दापोलीकरांच्या मदतीला धावले २०० संघ स्वयंसेवक

    17-Jun-2020
Total Views |
Dapoli _1  H x



दापोली : निसर्ग चक्रीवादळाने ४ जून रोजी कोकण किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला. रायगड आणि दापोलीसह उत्तर रत्नागिरीतील अनेक किनारी भागांचे या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दापोली आणि मंडणगड भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु असून सुमारे २०० स्वयंसेवक कार्यरत आहेत.



दापोली आणि मंडणगड तालुक्यातील नुकसानग्रस्त घरांना २२ हजार ५०० कौलांचे आणि २०० सिमेंट पत्र्यांचे २५ स्वयंसेवकांच्या माध्यमातून वितरण करण्यात आले. सात गावांमध्ये कोने पत्र्यांचे वाटप करण्यात आले. ४०० जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. यात डाळ, तांदूळ, पीठ, तेल, साखर, तिखट, मेणबत्ती यांचा समावेश आहे. पंधराशे मेणबत्तीचे पुडे वाटण्यात आले.



कोकणातील बागायतींचे या वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली. तीन गावांतील ४४ घरांमध्ये ५० स्वयंसेवकांनी घरापासून विहिरीपर्यंत वाट काढून दिली तर ६२ स्वयंसेवकांनी वाड्या साफ करणे आणि पडलेल्या झाडांची खोडे कापून एकत्र करण्याचे काम केले. मदतीची नेमकी कोणत्या भागात आवश्यकता आहे याबाबत मदत घेऊन येणाऱ्या अन्य संस्था आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांच्या माध्यमातून मदत आणि मार्गदर्शन करण्यात आले.


संकटग्रस्त भागात छपरांवर घालावयाच्या पत्र्यांची टंचाई निर्माण झाली असून आसपासच्या व्यापाऱ्यांकडून स्थानिक व्यापाऱ्यांना / कार्यकर्त्यांना पत्रे उपलब्ध करून देण्यात संघ कार्यकर्त्यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. आजही या भागात मदतकार्य सुरु आहे. या मदतकार्यासाठी अधिकाधिक युवकांनी पुढे यावे आणि श्रमदान करावे, असे आवाहन रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.