतन्य आपली वाट पाहत आहे, याची जाणीव ज्या क्षणी व्यक्तीच्या अंतर्मनाला होते, तेव्हा आपसूक आपली पावलं खिन्नतेच्या काठावरून मागे वळायला लागतात. आपल्या सगळ्यांना एक प्रकारची सचेतित ऊर्जा मिळते. संकटांशी प्रतिकार करायचे खास कौशल्य आपण शिकतो. डीप्रेशनवर मात करयाचे धाडस आपल्याला मिळते आणि ‘कदम कदम बढाए जा...’ या सुरांशी आणि शब्दांशी आपले कायमचे घट्ट नाते जुळते.


मॅट हेग नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी सतत बदलत राहणार्‍या हवामानाची तुलना मानसिक आरोग्याबरोबर केली आहे. त्यांनी एक मार्मिक स्पष्टीकरणात म्हटले आहे की, “डीप्रेशन किंवा उदासिनता आपल्या जीवनात येते आणि जाते.” ती एक मनाची सातत्याने बदलणार्‍या ऋतूसारखी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे आपले अस्तित्व नाही. खूप खच्ची करणारे नकारात्मक विचार मनात थैमान घालत असले तरी आपण नकारात्मक व्यक्तिमत्त्व नाही आहोत, याचा अर्थ या नकारात्मक विचारांकडे आपण एक व्यक्ती म्हणून अभ्यासपूर्णदृष्ट्या पाहायला पाहिजे. ते विचार परिस्थितीनुरूप, जैविक कारणामुळे येतील आणि निघूनही जातील. याची शास्त्रीय जाणीव आपण ठेवावी म्हणजे, त्यांचा सामना करणे तितके कठीण होणार नाही.
आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त झालेल्या त्या व्यक्तींमध्ये एक महत्त्वाची मर्यादा येते. ती म्हणजे त्यांच्या विचारात ‘लॉजिक’ नसते. किंबहुना, तर्कसंगत विचार करायची क्षमता या व्यक्तींनी गमावल्यामुळे त्यांना विवेकनिष्ठ विचार करताच येत नाहीत. त्यांना हे लक्षात येत नाही की, आत्महत्या केली तर आपण आपल्या आयुष्यात पुढे जे सकारात्मक व संपन्न बदल आपण घडवून आणू शकू, ते आपल्याला आणताच येणार नाहीत. ज्यांनी आत्महत्येच्या काठावरून परंतु जीवन संपन्न करायचे ठरविले, त्यांना पुढे ते अमाप सुख मिळाले. ते त्यांच्या मुखातून ऐकून कान तृप्त होतात. जेव्हा मन काळोखात हरवते, तेव्हा संतोषाचा प्रकाश दिसण्याची सुतराम शक्यता मावळते. पण, आयुष्य काळोखाला भेदून प्रकाशाकडे जाऊ शकते आणि त्यासाठी उत्तम मार्गदर्शन, योग्य उपचार आवश्यक आहेत. डीप्रेशनमधून नक्की बाहेर येता येतं. मात्र, मदतीची हाक वेळीच मारता यायला हवी. कवी योगेश यांचे किशोरकुमारांनी गायलेले एक गाणे मन प्रसन्न करून जाते-
कभी सुख कभी दुख, यही जिंदगी है।
ये पतझड का मौसम घडी दो घडी है।
नये फूल कल फीर डगर में खिलेंगे।
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे।
- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@