वेध चक्रीवादळांचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2020   
Total Views |
nisarga_1  H x


कोरोना संक्रमणाच्या पाठोपाठ महाराष्ट्रावर अजून एक संकट येऊन कोसळले आहे. हे संकट म्हणजे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही गावांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. दि. ३ जूनच्या दुपारपासून या वादळाला रायगडमधील हरिहरेश्वर किनारपट्टीच्या सागरी परिक्षेत्रामधून सुरुवात होईल. त्यापुढे त्याची वाटचाल मुंबईच्या दिशेने असेल. यावेळी ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता आहे. अरबी समुद्रात घोंगावणारे हे पहिलेच वादळ नाही. मुंबई लगतच्या कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची घटना दुर्मीळ मानली जाते. कारण, बंगालच्या उपसागरातील वादळांप्रमाणे अरबी समुद्रातील वादळे शक्तिशाली नसतात. बर्‍याच वेळा तटीय क्षेत्रात पोहोण्यापूर्वीच त्यांची तीव्रता कमी झालेली पाहावयास मिळते. १९६८ आणि २०१९ या वर्षांमध्ये उत्तर कोकणातील तटीय क्षेत्रात चक्रीवादळ धडकल्याची उदाहरणे आहेत. १९६८ साली हर्णेच्या किनार्‍याजवळ एक चक्रीवादळ आणि २००९ साली अलिबाग-मुंबई दरम्यान ‘फियान’ हे चक्रीवादळ किनार्‍याला धडकले होते. गेल्यावर्षीच ‘महा’ आणि ‘क्यार’ वादळाचा फटका महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला बसला होता. आता जवळपास ११ वर्षांनी उत्तर कोकणात ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या वादळांना नावे देण्याची सुरुवात कशी झाली? तर, २००४ साली ‘भारतीय हवामान विभागा’ने (आयएमडी) पुढाकार घेऊन अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांचे नामकरण करण्यास सुरुवात केली. उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांची स्वतंत्रपणे ओळख असावी, असा यामागील हेतू होता. ‘आयएमडी’च्या नेतृत्वाखाली चक्रीवादळांच्या नावांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये चक्रीवादळाच्या प्रभावीखाली येणार्‍या एकूण १३ देशांनी सुचवलेल्या नावांचा वापर करण्यात आला. बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरब, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन अशा १३ देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी १३ नावांचा नव्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. चक्रीवादळांसाठी भारताने ‘गती’, ‘तेज’, ‘मुरासू’, ‘आग’, ‘व्योम’, ‘झोर’, ‘प्रोबाहो’, ‘नीर’, ‘प्रभंजन’, ‘घुरनी’, ‘अंबुड’, ‘जलाधी’ आणि ‘वेग’ ही १३ नावे सुचवली आहेत. ‘निसर्ग’ हे नाव बांगलादेशने सुचवले आहे.

प्रशासनाची धुमश्चक्री

कोरोनाच्या युद्धाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनासमोर आता चक्रीवादळवाशी झुंज देण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे ढासळलेल्या प्रशासकीय व्यवस्थेची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यातही चक्रीवादळांचा प्रभाव पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जाणवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासन आधीच ‘रेड झोन’मधून येणार्‍या चाकरमान्यांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या कोरोना चाचणीच्या प्रक्रियेत गुंतलेले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही जिल्ह्यांच्या अधिकार्‍यांसमोर ‘निसर्ग’ चक्रीवादळाशी लढण्याचे संकट उभे आहेच. मत्स्यव्यवसाय विभागही समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांशी संपर्क करुन त्यांना पुन्हा किनार्‍यांवर येणाच्या सूचना करत आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी यासाठी मदत करत आहेत. एनडीआरएफ पथकाच्या एकूण १६ तुकड्या महाराष्ट्रात तैनात आहेत. त्यामधील पालरमध्ये २, ठाण्यात १, मुंबईत ३, रायगडमध्ये २, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी १ टीम कार्यरत आहे. तर सहा तुकड्यांना आपत्कालीन वेळेत कार्यरत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाबरोबरच वन विभागाचे अधिकारी आणि प्राणिप्रेमी संस्थांचे कार्यकर्तेही प्राणी बचावासाठी सज्ज झाले आहेत. वादळामुळे खवळलेल्या समुद्राचा सर्वाधिक फटका समुद्रात तग धरुन असलेल्या जखमी सागरी जीवांना बसणार आहे. सर्वसाधारपणे जोरदार लाटांच्या मार्‍यामुळे जखमी आणि अशक्त असलेले कासव, डॉल्फिन, व्हेल आणि तस्तम सागरी जीव किनार्‍यांवर वाहून येतात. अशा परिस्थितीत त्यांना वेळीच उपचार मिळणे आवश्यक असते. ‘निसर्ग’ वादळाच्या या दोन दिवसांमध्ये किनार्‍यांवर अशक्त किंवा जखमी सागरी जीव वाहून येण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वन विभागाचा कांदळवन कक्ष तयार झाला आहे. जखमी सागरी जीवांच्या उपचारासाठी मुंबईतील ऐरोलीच्या ‘किनारी व सागरी जैवविविधता केंद्रा’त उपचार केंद्र तयार करण्यात आले आहे. शिवाय प्राणिप्रेमी संस्थांचे कार्येकर्ते अशा बचावकार्यांसाठी सज्ज झाले आहेत. एकूणच कोरोनामुळे तारांबळ उडलेल्या प्रशासनाची ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे धुमश्चक्री उडाली आहे.



@@AUTHORINFO_V1@@