‘कोरोनामुक्त मुंब्रा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2020   
Total Views |


mumbra_1  H x W


मौत से क्या डरना? हमे अपना फर्ज निभाना हैं।


‘अर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन’ आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मुंब्र्यामधील संजय नगर, समर्थ नगर, गावदेवी, शैलेश नगर येथे दि. ११ जून ते १४ जून असे चार दिवस आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ‘अर्शिया फाऊंडेशन’ला सर्वतोपरी मदत केली होती, ती भारतीय जनता पक्ष आणि जनकल्याण समितीने. या सगळ्या ‘कोरोना योद्ध्यां’ना भेटून एकच जाणवले, तो म्हणजे त्यांचा संकल्प- ‘मौत से क्या डरना? हमे अपना फर्ज निभाना हैं।’
 
दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या, रया गेलेल्या इमारती. या इमारतींच्या मध्ये एक अरूंद गल्ली. त्यातच पावसाची हलकीशी रिपरिप सुरू होती. चिखल आणि माशा, कोंदट परिसर यामुळे इथे कोरोनाचा संसर्ग वाढेल असेच दृश्य. कदाचित मुंब्र्याबाहेरची सर्वसामान्य माणसं इथे उभीही राहिली नसती. मात्र, तिथे आज मोठीच लगबग सुरू होती. ‘पीपीई किट’ घालून तीन माणसेबसली होती. एक जण माईकवरुन लोकांना आवाहन करत होता मेडिकल कॅम्पमध्ये तपासणी करण्याचे आवाहन करत होता. प्रत्येक इमारतीमधून लोक उतरून आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करण्यासाठी रांगा लावत होते. इतक्यात तपासणी करण्यासाठी आलेला एक जण म्हणू लागला, “क्युं चाहिये नाम नंबर? चेकअप किया ना? बस हो गया.” यावर नर्स म्हणाली, “आम्हाला नोंद करावी लागते.” तरी ती व्यक्ती नाव आणि नंबर द्यायला तयारच नव्हती. यावर नर्सने “रिदा मॅडम, जरा इकडे या,’’ असे म्हटले. गल्लीच्या बाहेरच उभ्या असलेल्या रिदा तत्परतेने तिथे आल्या. त्याला म्हणू लागल्या. “भाईजान, आपके अच्छे के लिये नाम और नंबर पुछ रहे हैं. अल्ला न करे कल को कुछ हो गया, तो हम एक दुसरे को मदत करे इसके लिये नाम और नंबर चाहिये.” रिदा राशिद त्यांना अतिशय प्रेमाने आणि खास मुंब्र्याच्या मुस्लीम हिंदी भाषेत समजावत होत्या. ही महिला आपल्याच जमातीची आहे आणि इमान म्हणून आपल्या जमातीसाठी काम करते, हे पटल्यावर शेवटी त्या व्यक्तीने आपले नाव आणि संपर्क क्रमांक दिला. पण, त्यांच्या मागे असलेली लांबच लांब रांग माज्ञ त्याला ओरडत होती, “तुमको नई करने का तो बाजू हो जाव, हमे चेकअप करना हैं।” एकंदरीत लोक स्वत:हून आरोग्य तपासणीसाठी येत होते. या माणसाने नाव, संपर्क क्रमांक देण्यासाठी नकार का दिला? यावर तिथे तपासणी करत असलेल्या एका नर्सने सांगितले की, यातल्या काही लोकांना याबाबत विचारले तर त्यांना वाटते की, ”ही माहिती एनआरसीसाठी वापरली जाईल. त्यांना देशाबाहेर काढले जाऊन त्यांचे नागरिकत्व रद्द केले जाईल. इथे प्रतिकारक्षमता वाढवण्याचे औषधही विनामूल्य वितरीत करत होते, तर काही मूठभर लोकांना शंका येते की, हे औषध दुसरे कसले तर नाही ना? पण, या रिदा मॅडम आणि त्यांचे कार्यकर्ते या लोकांना समजावतात म्हणून ते शांत होतात.” यावर ‘अर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन’च्या अध्यक्षा रिदा रशिद म्हणाल्या, “यात लोकांची काही चूक नाही. बिचारी हातावरचे पोट असणारी लोक. त्यांना भडकावले जाते. आज कोरोनाच्या संकटकाळात तर मुंब्र्राकरांची स्थिती फार वाईट आहे. वर्तमानपत्र आणि इतर माध्यमातून कळले की, मुंबई-पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वयंसेवी संस्था कोरोना संदर्भात आरोग्य तपासणी शिबीर राबवित आहेत. मी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्याशी संपर्क साधला. त्यांना विचारले की, अशा प्रकारचे आरोग्य शिबीर मुंब्र्यामध्ये राबवता येतील का? त्यानंतर अशा प्रकारचे आरोग्य शिबीर आयोजित करणे आणि संपूर्णत: कार्यान्वित करणे, यासाठी भारतीय जनता पक्ष आणि जनकल्याण समितीने सर्वतोपरीने आम्हाला मार्गदर्शन मदत केले.”
 
रिदा यांनी ‘अर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन’च्या माध्यमातून हे सेवाकार्य करण्याची तयारी दर्शविली. पुढे भाजपच्या आणि जनकल्याण समितीच्या माध्यमातून इथे आरोग्य शिबिराची रूपरेखा आखली गेली. इथे कोणत्या समस्या येऊ शकतात? इथे कोणत्या वस्तीमध्ये आरोग्य शिबीर राबवायला हवे, यासंदर्भात अभ्यास केला गेला. त्यातूनच मग मुंब्र्यामध्ये आरोग्य शिबीर राबविले गेले. मुंब्रा भाजपचे पूर्ण संघटन कौशल्य यामध्ये कामाला लागले. लोकांनीही आरोग्य शिबिराला प्रतिसाद दिला. तोच मुंब्रा जिथे अतिरेकी इशरतच्या नावे अ‍ॅम्ब्युलन्स फिरवण्यात आली, तोच मुंब्रा ज्या मुंब्र्याची लोकसंख्या १९९२ साली ४५ हजार होती. ती २०११च्या जनगणनेत नऊ लाख झाली. आता तर ती दुपटीने वाढलीही असेल. तोच मुंब्रा जिथे एप्रिलमध्येच २५ ‘तबलिगी’ जमातीचे लोक पकडले गेले, जे दिल्लीच्या मरकजला गेले होते. तेथून आल्यावर ते मुंब्र्यामध्ये लपले होते. त्यापैकी १३ बांगलादेशी, ८ मलेशियाचे आणि ४ स्थानिक होते. त्यामुळेच या आरोग्य तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीला विचारले की, “इथे तुमच्या घराजवळ येऊन हे लोक तुम्हाला आरोग्य तपासणीची सुविधा देत आहेत तुम्हाला काय वाटते?” यावर ती व्यक्ती म्हणाली, “काय बोलू? आम्ही मरत असताना हे लोक सख्ख्या भावाबहिणीसारखे मदतीला आले, नाहीतर आम्ही कुठे जाणार होतो? कोण आमच्यावर उपचार करणार होते? आमच्या आमदारांमुळे आमची अशी हालत झाली.” त्याचे उद्गार ऐकून वाटले, “अरे हो इथले आमदार तर राज्याचे मंत्री आहेत. कोरोनाच्या आपत्तीकाळात ते काय करतात?”
 


यावर एकजण म्हणाला, “कोरोना त्यांच्यामुळेच मुंब्र्यात आणला. कारण, ते इकडे तिकडे फिरायचे. त्यांच्या मिटींगमध्ये एका बड्या अधिकार्‍याला कोरोना झाला. आम्हाला माहिती आहे ना. तेव्हा त्या मिटींगला बसणारे, त्यांच्यासोबत काम करणारे सगळे ‘क्वारंटाईन’ झाले. पण, आमदारसाहेब ‘क्वारंटाईन’ झाले नाहीत. या सगळ्या काळात ते सगळ्या अधिकार्‍यांना, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना पण भेटायचे. मुंब्र्याचे त्यांच्या पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ झाले. त्यांनी कोरोना वस्तीमध्ये पसरवला.” त्याला आणि त्याच्या बोलण्याला दुजोरा देणार्‍या सगळ्यांना नाव विचारले. त्यावर लोक म्हणाली, “कशाला नाव लिहिता? उद्या लगेच आमच्या नावावर दोन-चार केसेस ठोकतील.” असो. ‘अर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन’ने इथे यापूर्वीही भरपूर सामाजिक कार्य केले आहे. गेल्या वर्षी इथे पाणीटंचाईची समस्या तीव्र होती. त्यावेळी भाजपच्या माध्यमातून रिदा रशिद यांनी पाण्याचे टँकर मागवले होते. त्यावेळची आठवण सांगताना कार्यकर्ते सांगत होते की, “हे टँकर रस्त्यावर उभे होते आणि आमदार आव्हाड रस्तयावर चकरा मारत उभे होते. हे पाणी मुंब्र्यात जाऊ देणार नाही, असे सांगत होते.” त्यावेळी रिदा म्हणाल्या, “तुम्ही पाण्याची सोय करू शकत नाही. मग आम्ही करतो, तर आम्हाला पण करू देत नाही. आम्हाला आमचे काम करू द्या. बराच गदारोळ झाल्यानंतर मग ते पाण्याचे टँकर वस्तीमध्ये गेले.” रिदा राशिद सांगतात ”मुंब्रा म्हणजे त्यांना मत घ्यायचा अड्डाच वाटतो. इथे कधीही कसल्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. इथे कब्रस्थानची जागा हडपून तिथे कत्तलखाना हलवण्यात आला. तेव्हा लोक घाबरून गप्प बसले. पण, आता कोरोनाच्या संकटकाळातही मुंब्राकरांच्या मदतीला ते आले नाहीत. अशा वेळी लोकांना आरोग्य सुविधेच्या सहकार्याची मदत हवी आहे. त्यामुळेच या आरोग्य शिबिराला लोक स्वत:हून येतात.”
 
हळूहळू गर्दी वाढत होती. या आरोग्य शिबिराची रचना अत्यंत व्यवस्थित लावलेली होती. आरोग्य शिबिरामध्ये ३० ते ४० कार्यकर्ते स्वेच्छेने कार्य करण्यासाठी तयार झाले. त्यांना प्रशिक्षण दिले गेले. दररोज सकाळी ते एकत्र जमतात. थोडा व्यायाम, प्रेरणादायी गीत म्हणतात. नाश्ता करून ते वस्तीमध्ये येतात. तिथे त्यांना सॅनिटाईझ केले जाते. ते ‘पीपीई किट’ परिधान करतात. मग हे लोक गटागटाने वस्तीतल्या गल्लीत जातात. दोन नर्स एक प्रमुख कार्यकर्ता आणि आणि आठ-दहा कार्यकर्ते. दोन नर्स आणि प्रमुख कार्यकर्ता लोकांची तपासणी नोंदणी करतात, तर बाकीचे कार्यकर्ते लोकांना आरोग्य तपासणीसाठी घराघरातून बाहेर काढतात. एका वस्तीतून हजारो लोकांची तपासणी होते. जे कोरेाना संशयित आढळतात, त्यांची नोंद नर्स घेतात. त्यावर पुढे आरोग्याच्या दृष्टीतून कार्यवाही केली जाते. दुपारी आरोग्य शिबीर संपले की कार्यकर्ते ‘पीपीई किट’ काढतात, त्यांना पुन्हा सॅनिटाईझ केले जाते. मग ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून त्यांचे एकत्र भोजन होते. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी होते. ती झाली की, कार्यकर्ते पुन्हा आपापल्या घरी जातात.
 
इथे सिकंदर खान नावाचा एक कार्यकर्ता होता. खूपच धावपळ, मेहनत करताना दिसले. आरोग्य शिबिराबाबत ते म्हणतात, “मुंब्य्राबद्दल आजपर्यंत काही चांगले ऐकले का? पण, अल्लाने प्रत्येकामध्ये चांगला नूर दिलेला आहे. आज मुंब्राकर म्हणून हा नूर, इमान व्यक्त करण्याची आम्हाला संधी मिळाली. हे अल्लाचे काम आहे,” तर भाजपचे मंडळ अध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले की, “मुंब्र्यामध्ये हे पहिल्यांदाच होत आहे. आता हा भाग झाला की कौसामध्येही आरोग्य शिबिराचे आयोजन करणार आहोत. लोक स्वत:हून बाहेर यायला घाबरतात. त्यांना वाटते की, चुकूनमाकून कोरोना झाला, तर हे सरकार त्यांना कुठेही टाकून देईल. तसेच कुठेही ‘क्वारंटाईन’ करतील. त्यामुळे आजार अगदी असह्य झाला की मगच लोक उपचारासाठी बाहेर येतात. पण, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.” रिदा रशिद आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांना भेटले. अत्यंत सहज सोप्या पद्धतीने हे सर्वजण लोकांशी संपर्क साधत होते. लोक त्रासदायक प्रश्न विचारत होतेच. पण, तरीही अत्यंत संयमाने, हसतमुखपणे हे सगळे काम करत होते. त्यांच्यातला उत्साह, समाजप्रेम तीळमात्र कमी होत नव्हते, का? यावर रिदा आणि सहकार्‍यांचे म्हणणे होते, “हे आरोग्य शिबीर आमच्या समाज आणि देशप्रेमाचे प्रतीक आहे. इस मिट्टीने बहुत कुछ दिया हैं, वक्त आया हैं, हमे भी फर्ज अदा करना हैं...”

“मुंब्र्यामध्ये कोरोना आपद्स्थिती हाताळण्यामध्ये महानगरपालिका सर्वर्थाने अपयशी ठरली. ठाणे प्रशासनाचे आधी म्हणणे होते की, मुंब्र्यामध्ये लोक सहकार्य करत नाहीत. पण, मुंब्र्यामध्ये रिदाताई यांच्या ‘अर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन’च्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबीर आयोजित केले होते. ठाणे भारतीय जनता पक्षाने या शिबिरामध्ये सक्रिय आणि पूर्णत: सहभाग घेतला. एक आरोग्य तपासणी करणारी मोबाईल व्हॅनही भारतीय जनता पक्षाने उपलब्ध केली. रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून आर्सेनिक अल्बम-३०आणि आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या प्रतिकारक्षमता वाढवणार्‍या गोळ्यांचे वाटपही करण्यात येत आहे. अर्शिया वेल्फेअर फाऊंडेशनआणि या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन. कारण, त्यांच्यामुळेच आज मुंब्र्यांच्या वस्तीपातळीवर ७५०० लोकांची आरोग्य तपासणी होऊ शकली.”


- निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष, ठाणे शहर भाजप


सिकंदर खान, इशाक मुलानी, असलम शेख, शादाब शेख, शादाब पठाण, रिझवान कादिर शेख, साबिर शहा, सईद खान यांनीं या आरोग्य शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेतला. भाजप मंडल अध्यक्ष कुणाल पाटील आणि सहकार्‍यांनीही मदत केलीच. पण, मुंब्र्यातले आरोग्य शिबीर पूर्णत: लोकोपयोगी व्हावे, यासाठी रा. स्व. संघाशी संबंधित संजय नगरकर सुरेंद्र चंपानेरकर, महेश जोशी, अथर्व थत्ते, संतोष धुमक, तनय दांडेकर यांनी आरोग्य शिबीर सुरळीत चालावे, यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

 
@@AUTHORINFO_V1@@