रोडपती ते करोडपती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2020
Total Views |
111_1  H x W: 0
 
 



एकेकाळी दोन वेळच्या जेवणासाठी इतरांपुढे हात पसरावे लागणार्‍या आणि आज उद्योजक म्हणून उद्योगभरारी घेतलेल्या रेणुका आराध्य यांच्या यशस्वी जीवनाची कहाणी सांगणारा हा लेख...


जगात आजघडीला अनेक उद्योजक प्रसिद्ध आहेत. आपला व्यापाराचा पसारा सातासमुद्रापार नेत अनेक उद्योजकांनी संपूर्ण विश्वात आपल्या नावाची मोहोर उमटवली. जगभरात आपल्या व्यापाराचा विस्तार करत काही उद्योजकांनी संपूर्ण विश्वात नावलौकिक मिळविला आहे. जगातील अशाच काही श्रीमंत व्यक्तींची भली मोठी यादीच दरवर्षी जाहीर करण्यात येते. या यादीत तशी अनेकांची नावे असतात. त्यापैकी सर्वांचीच नावे स्मरणात राहतील असेही नाही. 


मात्र, काही उद्योजक असेही आहेत, जे स्वतःच्या यशस्वीरित्या व्यापार विस्तार करतात. परंतु, आपल्या जगण्यातून, वागणुकीतून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करतात. बंगळुरुस्थित रेणुका आराध्य हे त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. रेणुका आराध्य हे आजच्या घडीला एक यशस्वी मोठे उद्योजक म्हणून ओळखले जातात. मात्र, एकेकाळी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. मात्र, या जीवनात खचून न जाता, अपयशापुढे गुडघे न टेकता रेणुका आराध्य यांनी अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे जीवन तर घडवलेच. मात्र, एक यशस्वी उद्योजक म्हणून जगापुढे एक वेगळा आदर्शही प्रस्थापित केला.



रेणुका आराध्य हे आजघडीला दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध आणि नामवंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. रेणुका यांचा जन्म बंगळुरुनजीक एनेकाल तालुक्यातील गोपासंद्र गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. घरी अठराविश्व दारिद्य्र. त्यांचे वडील एका स्थानिक मंदिराचे पुजारी होते. या मंदिर प्रशासनाकडून त्यांना कोणतेही आर्थिक मानधन दिले जात नव्हते. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी रेणुका आराध्य यांच्या वडिलांना इतरांकडे भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा लागत असे. भिक्षेमध्ये लोकांनी दिलेल्या अन्नधान्यावरच आराध्य कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा भागत असे. 



आधीच इतरांच्या देणगीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असताना वडिलांना आजारपणाने ग्रासले. अशा परिस्थितीत रेणुका यांनी आपल्या वडिलांच्या कामाची जबाबदारी स्वीकारली. वडिलांच्या जागी रेणुका हे दररोज भिक्षा मागण्यासाठी आसपासच्या गावात दारोदार भटकू लागले. मंदिरातील कामे आणि भिक्षा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, हे लहानग्या रेणुका यांना डोईजड होऊ लागले. अशा परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. शिक्षण सोडल्यानंतर फावल्या वेळेत रेणुका यांनी जवळपासच्या एका गावातील वयोवृद्ध व्यक्तीची सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली. 


वर्ष-दीड वर्ष हे काम केल्यानंतर मिळालेल्या कमार्ईतून त्यांनी आपले अर्धवट शिक्षण पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एका आश्रमशाळेत प्रवेश स्वीकारला. या आश्रमशाळेत तरी किमान दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थित सोय होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते ते. याठिकाणीही सकाळी ८ आणि रात्री ८ अशी दोनदाच जेमतेम जेवणाची सोय व्हायची. तासोन्तास घडणार्‍या या उपवासामुळे मन अगदी कंटाळून जायचे. तरीही न कंटाळता त्यांनी आपले शिक्षण सुरुच ठेवले.



ते दहावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी रेणुका यांच्यावर आली. मग त्यांनी शिक्षण सोडून विविध कंपन्यांमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. तीन वर्षं वेगवेगळ्या कंपनीत काम करत असताना त्यांच्या डोक्यात स्वत:चा उद्योग सुरु करण्याचा विचार घोंगावत होता. अशातच त्यांनी सुटकेस, वॅनिटी बॅग बनवण्याचा उद्योग सुरु केला. मात्र, काही काळानंतर हा उद्योगदेखील बंद पडला. गुंतवणूक केलेले सर्व पैसे बुडाले. अखेरीस त्यांनी वाहनचालक होण्याचे निश्चित केले. लग्नाची अंगठी विकून त्यांनी वाहन चालवायला घेतले. सुरुवातीला काही काळ शववाहिनीच्या गाडीवर चालक म्हणून नोकरी केली. त्यानंतर खासगी टॅक्सी चालविण्यास सुरुवात केली. टॅक्सी चालविण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले. यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी आणखी काही गाड्या विकत घेत ‘सिटी सफारी’ ही स्वतःची कंपनी सुरु केली. त्यानंतर रेणुका यांनी अनेक गाड्या विकत घेण्याचा सपाटाच लावला.



एकामागोमाग एक अशा ३०० गाड्या खरेदी करत त्यांनी ‘प्रवासी कॅब्स प्रायव्हेट लिमिटेड’ अशी टॅक्सी सेवा सुरु केली. बंगळुरुसह दक्षिण भारतातील अनेक शहरांत रेणुका आराध्य यांची टॅक्सी सेवा प्रसिद्ध आहे. अ‍ॅमेझोन, गुगल, वॉलमार्ट, जनरल मोटर्ससारख्या बड्या कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. ग्राहकांशी चांगले संबंध आणि विश्वास कमावल्यामुळे ओला, उबेरसारख्या कंपन्यांनाही आजतागायत त्यांनी मागे ठेवले आहे. आज त्यांच्या कंपनीत हजारो नागरिक काम करुन रोजीरोटी कमवतात. एकेकाळी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे रेणुका आराध्य हे आज कोट्यधीश असून प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जातात. ‘रोडपती ते करोडपती’ असा प्रवास करणार्‍या उद्योजकाला ‘दै. मुंबई तरुण भारत’चा सलाम...!

- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@