वेदांमधील लढाया शोधण्याच्या या प्रवासात अजून एक संघर्ष पुन्हा पुन्हा दिसत राहतो. मागच्या लेखात दाशराज्ञ युद्धाची कथा आपण पाहिली. त्यात सुदास राजाच्या आणि इंद्राच्या एका विशिष्ट शत्रूचे नाव ‘पणि’ असे आपण पाहिले. प्रत्यक्ष दाशराज्ञ युद्धात या पणींचा फारसा सहभाग किंवा भूमिका असल्याचे या वर्णनावरून जरी दिसत नसले, तरी इंद्राच्या याच्याशी झालेल्या संघर्षाची वर्णने ऋग्वेदात अजूनही इतरत्र काही ठिकाणी आहेत. हे पणि म्हणजे कोण, कुठले लोक? यांनी नेमकी काय आगळीक केली, की ज्यामुळे इंद्राने यांच्या विरुद्ध शस्त्र उचलले? निदान या संघर्षात तरी आर्यांचे आक्रमण आणि मोर्टिमर व्हीलरने गृहीत धरलेले इंद्राच्या अपराधांचे मत कुठेतरी सिद्ध होताना दिसते का? चला पाहूया.
पणींच्या कारवाया
इंद्राने केलेल्या विविध पराक्रमांची वर्णने वैदिक साहित्यात मुबलक सापडतात, त्यातच त्याने ‘पणींना रोखले’ असेही एक वर्णन दिसते. उदाहरणार्थ:
अयं देवः सहसा जायमान इन्द्रेण युजा पणिमस्तभायत् ।
अयं स्वस्य पितुरायुधानीन्दुरमुष्णादशिवस्य मायाः ॥२२॥
अर्थ: “या सोम देवाने इंद्राच्या सहाय्याने आपल्या बलाने पणिला रोखले, आपले गोधन पळवून नेऊन त्याचे स्वत: रक्षण करणाऱ्या त्या पणीची अकल्याणकारक आयुधे आणि त्याने उभा केलेला प्रपंच (मालमत्ता) नष्ट केली” ॥ ऋग्वेद ६.४४.२२ ॥
नेमके काय घडले आहे इथे? संस्कृतमध्ये ‘पण्’ हा धातू ‘विकणे’ अशा अर्थी वापरतात. त्यावरून ‘पणि’ म्हणजे ‘विक्रेता, दुकानदार, व्यापारी’ असा अर्थ लक्षात येतो. खरे तर आपल्या राज्यात व्यापार आणि आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवणे हे प्रत्येक राजाचे कामच असे. त्यामुळे देवांचा राजा इंद्रानेही याला प्राधान्य दिलेच असणार. पण इथे असे दिसते, की पणि नावाने ओळखले जाणारे तत्कालीन काही व्यापारी लोक इंद्राचे अपराधी ठरले आहेत. त्यांनी पळवून नेलेले गोधन सोम आणि इंद्र यांनी सोडवून आणले. हे करताना त्यांनी या पणींची शस्त्रे काढून घेतली, त्यांनी उभा केलेला प्रपंच (माया) नष्ट केला. आता व्यापाराच्या आडून जर कुणी अशा भुरट्या कारवाया करत असेल, तर राजा त्याला दंड देईलच ना! इथे तत्कालीन सर्वच व्यापारी (पणि) चोरटे होते, असे या सूक्तकार ‘शंयु बार्हस्पत्य’ ऋषींना अर्थातच म्हणायचे नाही. व्यापाऱ्यांच्या एखाद्या विशिष्ट गटानेच हे दंडनीय कृत्य केलेले असणार, हे ओघानेच आले. पण सांगायचा मुद्दा हा, की इथे खरे अपराधी ‘पणि’ ठरतात, इंद्र नव्हे.
सरमा – पणि संवाद
वर दिलेल्या छोट्याश्या प्रसंगाचा सविस्तर वृत्तांत ऋग्वेदात पुढे अजून एका सूक्तात सापडतो. ऋग्वेदात ‘सरमा-पणि संवाद सूक्त’ (ऋग्वेद १०.१०८) या नावाने ओळखले जाणारे एक स्वतंत्र सूक्तच आहे. यामध्ये या प्रसंगातील एक महत्त्वाचा भाग उलगडतो. पणींनी केलेला अपराध आपण वर पाहिलाच. त्यानुसार त्यांनी देवांच्या गायी पळवून नेऊन आपल्या किल्ल्यात दडवून ठेवल्या. देवगुरू बृहस्पतींना याची कुणकुण लागली. त्यांनी ही गोष्ट इंद्राला सांगितली. पणींना त्यांची चूक लक्षात आणून द्यावी आणि शक्यतो सामोपचारानेच विषय मिटवावा, अशा हेतूने इंद्राने आधी आपला दूत त्यांच्याकडे पाठवायचे ठरवले. त्यासाठी ‘सरमा’ हिची निवड करण्यात आली. ही सरमा म्हणजे ‘देवशुनी’, अर्थात देवांची एक कुत्री होती. पणींकडे जाताना वाटेत ‘रसा’ नावाची एक अतिशय खोल नदी लागली, ती रात्रीतून पार करून सरमा पणींच्या किल्ल्यात पोहोचली. पणींनी तिला इतका आटापिटा करून तिथपर्यंत येण्याचे कारण विचारले.
किमिच्छन्ती सरमा प्रेदमानड्दूरे ह्यध्वा जगुरिः पराचैः ।
कास्मेहितिः का परितक्म्यासीत्कथं रसाया अतरः पयांसि ॥१॥
अर्थ: “हे सरमे, तू इथे कशासाठी आलीस? हा अतिशय दुर्गम मार्ग आहे, इथून येताना कुणी मागे नुसती नजर जरी फिरवली, तर भीतीने त्याचे पुढे येणे अवघड होईल. अशा घनघोर रात्रीच्या वेळी तू रसा नदी कशी काय ओलांडलीस?” ॥ ऋग्वेद १०.१०८.१ ॥
यावर सरमा उत्तर देते:
इन्द्रस्य दूतीरिषिता चरामि मह इच्छन्ती पणयो निधीन्वः ।
अतिष्कदो भियसा तन्न आवत्तथा रसाया अतरं पयांसि ॥२॥
अर्थ: “हे पणींनो, मी इंद्राची दूती बनून आले आहे. तुम्ही दडवून ठेवलेले आमचे गोधन परत मिळवण्यासाठी मी इथे आले आहे. इंद्राच्या भीतीनेच रसा नदीने मला इथवर येऊ दिले.” ॥ ऋग्वेद १०.१०८.२ ॥
नाहं तं वेद दभ्यं दभत्स यस्येदं दूतीरसरं पराकात् ।
न तं गूहन्ति स्रवतो गभीरा हता इन्द्रेण पणयः शयध्वे ॥४॥
अर्थ: “ज्यांची दूती बनून मी इतक्या लांबून आले, ते इंद्रदेव अपराजेय आहेत. अशा तीव्र वेगवान प्रवाहाच्या आणि खोल नद्या सुद्धा त्यांना रोखू शकत नाहीत. ते इंद्रदेव नक्कीच तुम्हाला मारून कायमचे झोपवून टाकतील.” ॥ ऋग्वेद १०.१०८.४ ॥
यावर पणींनी तिला आपले सामर्थ्य किती आहे, ते सांगितले:
कस्त एना अव सृजादयुध्व्युतास्माकमायुधा सन्ति तिग्मा ॥५॥
अर्थ: “या गायींना युद्ध केल्याशिवाय कोण घेऊन जाऊ शकेल? आमच्याकडेही खूप तीक्ष्ण शस्त्रे आहेत.” ॥ ऋग्वेद १०.१०८.५ ॥
पण सरमेने सुद्धा त्यांना उलट भीती घातली “देवगुरू बृहस्पती तुम्हाला काहीही शिक्षा देऊ शकतात. तरीही तुम्ही जर गायी परत देणार नाही म्हणत असाल, तर तुम्ही मोठ्या संकटात आहात. अंगिरस आणि अयास्य ऋषी जर इथे आले, तर ते तुमचा सगळा अहंकार झटक्यात उतरवतील.” ॥ ऋग्वेद १०.१०८.६, ८ ॥ यावर मग पणींनी तिला लालूच दाखवायला सुरुवात केली.
स्वसारं त्वा कृणवै मा पुनर्गा अप ते गवां सुभगे भजाम ॥९॥
अर्थ: “हे भाग्यवती, तू आम्हाला बहिणीसारखी आहेस. तू इथून इंद्राकडे परत जाऊच नकोस. आम्ही तुला या गोधनातला काही भाग देतो.” ॥ ऋग्वेद १०.१०८.९ ॥
परंतु सरमेने बाणेदारपणे उत्तर दिले:
नाहं वेद भ्रातृत्वं नो स्वसृत्वमिन्द्रो विदुरङ्गिरसश्च घोराः ।
गोकामा मे अच्छदयन्यदायमपात इत पणयो वरीयः ॥१०॥
अर्थ: “हे पणींनो, मी असले कसलेही भावा-बहिणीचे नाते ओळखत नाही, इंद्र आणि भयंकर अंगिरसच ते जाणोत. (थोडक्यात, भावा-बहिणीच्या नात्यांच्या गोष्टी त्यांच्याशीच करा) मी इथून फक्त परत जाण्याचा अवकाश, ते तुमच्यावर लगेच आक्रमण करतील. कारण त्यांना गायी परत हव्याच आहेत. त्यामुळे त्वरित इथून दूर निघून जा.” ॥ ऋग्वेद १०.१०८.१० ॥
अर्थातच या शिष्टाईचा काहीही उपयोग झाला नाही. इंद्राने पणींवर चढाई करून त्यांना दंड केला आणि गायी परत मिळवल्या, हे आपण आधी पाहिलेच आहे.
तर वाचकहो, इंद्र-पणींच्या या संघर्षात तुम्हाला इंद्र हा परकीय आक्रमक आर्यांचा नेता म्हणून कुठे दिसला? किंवा आर्य आक्रमण तरी कुठे दिसले? किंवा ‘पणि’ हे मूलनिवासी होते, असे कुठे दिसले? किंवा मोर्टिमर व्हीलर म्हणतात तसे इंद्राने मूलनिवासींचा विध्वंस केलेला कुठे दिसला? किंवा त्याबद्दल इंद्राला गुन्हेगार ठरवण्याचे जरासेही कारण तरी कुठे दिसले?
- वासुदेव बिडवे