तब्बल तीन महिने धावलेली बेस्टची अत्यावश्यक सेवा शुक्रवारपासून बंद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2020
Total Views |

BEST_1  H x W:


अत्यावश्यक सेवांसाठी उपनगरीय रेल्वे सुरु झाल्याने बेस्ट प्रसानाचा निर्णय!

मुंबई : गेले सुमारे तीन महिने अत्यावश्यक सेवेसाठी धावणारी बेस्ट बससेवा आज (१९ जून) पासून बंद करण्यात आली आहे. १५ जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू झाल्याने बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून उपनगरी रेल्वे बंद होती. मात्र कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य जनता बाहेर पडत नसल्याने त्यांना काही अडचण भासत नव्हती. परंतु डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयाचे सहाय्यक कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, बँक कर्मचारी यांच्याविना सारेच व्यवहार ठप्प होणार होते. कोरोना महामारीचे काळात रुग्णांवर उपचार होणे आवश्यक होते. एक लाईफ लाईन बंद असली तरी दुसरी लाईफ लाईन बेस्ट बसने ही अडचण दूर केली.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईतच नव्हे, तर मुंबईबाहेरही राहणारे आहेत. लोकलसेवा बंद झाल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बेस्ट उपक्रमाच्या बसेस विरार, बदलापूर, उल्हासनगर, पनवेलपर्यंत धावून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबईत आणणे आणि त्यांना परत घरापर्यंत सोडणे ही महत्त्वाची जबाबदारी बेस्टने पार पाडली. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचारही सुरू राहिले आणि गरजेपुरते मुंबईचे राहाटगाडेही सुरू राहिले. मात्र अत्यावश्य सेवेतील कर्मचारी, बेस्ट बसेसची संख्या यांचा ताळमेळ जमत नसल्याने बेस्ट बसेसना गर्दी होत होती. प्रत्येकाला वेळेवर कामावर हजर होणे शक्य होत नव्हते. शिवाय सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत होता. यातूनही कोरोना अधिक प्रमाणात फैलावण्याची भीती व्यक्त होत होती. या सर्व कारणास्तव अत्यावश्यक सेवेसाठी उपनगरी रेल्वे सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर रेल्वे मंत्रालयाने सोमवार १५ जूनपासून उपनगरी रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आज १९ जूनपासून नेहमीचे रूट वगळून अत्यावश्यक सेवा म्हणून मुंबईबाहेर जाण्याचे बसचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.


अत्यावश्यक सेवा म्हणून ज्या मार्गावर बसेस धावत होत्या, त्या मार्गावर आता एसटी बसेस धावतील, असे बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले. अत्यावश्यक सेवांच्या विविध आस्थापनांमध्येही बेस्ट बससेवा बंद झाल्याची सूचना जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांसाठी १८०० ते १९०० बसेस धावत होत्या. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आणि बससेवा सर्वसामान्यांसाठी सुरू केल्यानंतर सुमारे २५०० बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@