सुशांत : द अनटोल्ड स्टोरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2020   
Total Views |


sushntsingh rajput_1 



“तो” चित्रपटसृष्टीत आला. ‘कंपूशाही’ला फाट्यावर मारून त्याने स्वतःला सिद्धही केलं आणि तो निघूनही गेला. अशाच प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून ‘एक्झिट’ घेतलेल्या सुशांत सिंह राजपूतविषयी...


२१ जानेवारी १९८६ रोजी बिहारच्या पटना शहरातील माल्डीहा गावात सुशांतचा जन्म झाला. चार बहिणींचा एकुलता एक लाडाचा भाऊ. सुशांत बालपणापासूनच अभ्यासात हुशार. सुशांतचे वडील सरकारी कर्मचारी होते. आई-वडील, बहिणींसोबत आनंदाने जीवन व्यतीत करणार्‍या सुशांतचे वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी मातृछत्र हरपले. २००२ मध्ये त्याच्या आईचे निधन झाले. आईच्या जाण्याने कोलमडलेल्या सुशांतचा सांभाळ करताना बहिणींनी त्याला कधी आईची कमतरता भासू दिली नाही. सुशांतचे सुरुवातीचे शिक्षण पटनामधील सेंट करेंस हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्याकरिता तो दिल्लीला रवाना झाला. दिल्लीच्या कुलाची हंसराज मॉडर्न स्कूलमध्ये आपले शिक्षण सुरू ठेवले. दरम्यान त्याने ‘ऑल इंडिया इंजिनिअरिंग एन्ट्रन्स एक्झामिनेशन’ ही इंजिनिअरिंगसाठीची प्रवेश परीक्षा दिली होती. या परीक्षेत सुशांत संपूर्ण देशातून सातवा आला होता. ही परीक्षा उत्तीर्ण करत त्याने ‘दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.



दिल्लीला असतानाच सुशांतच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात झाली. त्याने आपल्या मित्रांसोबत नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. नृत्य प्रशिक्षण वर्गातल्या त्याच्या काही मित्रांनी जवळच असलेल्या नाट्य प्रशिक्षण वर्गात जाण्यास सुरुवात केली होती. मित्रांच्या सोबतीने सुशांतही या वर्गात जाऊ लागला. याच ठिकाणी त्याने आपल्यातील कलागुण ओळखले आणि यातच आपले भविष्य आहे, पुढे जाऊन आपल्याला याच क्षेत्रात काम करायचे आहे, असे त्याने ठरवले. पुढे त्याने प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक दावर यांच्याकडे नृत्य प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. या प्रशिक्षणादरम्यान त्याला काही स्टेज शो, डान्स शोज मधून काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान होणार्‍या ‘५१व्या फिल्मफेअर’मध्ये ‘बॅकग्राऊंडडान्सर’ म्हणून त्याने काम केले. २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्याची निवड झाली होती. या क्षेत्रात त्याचा जम बसत होता. त्याची मेहनत फळत होती. मात्र, या सगळ्याचा त्याच्या शिक्षणावर परिणाम होत होता. एकीकडे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरु होते, तर दुसरीकडे नृत्य आणि नाटक. यामुळे तो बर्‍याच वेळा इंजिनिअरिंगच्या पेपरमध्ये तो नापास झाला. शिक्षण आणि आवड यापैकी त्याने आपली आवड निवडत त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
 
करिअरचा विचार करत त्याने २००६मध्ये मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. सुशांतच्या या निर्णयाला सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता. मुंबईत आल्यावर सुशांतने एका छोट्या थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्षे तो या नाटकांतून काम करत होता. यादरम्यान त्याचा अभिनय लोकांना आवडू लागला होता. अशाच एका नाटकाच्यावेळी ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या लोकांनी त्याचा अभिनय पाहिला. त्याच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या त्यांनी सुशांतला ऑडिशन देण्यासाठी बोलावले. किस देश में है मेरा दिलया टीव्ही शोमध्ये एक छोटाशी भूमिका त्याला देण्यात आली. या भूमिकेला इतकी प्रसिद्धी मिळाली की, मृत्यू होताना दाखवलेल्या त्या पात्राला, पुन्हा आत्मा रुपात लोकांसमोर आणावे लागले होते. सुशांतला अभिनेता म्हणून खर्‍या अर्थाने ओळख मिळवून दिली ती ‘झी’च्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने! या मालिकेत त्याने साकारलेल्या ‘मानव’ या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेले. याचा मालिकेमुळे त्याच्यासाठी चंदेरी दुनियेचे अर्थात बॉलीवूडची कवाडं खुली झाली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनंतर ‘जरा नचके दिखा’, ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात त्याने आपल्या नृत्याचे जलवे दाखवले.
 
अभिषेक कपूरच्या ‘काय पो छे’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाची कथा चेतन भगत यांच्या कादंबरी ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ यावर आधारित होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटानंतर ‘राबता’, ‘केदारनाथ’, ‘पीके’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘छीछोरे’ यांसारखे बरेच यशस्वी चित्रपट बॉलीवूडला दिले. ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरीया चित्रपटातील भूमिकेमुळे सुशांत घराघरात ‘धोनी’ म्हणून ओळखला गेला. चित्रपटांसोबतच त्याला खगोलशास्त्र आणि अंतराळाविषयी आकर्षण होते. त्यासाठी उच्च दर्जाचा टेलिस्कोप त्याने खरेदी केला होता. हा टेलिस्कोप तो चित्रिकरणादरम्यान सोबत घेऊ जाई आणि फावल्या वेळेत ग्रहांचे निरीक्षण करे. याशिवाय त्याला वाचनाची आवड होती. इतक्या कमी वयात प्रसिद्धी, यशाचे शिखर गाठलेल्या या अभिनेत्याने १४ जून २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जाण्याने बॉलीवूड जगताने एक अनमोल हिरा गमावला. अशा या गुणी अभिनेत्याच्या स्मृतींना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

 
 
@@AUTHORINFO_V1@@