चीनला चांगला धडा शिकवा; वीर पत्नीची मागणी!

    18-Jun-2020
Total Views |

Suneel kumar_1  


चीनी उत्पादने वापरणे थांबा, चीनला अद्दल घडवा; शहिदांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका 


नवी दिल्ली : चीनी सैन्यासोबत लडाखच्या गॅल्वान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. यांतील पाच जवान बिहारमधील होते. पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिले. त्यांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या गावी आणण्यात आले.


शहीद पतीचे अत्यादर्शन घेताना त्यांच्या वीरपत्नीने चीनला धडा शिकवावा अशी मागणी केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणांचा बदला चीनकडून घ्या, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा. त्याचबरोबर नागरिकांनी चीनी उत्पादने वापरणे थांबवा आणि चीनला चांगलीच अद्दल घडवा’, अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या.


बुधवारी संध्याकाळी शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव विशेष विमानाने पाटणा विमानतळावर आणण्यात आले. बिहटाच्या तारापूर गावात शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झाले होते. यावेळी गावातील प्रत्येक नागरिकाने चीनवर आपला रोष व्यक्त केला. गावच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्याकडेला नागरिक हातात तिरंगा आणि फुले घेऊन उभे होते. ‘जय हिंद’ आणि ‘भारत माता की जय’ च्या जयघोषात शहीद सुनील कुमार अनंतात विलीन झाले.