तत्त्वनिष्ठ समाजभान ते साहित्यसेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020   
Total Views |

dr rama garge_1 &nbs


मानवी मन ज्ञान प्राप्तीने संवेदनशील व प्रगल्भ होते या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या साधनामार्गाला अनुसरून साहित्य क्षेत्रात कार्यरत असणार्‍या डॉ रमा दत्तात्रय गर्गे.



“गीतेत सांगितलेले तत्त्वज्ञानही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रणागंणात स्वकीयांना पाहून अर्जुन शस्त्र खाली ठेवतो. त्यावेळी श्रीकृष्ण त्याला सांगतात की, तत्त्व ही महत्त्वाची असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये तत्त्वांशी तडजोड करू नये. कर्तव्य करणे महत्त्वाचे. हे जे विचार आहेत ना, ते मला समाजाच्या दृष्टीने आणि आयुष्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे वाटतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानलालसा हा विषय नेहमी माझ्यासाठी प्रेरणेचा विचार ठरला आहे.” डॉ. रमा गर्गे सांगत होत्या. वैचारिक साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञानविषयक लेखन करणार्‍या डॉ. रमा गर्गे. त्यांनी ‘आपले पूर्वांचल’, ‘लाचित बडफूकन’, ‘कणाद’ ही पुस्तके लिहिली आहेत. अर्थात, पुस्तकांचे नाव आणि विषयांवरूनच डॉ. रमा गर्गे यांच्या ज्ञानकक्षेचा अंदाज येतो. स्वामी कुवलयानंद योग व संस्कृत महाविद्यालयाच्या त्या संचालिका आहेत. हे महाविद्यालय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूरशी संलग्न होते. होते यासाठी की, हे महाविद्यालय १५ वर्षे यशस्वीरीत्या चालवले. मात्र, काही आवश्यक कामामुळे या महाविद्यालयाला जास्त वेळ देणे शक्य होणार नाही, असे डॉ. रमा यांना जाणवले. त्यावेळी त्यांनी हे महाविद्यालय बंद केले. यश, पैसा मिळतो आहे, आपण जबाबदारीने लक्ष दिले काय, नाही काय, काय फरक पडतो, असा विचार डॉ. रमा यांनी केला नाही. आपल्या ध्येयामध्ये आपण १०० टक्के वाहून काम करायलाच हवे. तसे नसेल तर मग नावापुरते, दिखाव्यापुरते काहीही करू नये, असे डॉ. रमा यांचे मत. त्यानुसार त्यांनी महाविद्यालय बंद केले. मात्र, कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने डॉ. रमा गर्गे यांना पश्चिम महाराष्ट्राच्या समन्वयक म्हणून काम करण्याची विचारणा केली. आज डॉ. रमा गर्गे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.



डॉ. रमा यांना योगशास्त्राची आवड. त्यांचे मानलेले पण सख्ख्याइतकेच सख्खे मामा रमेश पांडव यांच्यामुळे डॉ. रमा यांना योगशास्त्राची आवड निर्माण झाली. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कैवल्यधाम येथे योगशास्त्राचेही शिक्षण घेतले. योगशास्त्राची मुळचीच आवड, त्यातही अध्यापन हा विषय रमा यांच्या आवडीचा. ज्ञानलालसा हा मुळातलाच गुणधर्म असल्याने, औरंगाबादच्या डॉ. रमा यांनी वनवासी कल्याण आश्रम तर्फे जव्हार येथे एक वर्षं कामही केले आहे. तेथील जीवनाने त्या अनुभवश्रीमंत झाल्या. वनवासी बांधवांचे अकृत्रिम वागणे त्यांनी अनुभवले. त्यांना जाणवले की, इथे कुठचीही सहानुभूती, खोटे खोटे आपलेपणाचे देखावे नव्हते. समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे, तशी स्वीकारायची संस्कृती होती, असे दृश्य नागरी समाजातही ओघानेच दिसेल. ही अकृत्रिमता डॉ. रमा गर्गे यांच्या स्वभावाचा आणि साहित्याचेही अंग बनली.



डॉ. रमा गर्गे या मूळ औरंगाबादच्या सदाशिव देशपांडे, निर्मला देशपांडे या सुसंस्कृत दाम्पत्याची कन्या. सदाशिव हे संघ संबधित शाळेमध्ये मुख्याध्यापक, तर निर्मला या अभाविपच्या कार्यकर्त्या. त्या औरंगाबादच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे काम करायच्या. समाजाची निरलस सेवा आणि सत्कार्यासाठी संघटन करणे यामध्ये दोघांचाही हातखंडा. निर्मलांनी तर परिसरातील गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठीही प्रशिक्षित केलेले. आपल्या मातापित्यांचा सेवाभाव आणि संवेदनशील समाजभान पाहत रमा मोठ्या होत होत्या. त्यांचे माहेरचे नाव सोनाली. त्याचकाळात त्यांच्याकडे नित्यनेमाने ‘विवेक’ मासिक येई. त्यामध्ये रमेश पतंगे यांचे लेख त्या आवडीने वाचत. आपणही त्यांच्यासारखे लेखन करावे, असे रमा यांना वाटे. मुळातच वाचनाची आवड असल्याने त्यांनी विपुल वाचन केले. त्यांच्या लेखनामध्ये त्यांच्या बहुआयामी विचार प्रगट होताना दिसतात.
असो. सोनाली देशपांडे कोल्हापूरला सासरी जाऊन ‘डॉ. रमा गर्गे’ झाल्या. पती डॉ. दत्तात्रय गर्गेही संघ स्वयंसेवक. पुढे रमा यांनी ‘योगशास्त्र’ विषयामध्ये पीएच.डी केली. त्यांचे मामा प्रकाश कुलकर्णी यांनी डॉ. रमा यांना सांगितले की, योगविषयक ज्ञानसाधना पुढे सुरू राहायला हवी. त्यातूनच डॉ. रमा यांनी आणि पतीच्या सहकार्याने कोल्हापूरला त्यांनी स्वामी कुवलयानन्द योग व संस्कृत महाविद्यालय उभे केले. डॉ. रमा आणि डॉ. दत्तात्रय यांना नचिकेत आणि मीरा अशी दोन मुलं. संसार, साहित्य आणि मुख्यत: आपली तत्त्व सांभाळत डॉ. रमा आज महाराष्ट्र समरसता साहित्य परिषदेची जबाबदारीही सांभाळत आहेत. कोरोनामुळे आणि ‘लॉकडाऊन’मुळेही हातावर पोट असणार्‍यांचा प्रश्न गंभीर बनला. या काळात डॉ. रमा यांनी अन्नदानामध्ये स्वयंकपाक करण्यापासून ते इतरही जबाबदार्‍या आनंदाने स्वीकारल्या. समाजासाठी असणारे कोणतेही काम छोटे नसते, तर ते महत्त्वाचेच असते, असे डॉ. रमा यांचे म्हणणे. कोणत्याही शाश्वत मानवी मूल्यांशी, तत्त्वांशी तडजोड न करता, वैचारिक कार्य डॉ. रमा गर्गे करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@