मृतदेहही बोलले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2020
Total Views |


Devendra fadanvis_1 



कोरोना विषाणूच्या जागतिक संकटात भल्याभल्या देशांची मती गुंग झाली आणि त्यांच्याही हातून काही चुकाही घडल्या. पण, जेव्हा चूक लक्षात आणून दिली जाते, तेव्हा ती एक सुधारण्याची संधी असते. मात्र, चूक लक्षात आणून देणार्‍यालाच जेव्हा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते, तेव्हा त्या शासनाविषयी काय बोलावे, असा प्रश्न पडतो. कोरोनाचा देशात, राज्यात आणि मुंबईत फैलाव होणे हा शासन आणि प्रशासनाचा दोष नाही. पण, कोरोना विरोधातील लढ्यातील विस्कळीतपणा आणि सत्य दडवून ठेवण्याची वृत्ती हा निश्चितच त्या यंत्रणेचा दोष नव्हे, तर गुन्हा म्हणावा लागेल. कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांची खरी संख्या समोर आणायला काय हरकत आहे? मात्र, शासनाने नेमके हेच दडवले आणि विरोधकांच्या तोंडून ते मृतदेह बोलू लागले आणि त्यांची गणती करावी लागली. मात्र, त्या गणतीअगोदार ज्यांनी हा मुद्दा लावून धरला, त्या विरोधकांवर अर्थात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संकटातही राजकारण करत असल्याचा आरोप करून सत्ताधार्‍यांनी करुन, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह ही दडवून ठेवण्यातली बाब नव्हे, हे सत्ताधार्‍यांना आता चांगलेच लक्षात आले असेल. मुंबईत मृतदेह गायब होण्यापासून या प्रकरणाची सुरुवात झाली. भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरत रुग्णालयातून रेल्वे स्थानकात आणि रेल्वेमार्गात आणून ठेवलेल्या मृतदेहांचा शोध घ्यायला लावला. नंतर ते मृतदेह आणून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, यातून मृतदेहांची हेळसांड आणि नातेवाईकांना नाहक मनस्ताप व्हायचा तो झालाच. तोच प्रकार मृतदेहाच्या गणतीतही झाला. देवेंद्र फडणवीस यांनी ९५० हून अधिक मृतदेहांची गणती झाली नसल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आणि हे मृतदेह दडवणार्‍यांवर कडक कारवाईची मागणी केली. त्याबरोबर चक्रे फिरली आणि अखेर सत्य समोर आले. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर दडवलेले १,३२८ मृतदेहही बाहेर आले. त्यामुळे असह्य झाले की मृतदेहही बोलतात हेच खरे!

संकटातही स्वार्थ...


असे म्हणतात की, संकटे माणसाला एकत्र आणतात, लढायला भाग पडतात, अधिक कणखर बनवतात. साधारण माणसे परमेश्वराकडे भौतिक सुख मागतात. पण, ध्येयवान माणसे चांगली बुद्धी आणि संकटातही उभे राहण्यासाठी सुदृढ शक्ती मागतात. कोरोना हे जागतिक महामारीचे संकट उभे ठाकल्यानंतर कित्येक गर्भगळीत झाले. मात्र, अनेकांनी घरी राहून त्याचा सामना केला, तर अनेकांनी शारीरिक अंतर राखून कित्येकांना मदतीचे हात पुढे केले. कोणी अन्नदान केले, कोणी बेघरांना मदत केली, कोणी रुग्णांना मदत केली, तर कोणी रक्तदानही केले. या सर्वांनी संकट हे सेवेची संधी मानले. अशा लोकांचा सर्वांनी आदर करायला हवा. त्यांच्यापासून बोध घ्यायला हवा. मात्र, असेही लोक निपजले की समाजाने त्यांचा कायम तिटकारा करावा. संकटातही त्यांनी स्वार्थ पाहिला आणि कोरोनाबाधित रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अक्षरश: मेटाकुटीला आणले. तो वर्ग म्हणजे खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांचा. रुग्णाला लुबाडणे म्हणजे रोग परवडला, इलाज नको असे म्हणण्यासारखे, तर मृत रुग्णाच्या नातेवाईकांना लुबाडणे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. बरे रुग्ण एकदा रुग्णालयात गेला की कसाईखान्यांत बकरी लोटल्यासारखी त्याची अवस्था होते. रुग्ण वाचवायचा असल्याने डॉक्टर म्हणतील तसे त्याच्या नातेवाईकांना वागावे लागते. मात्र, असह्य झाले की त्यांचा राग उफाळून येतो आणि डॉक्टरला मारहाण, रुग्णालयाची तोडफोड असे प्रकार घडतात. म्हणून डॉक्टरांनी पेशा आणि व्यवहार यांची सांगड घालून व्यवसाय करावा. डॉक्टरी हा धंदा होऊ देऊ नये. कोरोनाच्या संकटात महापालिकेची रुग्णालये फुल्ल झाली म्हणून खासगी रुग्णालयांना सेवेची संधी दिली, पण त्यांनी संकटातही स्वार्थ पाहिला. खासगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांकडून एक लाखांपासून १५ लाखांपर्यंतची बिले आकारत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयांची लूट करीत आहेत. यावर दुर्दैवाने महापालिका यंत्रणेचे कुठेही नियंत्रण दिसत नाही. पश्चिम उपनगरात ही परिस्थिती गंभीर आहे. प्रवीण दरेकर यांनी याबाबत आवाज उठल्यावर प्रशासन किती गांभीर्याने घेते ते महत्त्वाचे आहे.
 
 

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@