यांचा ‘गृहप्रवेश’ कधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2020   
Total Views |


societies and house maids



कामवाली बाई कधी येणार? तिला सोसायटीत प्रवेश द्यायचा की नाही?’ यांसारख्या प्रश्नांचा भडिमार सध्या सोसायट्यांच्या सेक्रेटरीवर रहिवाशांकडून सुरु आहे. पण, बहुतांश ठिकाणी अजूनही घरकाम करणार्‍या महिलांसाठी प्रवेशबंदी कायम आहे. कारण, हल्ली सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तीला, पार्सल्सना, पाहुण्यांनाही कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेश नाकारला जातो. त्यात आता पालिकांनी सोसायटीची जबाबदारी सेक्रेटरी महोदयांच्या माथी मारल्यानंतर, त्यांनाही काही नियमांचे पालन करणे तसे भागच आहे म्हणा. पण, बाकी सगळं काही सुरु झालं, आता तरी घरकाम करणार्‍यांना, मदतनीसांना सोसायटीमध्ये प्रवेश द्यायला हवा, अशी मागणी करत बर्‍याच सोसाट्यांमध्ये दोन गट पडल्याचेही दिसते. पण आश्चर्य म्हणजे, सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित या महत्त्वपूर्ण बाबींवर मात्र राज्य सरकार, महानगरपालिकांनी कोणतेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे ‘अनलॉक’ नंतर पुन्हा कामावर रुजू झालेल्या मध्यमवर्गीय महिलांची मात्र ओढाताण सुरुच आहे. घरकाम करणार्‍या महिलांचा निश्चितच गृहिणी आणि खासकरुन कामावर जाणार्‍या महिलांना मोठा आधार असतो. धुणीभांडी, झाडू-लादी पुसणे, तर काही ठिकाणी या महिला स्वयंपाकाचेही काम करतात. त्यातच बर्‍याच ज्येष्ठ नागरिकांनाही मदतनीसांची गरज असते. पण, ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर या सर्व सेवाही आपसुकच ‘लॉक’ झाल्या. परंतु, वेळेचे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेव्हा सोसायट्यांमध्ये कुणीही यासाठी आग्रह धरला नाही. एकूणच सगळेच घरी असल्यामुळे ही घरकामं महिलावर्गानेही निभावून नेली. या घरकाम करणार्‍या महिलांचा विचार करता, त्यांना काहींनी पगारही माणुसकीच्या नात्याने देऊ केला. पण, आता बहुतांशी उद्योगधंदे आणि वाहतूक व्यवस्था पूर्ववत झाल्यानंतर सोसाट्यांमध्ये या घरकाम करणार्‍या महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीने जोर धरलेला दिसतो. काही सेके्रटरींनी जोपर्यंत सरकार सांगणार नाही, तोपर्यंत प्रवेश देणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली, तर काहींनी जुलैपासून घरकाम करणार्‍या महिलांना प्रवेश देण्याचे कबूलही केले आहे. त्यामुळे सोसायट्यांमधील हा गोंधळ आणि नाहक भांडणं टाळण्यासाठी राज्य सरकारने याबाबत एक निश्चित नियमावली जाहीर करण्याची गरज आहे.


 
आरोग्यं धनसंपदा...


 
महाराष्ट्र राज्य को.ऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्रही लिहिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री याची दखल घेऊन निर्णय घेतील, अशी अपेक्षा. पण, या काळात या घरकाम करणार्‍या महिलांचेही मात्र तितकेच हाल झाले. काही मंडळींनी या महिलांना मार्च, एप्रिल, मे महिन्याचा पगार दिला, तर काहींनी तेवढेही औदार्य दाखवले नाही. कारण, घरकाम करणार्‍या या महिला बहुतांशी असंघटित क्षेत्रात मोडतात. त्यांच्या अधिकारांची काळजी वाहणार्‍या, आवाज उठवणार्‍या सर्वश्रमिक संघटनेनेही या महिलांना महिन्याचा भत्ता आणि धान्य देण्याचीही मागणी सरकारकडे केली आहे. कारण, बहुतांशी घरांमध्ये या महिलांच्या कमाईवरच चूल पेटते. मुलांच्या शिक्षणाचा खर्चही तारेवरची कसरत करुन कसाबसा भागवला जातो. या घरकाम करणार्‍या महिलांची देशभरातील अधिकृत आकडेवारीनुसार संख्या आहे ४० लाखांच्या घरात. एकट्या मुंबईचा विचार करता, या घरकाम करणार्‍या महिलांची अधिकृत आकडेवारी तीन लाखांच्या आसपास असल्याचे दिसते. पण, सामाजिक संस्थांच्या मते, हा आकडा यापेक्षा खूप जास्त आहे. त्यातच ‘लॉकडाऊन’च्या काळात मध्यमवर्गीयांवरही पगारकपात आणि बेरोजगारीचे संकट ओढवल्याने अनेकांनी या घरकाम करणार्‍या महिलांना कायमची सुट्टी दिली, तर कित्येकांनी त्यांचे पगारही थकवले. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये तर अशा घरकाम करणार्‍या महिलांची मागणी वाढली आहे, ज्यांची त्या एकाच घरात राहून सर्व प्रकारच्या सेवा देण्याची तयारी असेल. त्यामुळे या वर्गाची परिस्थिती समजून, सरकारनेही निश्चितच त्यांना मदतीचा हात द्यायला हवा. पण, सोसाट्यांनीही आता ‘सोशल डिस्टन्सिंग’, दररोज टेम्परेचर चेकिंग, योग्य त्या आरोग्य तपासण्या करुन या घरकाम करणार्‍या महिलांना पुन्हा कामावर रुजू करणे तितकेच आवश्यक आहे. कारण, शेवटी त्यांनाही आपले घर चालवायचे आहेच. त्याचबरोबर या घरकाम करणार्‍या महिलांनाही यापुढे आपली स्वत:ची, आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची अधिकाधिक काळजी घ्यावी लागेल. छोट्या-मोठ्या आरोग्याच्या कुरबुरींकडेही आता दुर्लक्ष नको. लक्षात ठेवा, आरोग्यं धनसंपदा. तेव्हा, त्यांनीही सोसायट्यांनी सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन सहकार्य करणे गरजेचे आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@