ग्रंथांची थोरवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2020
Total Views |


dasbodh_1  H x


‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’, तुकारामांची अभंगगाथा आणि ‘दासबोध’ हे संतांचे ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे वैभव आहे. या ग्रंथकारांच्या कर्तबगारीवर व पुण्याईवर महाराष्ट्राचा भाग्योदय आधारलेला आहे. नैतिकता, चारित्र्य, भक्तिभाव, प्रामाणिकपणा, सत्य या संतांच्या शिकवणुकीतून महाराष्ट्राला आताही भाग्योदयाचा मार्ग दिसू लागेल.

समर्थांनी तीर्थाटनाच्या काळात पाहिले की, परकीयांची जुलमी सत्ता आणि परधर्मीयांचा झंझावात यात हिंदू समाजाची वाताहत झालेली होती. लोक सर्व प्रकारे गांजले होते. चारित्र्यहीनता बोकाळली होती. अशा प्रसंगी महाराष्ट्रात परतल्यावर अज्ञ, भोळसर, आळशी, निराश समाजाला धीर देऊन समर्थांनी त्यांना बलोपासना शिकवली. लोकांना राम आणि हनुमान यांच्या उपासनेला लावले. त्यांना प्रयत्नवादाची दीक्षा दिली. हिंदूसंस्कृती रक्षणार्थ एका नव्या संप्रदायाची स्थापना केली. संप्रदायातील शिष्यांना उपदेश करण्यासाठी गुरुशिष्यांचा संवाद असा ‘दासबोध’ ग्रंथ लिहायला घेतला. ‘दासबोध’ हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे. रामदासांच्या काळी ज्ञानेश्वर, एकनाथ व तुकाराम या पूर्वीच्या संतांनी लिहिलेले ग्रंथ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. हे ग्रंथ आध्यात्मिक ग्रंथ असून त्यांना समाजात मानमान्यता होती. अशावेळी ‘दासबोध’ हा वेगळा ग्रंथ लिहायला घेणे हे मोठे आव्हान होते. पण, तरीही समर्थांनी समर्थपणे ‘दासबोध’ ग्रंथाची शिष्यांसाठी निर्मिती केली. भारतीय तत्त्वज्ञान, भक्ती, प्रेम यांचे विवेचन करून उद्धाराचा मार्ग दाखवणारे संतवाङ्मय मराठी भाषेत ज्ञानेश्वरांपासून मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. त्यात सर्व जातीतील संतांनी योगदान दिले आहे व संतवाङ्मय समृद्ध केले. आपापल्या काळाला अनुसरून त्यांनी परमार्थावर विचार मांडले. त्यात प्रामुख्याने भक्ती, प्रेम, मानवजातीच्या कल्याणाचे चिंतन, चारित्र्यसंपन्नता, नैतिकता, विश्वबंधुत्व, ईश्वरचरणी शरणागती, शाश्वत समाधानाचा मार्ग या विचारांचा समावेश आहे. तत्कालीन संतवाङ्मयात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामांची अभंगगाथा हे विशेष मान्यता पावलेले ग्रंथ होते. आजही या ग्रंथांची लोकप्रियता कमी झालेली नाही. ‘दासबोध’ ग्रंथाचा हेतू त्यातील विषय पाहण्याअगोदर या महान ग्रंथकारांच्या ग्रंथांचा अल्पसा परिचय करून घेऊ.
 

ज्ञानेश्वरांनी वाङ्मयीन क्षेत्रात जे महान कार्य करून ठेवले आहे, त्याला मराठी वाङ्मयाच्या इतिहासात तोड नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत द्वैतमूलक सगुणभक्तीला अद्वैत तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मिळवून दिले. त्यामुळे ईश्वरभक्ती भाबडी न राहता डोळस झाली. ज्ञानेश्वरांनी प्राप्त केलेले परमार्थसाधन केवळ स्वतःसाठी न ठेवता, त्याला विठ्ठलभक्तीचे सार्वत्रिक रूप दिले. त्यामुळे पंढरीच्या वारीसाठी मोठा जनसमुदाय एकत्र आला. वारकर्‍यांमध्ये धार्मिक एकजूट होऊन तेथे जातीपातीचा प्रश्न राहिला नाही. भक्तिमार्गाला विधायक वळण मिळाले. ‘ज्ञानेश्वरी’ हा भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ असला तरी, तो त्यातील काव्यपूर्ण निवेदन, उपमा दृष्टान्ताने परिप्लुत आहे. त्यामुळे गीतेतील तत्त्वज्ञान समजायला सोपे झाले. ज्ञानेश्वरांनी रससिद्ध कविप्रतिभेने परमार्थावर विचार सोपे करून टाकले. एकनाथ मूलतः दत्तसंप्रदायी असले तरी त्यांचा स्वभावधर्म भागवत संप्रदायाला अनुकूल होता. प्रेमळपणा, सौजन्य, शांती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष त्यांच्या चरित्रात स्पष्टपणे दिसतात. विशुद्ध चारित्र्य आणि उदारता या गुणांमुळे त्यांनी महान कार्य केले. ‘एकनाथी भागवत’ हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. त्यात २० हजार ओव्या आहेत. भागवताच्या एकादश स्कंधावरील ही विस्तृत टीका आहे. आध्यात्मिक संस्कृतखेरीज इतर प्राकृत भाषांतून सांगण्यास काशीच्या पंडितांचा विरोध होता. परंतु, नाथांच्या या मराठी ग्रंथाला त्यांनी मान्यता देऊन त्या ग्रंथाची काशीक्षेत्रात पालखीतून मिरवणूक काढली. या ग्रंथात नाथांनी भागवत धर्मावर पांडित्यपूर्ण सविस्तर व्याख्यान केले आहे. ज्ञानेश्वरांच्या विचारांची त्यावर छाप आहे. मूळ भागवत ग्रंथात कर्म-अकर्म, विधी-निषेध यांवर विचार आहेत. नाथांनी या विचारात भक्तीचा जिव्हाळा पाहिजे, असे सांगून ते विचार वेगळ्या उंचीवर नेले. भागवतधर्माची परंपरा व स्वरूप सांगणार्‍या या ग्रंथाला वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वरीच्या बरोबरीचा मान दिला आहे. तुकारामांची अभंगगाथा पाहिली तर लक्षात येते की, त्यांनी लब्धप्रतिष्ठितांशीत झगडून आध्यात्मिक प्रगती साधली. त्यांच्या अभंगांत व्यक्तिगत आविष्कार तसेच वर्गीय सुखदुःखाचे विवरण आहे. तुकारामांनी धार्मिक, सामाजिक मिराजदारी व ढोंग यांच्यावर हल्ला चढवून आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांना नीतिमूल्यांची बैठक आहे. त्यांच्या अभंगांतील सकसपणा पांडित्यापेक्षा स्वानुभवावर आधारित आहे. त्यांची वाणी प्रखर व फटकळ आहे. समाजातील दुष्टावा व दांभिकता पाहून गप्प न बसता ते ‘तेथे पैजाराचे काम’ असे सांगून त्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवतात. ‘ज्ञानेश्वरी’ व ‘नाथभागवता’त असलेले सारे तत्त्वज्ञान त्यांच्या अभंगवाणीत पाहायला मिळते. तुकारामांची कामगिरी विधायक व विध्वंसक अशी आहे.
 

उदा.
दया तिचे नाव भूतांचे पालन । आणिक निर्दालन कंटकांचे॥
 


दासबोध ग्रंथात समर्थांनी कोणकोणते विषय हाताळले, हा ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा हेतू काय होता? अध्यात्मातील विविध प्रश्न हाताळताना त्यांनी कोणते आधार घेतले? कोणत्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाचे संदर्भ त्यांनी घेतले? यासाठी ‘दासबोधा’च्या सुरुवातीसच प्रास्ताविक स्वरुपाचा ‘ग्रंथारंभ’ नावाचा समास त्यांनी लिहिला आहे. त्यातील विवरण पाहण्याअगोदर समर्थांच्या एकंदरीत कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय करून घेणे इष्ट ठरेल. रामदासांनी रामचंद्र व हनुमान यांच्या उपासनेचा एक स्वतंत्र पंथ स्थापन केला. तत्कालीन राजकीय व सामाजिक स्थिती खालावलेली होती. ती सावरण्यासाठी बलोपासनेची आवश्यकता होती. म्हणून महाराष्ट्रातील इतर दैवतांचा पाठपुरावा न करता राम व हनुमान या दृष्टांत संहार करणार्‍या दैवतांची निवड केली. समर्थांना अज्ञान, आळस, भोळसरपणा, मूर्खपणा, परधार्जिणेपणा याचा अतिशय तिटकारा होता. त्यांनी लोकांना प्रतिकाराची शिकवण दिली. त्यांच्या डोळ्यांसमोर अखंड हिंदुस्तानातील पीडित हिंदू समाज होता. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी मठ स्थापना केली. महंतांना तयार करून तेथे पाठवून दिले. त्यांच्या कार्याची दिशा ठरवून दिली. महंतांचे, नि:स्पृहांचे असे जाळे हिंदुस्तानभर तयार करण्याची कामगिरी इतर संतांपेक्षा वेगळी होती. ज्या काळात प्रपंचाची अवहेलना होत होती, त्या काळात समर्थांनी प्रपंच परमार्थाची सांगड घालून लोकांना ऐहिक व पारलौकिक उत्कर्षाचा मार्ग दाखवला. समर्थांनी त्यांच्या संप्रदायात सामर्थ्य, चतुरस्वता, विवेक, लोकसंग्रह, उपासना, तत्त्वज्ञान, पद्धतशीर समाज संघटन, नैतिकता अशा लोकोपयोगी गोष्टींवर, गुणांवर भर दिला. परमार्थाची उपेक्षा न करता, प्रपंच विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. ‘दासबोधा’ची रचना ही तर्कशुद्ध, निश्चयात्मक, ओजस्वी आणि भेदक आहे. मठ, महंत, राजकारण, व्यवहार, चातुर्य, लेखनक्रिया, करंटलक्षण अशा लौकिक विषयांची चर्चा ‘दासबोधा’तून येते. आता ‘दासबोधा’त ‘ग्रंथारंभ’ नावाचा प्रास्ताविक स्वरुपाचा समास लिहिला आहे, त्यात समर्थ काय सांगतात ते पाहू.


 
त्यातील भाषा सुस्पष्ट व रोखठोक आहे. ग्रंथाचे नाव ‘दासबोध’, हा गुरु-शिष्यांचा संवाद आहे. यात मुख्यत्वे करून भक्ती, ज्ञान, वैराग्य, आध्यात्मनिरूपण आले आहे. असे ते सांगतात, तसेच चारी मुक्तींचे विवरण करून मोक्षप्राप्तीचा मार्ग त्याला सांगितला आहे. मुख्य देव कोणता, भक्ती, जीवाशिवाचा निश्चय सांगितला आहे. त्यातील अभिप्राय म्हणजे सार सांगताना समर्थांनी ‘भक्तिचेन योगे देव। निश्चये पावती मानव।’ असे सांगितले आहे. वेगवेगळ्या गीता, उपनिषिदे, भागवत, वेदांत व श्रुती या ग्रंथांचा आधार असला तरी या शास्त्रप्रचितीबरोबर आत्मप्रचिती म्हणजे अनुभव हा मुख्य आधार आहे. समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक ल. रा. पांगारकर म्हणतात की, “दासबोधाच्या मांडणीत वैशिष्ट्य आहे. ‘ज्ञानेश्वरी’ ‘एकनाथी भागवत’ हे ग्रंथ स्वानंदोद्गाराचे आहेत. थोड्याफार बरोबरीच्या श्रोत्यांत निघालेले हे स्वात्मसुखाचे बोल आहेत. तथापि, ‘दासबोध’ हा गुरुशिष्यांचा संवाद असून शिष्यश्रोत्यांच्या बोधार्थ सांगितलेला शिकवणुकीचा ग्रंथ आहे.” थोडक्यात, ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’, तुकारामांची अभंगगाथा आणि ‘दासबोध’ हे संतांचे ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे वैभव आहे. या ग्रंथकारांच्या कर्तबगारीवर व पुण्याईवर महाराष्ट्राचा भाग्योदय आधारलेला आहे. नैतिकता, चारित्र्य, भक्तिभाव, प्रामाणिकपणा, सत्य या संतांच्या शिकवणुकीतून महाराष्ट्राला आताही भाग्योदयाचा मार्ग दिसू लागेल. मराठीचा अभिमान बाळगणार्‍या मराठी भाषिकाच्या घरी यापैकी एखादा तरी ग्रंथ असावा. त्यातील विचारांचे मनन करावे. त्या विचारांच्या आचरणाने महाराष्ट्रसंस्कृती संपन्न होईल, यात शंका नाही.
 
 

- सुरेश जाखडी

 
@@AUTHORINFO_V1@@