भारत-चीन संघर्ष : ३ दिवसांनंतर चीनने २ मेजरसह १० भारतीय जवानांना सोडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2020
Total Views |

indo china_1  H




नवी दिल्ली :
लडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत चिनी सेनिकांनी भारताच्या १०  जवानांना बंदी बनवले होते. पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनने भारताच्या दोन मेजरसह १०  जवानांना बंदी बनवले होते. आता या जवानांना तीन दिवसांच्या बोलणीनंतर सोडण्यात आले आहे.



दोन्ही देशांतील वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांमधील तीन महत्वपूर्ण बोलण्यांसह मुत्सद्दी व सैनिकी वाहिन्यांद्वारे सखोल चर्चेनंतर चीनने २ मेजरसह १० भारतीय जवानांना सोडले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, पूर्वीय लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीनंतर या भारतीय जवानांना १५ जूनला चीनी सैन्याने ताब्यात घेतले होते. पीटीआयच्या म्हणण्यानुसार या १० सैनिकांमध्ये दोन लष्करी अधिकारीही आहेत. हे सर्व लोक गुरुवारी भारतीय सीमेवर पोहोचले.तीन दिवसांपूर्वी वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) हिंसक झटापटीत कर्नलसह २० सैन्य जवान शहीद झाले होते.


दोन्ही बाजूंच्या वाढत्या तणावा दरम्यान सैन्याच्या सुरक्षेचा विचार करता या वाटाघाटींविषयीची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. सरकारने यासंदर्भात कोणतीही माहिती शेअर केली नाही. भारतीय सैन्य व परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले होते की गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत कोणताही भारतीय जवान बेपत्ता झाला नाही. गलवान खोऱ्याच्या जवळपासचा प्रदेशातील शांततेसंदर्भातही चर्चा झाली. येथे भारत आणि चिनी सैन्य ५ मेपासून समोरासमोर आहे.५ मे रोजी भारत आणि चिनी सैन्याची पेंगाँग त्सोमध्येही झटापट झाली होती. यानंतर भारतीय लष्कराने, पेंगाँग त्सो, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलतबेग ओल्डीतील सर्व वादग्रस्त भागांतून चिनी सैनिकांना मागे रेटण्यासंदर्भात पावले उचलण्याबाबत, निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात दोन्ही देशांत अनेकदा चर्चा झाल्या मात्र, त्याचा परिणाम झाला नाही.
@@AUTHORINFO_V1@@