मुंबई : एकीकडे महाराष्ट्र शासनाचे शिक्षण खाते २६ जून पासून शाळा सुरू करणार, शाळा सुरू करणे शक्य नसल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याची घोषणा करते आणि त्याच वेळी विविध तालुक्यांमध्ये शिक्षकांची अन्य कामांसाठी ड्युटी लावली जाते. शिक्षण खात्याचा असा विचित्र व भोंगळ कारभार म्हणजे 'गोंधळात गोंधळ-२' आहे. शासनाच्या शिक्षण खात्याचे डोके ठिकाणावर नसल्याचे या घटनाक्रमा वरून सिद्ध होत आहे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
दहा दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने २६ जून पासून राज्यातील शाळा सुरू करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यभर खळबळ उडाली. शाळा सुरू करणे योग्य की अयोग्य यावर राज्यभर चर्चेचे रान पेटले. या शासन निर्णयाच्या आधारे खासगी शाळांनी फी वसुली सुरू केली. प्रत्यक्षात २२ मार्चच्या जनता कर्फ्यूपासून आपल्या घरातील लहान मुलांना पालकांनी घरातच कोंडून ठेवले आहे. त्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून सर्व पालक आपल्या पाल्याची विशेष काळजी घेत आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्राची अवस्था अत्यंत दयनीय व वाईट झालेली असताना शाळा सुरू करण्याचा तुघलकी निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला. ज्या भागात शाळा सुरू करणे शक्य नाही त्या भागात ऑनलाईन शिक्षण दिले जाईल अशी घोषणा देखील केली. पण या घोषणा पोकळ असल्याचे शासनाच्याच कृतीवरून निदर्शनास येते आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याची घोषणा करायची आणि त्याच वेळी शाळेतील शिक्षकांची कोविड १९ मुळे उपस्थित झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्युटी लावायची हे आश्चर्यजनक आहे, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
राज्यातील असंख्य तालुक्यांमध्ये तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी शाळांना पत्र देऊन विविध ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळले जावे यासाठी शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. एका तालुक्यातील शिक्षकांची या कामी दुसऱ्या तालुक्यात नेमणूक केली आहे. ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते त्या त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळले जावे, नियमांची अंमलबजावणी व्हावी, यावर देखरेख करण्यासाठी शासनाने शिक्षकांची ड्युटी लावलेली आहे. शिक्षक जर ही ड्युटी करणार असतील तर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कोण देणार ? शिवाय ही ड्युटी संपल्यावर शिक्षकांना चौदा दिवसांसाठी कोरोन्टाईन व्हावे लागेल. शाळा सुरू करायच्या असतील तर शिक्षकांची ड्युटी इतरत्र कशी काय लावली गेली ? खरोखरच २६ जून पासून राज्यातील शाळा सुरू होणार काय, असे असंख्य प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांना उत्तरे देण्याची शासनाची तयारी नाही. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 'गोंधळात गोंधळ -२' हा नवा चित्रपट तयार केला असून लोकांना संभ्रमीत करत त्यांची शासनाने थट्टा चालवली असल्याची टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.