चिनीकोंडीचे ‘ट्रम्प’कार्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2020   
Total Views |


donald trump_1  



‘कोरोना’ला ‘वुहान व्हायरस, चिनी व्हायरस’ म्हणून वारंवार हिणवणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वार्थाने चीनच्या कोंडीसाठी आघाडी उघडलेली दिसते. कोरोनापूर्व काळातील अमेरिका-चीन व्यापारयुद्ध आता चरण सीमेवर जाऊन पोहोचले आहे. त्यामध्ये चिनी विमानांना अमेरिकेत बंदी असो, तिबेटला स्वतंत्र देशाचा दर्जा देणारे विधेयक की तैवानच्या सार्वभौमत्वासाठी तैपेई कायद्यावर शिक्कामोर्तब, ट्रम्प यांनी ड्रॅगनची खोड मोडायची कुठलीही कसर सोडलेली नाही. आंतरराष्ट्रीय संबंध आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून चीनला अडचणीत आणण्यासाठी जे जे शक्य होईल, ते सर्व करण्याची ट्रम्प यांची तयारीही आहे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता, ती त्यांची अपरिहार्यताही म्हणावी लागेल. ट्रम्प यांच्या या आक्रमक नीतींमुळे हळूहळू वैश्विक पातळीवर चीनला एकटे पाडण्याच्या प्रयत्नांनी जोर धरला. ट्रम्प यांचा द्वेष, उद्वेग साहजिकच आहे. कारण, कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले ते अमेरिकेत. आजघडीला कोरोनामुळे अमेरिकेत मृत पावलेल्यांची संख्या ही १ लाख, २० हजारांहून पुढे पोहोचली असून आगामी काळात त्यात वाढ होण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तेव्हा, या महामारीसाठी चीनला सर्वार्थाने जबाबदार धरत, या ड्रॅगनचा माज उतरवण्यासाठी ट्रम्प चीनला वारंवार लक्ष्य करताना दिसतात. लक्ष्य अशाच ठिकाणी, जी चीनची दुखरी नस आहे. मग तो प्रश्न तिबेटचा असेल, तैवानचा किंवा हाँगकाँगचा; चीनचे कंबरडे मोडण्यासाठी अमेरिकेने कुठलीही कसर आजवर सोडलेली नाही. सामरिकदृष्ट्याही दक्षिण चीन समुद्रात युद्धनौकांची तैनाती करुन ट्रम्प चहुबाजूंनी चीनला घेरण्यासाठी आता सज्ज आहेत. आता कुणी विचार करेल की, अमेरिका भारताला चीनविरोधात पाठिंबा देण्याव्यतिरिक्त अजून काही करु शकते का? पण, आक्रमक ट्रम्प यांनीही त्याचेही उत्तर देऊन टाकले.
 

चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांवरील अन्याय, अत्याचार आणि निर्घृण हत्याकाडांच्या कथा आता जगापासून लपून राहिलेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याविषयी अहवाल देणार्‍या संस्थांनीही याविषयी वेळोवेळी चीनची कानउघडणीही केली. परंतु, आंतरराष्ट्रीय संस्थांना भीक घालेल तो चीन कसला! चीनने या उघूर मुसलमानांना मोठमोठ्या तुरुंगांसारख्या कॅम्पमध्ये कैद करुन त्यांना इस्लामपासून, धर्मापासून परावृत्त करण्याचा मानसिक, शारीरिक अत्याचाराचा क्रूर खेळ चालवला आहे. ‘निधर्मी व्हा, अन्यथा मरा,’ या दृष्टीने चिन्यांनी लाखो उघूरांना कैद केले. त्यांच्या मशिदी जमीनदोस्त केल्या. आता उघूरांवर होणार्‍या या अत्याचार विरोधातील विधेयकावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. या विधेयकामुळे उघूरांवरील अत्याचाराशी संबंधित असलेला चीनचा पॉलिटब्युरो, कम्युनिस्ट पार्टीचे आणि सरकारमधील उच्चस्तरीय अधिकारी यांच्यावर सरसकट निर्बंध लादले जाणार आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. सर्वप्रथम चीनला दणका देण्याबरोबरच, उघूर मुसलमांनावरील अत्याचाराविरोधात ओठ उसवलेल्या मुस्लीम राष्ट्रांनाही ट्रम्प यांनी चपराक लगावली आहे. इतकेच नाही, तर मुस्लिमांच्या मानवाधिकारांची काळजी पूर्वीही अमेरिकेला होतीच आणि आताही आहेच, हे ट्रम्प यांनी या विधेयकातून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. खरं तर महासत्ता अमेरिकेला आव्हान देणारा दुसरा देश म्हणजे चीन. तेव्हा, आधीपासूनच व्यापारी पातळीवरील युद्धाची परिणती सर्वंकष युद्धात करुन चीनला खिळखिळे करण्यासाठी ट्रम्प एकही संधी सोडत नाही. हे विधेयकही त्याचाच एक भाग. परंतु, ट्रम्प यांच्या या विधेयकाची आणि भूमिकेची हवा काढली ती त्यांच्याच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांचा उघूरांवरील अत्याचाराचा आव हा केवळ दिखावा आहे. कारण, शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना विचारुनच, पूर्वकल्पना देऊन हे कॅम्पस सुरु केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. त्यासाठी ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या भेटींदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचेही माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितल्याने, पडद्यामागे नेमके काय घडले होते, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले. आता काय खरे, काय खोटे ते ट्रम्पच जाणो. त्यातच अमेरिका-चीन वादापासून चार हात लांब राहाण्याचा इशारा चीनने भारताला दिला. पण, जर चीन नेपाळ आणि पाकिस्तानला भारतविरोधी प्यादे म्हणून वापरु इच्छितो, तर अमेरिका त्यात स्वाभाविकपणे भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, हे चीननेही लक्षात ठेवावे.

 
@@AUTHORINFO_V1@@