आणखी एका पालिका सुरक्षा रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

    17-Jun-2020
Total Views |

BMC_1  H x W: 0



मुंबई :
महापालिका मुख्यालयासह विविध कार्यालयांची सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षकही कोरोनाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे पालिका वर्तुळात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री उशिरा आणखी एका सुरक्षा रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ७ सुरक्षा रक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ११४ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, कामाचा ताण त्यात कोरोनाचा धोका यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



हेमंत दत्ताराम मुरुडकर हे पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ११ जूनला त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशीरा त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ३६ सुरक्षा रक्षक विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या ४५ सुरक्षा रक्षकांपैकी काही जण होम क्वारंटाईन असून काही जण कोरोना काळजी केंद्रात उपचारासाठी दाखल आहेत. तर आतापर्यंत २६ सुरक्षा रक्षकांनी कोरोनावर मात केली आहे.



मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तीन महिन्यांपासून मुंबई महापालिकेची सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. कोरोनाविरोधात लढणाऱ्या पालिकेच्या १,७५८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर पालिका मुख्यालयासह विविध विभाग कार्यालयांची सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षकांनाही कोरोना महामारीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांना कोरोनामुळे २४ तास ड्युटी लावण्यात आली आहे. मुंबई महापालिका मुख्यालय, २४ विभाग कार्यालये, पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते, मलनि:सारण, रुग्णालये, प्रसूतिगृहे, मेडिकल कॉलेज, राणीबाग, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त कार्यालये यासह विविध ठिकाणी पालिका सुरक्षा रक्षक आपली सेवा बजावत आहेत. विविध कार्यालयाच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची सुरक्षा रक्षकांना प्रवेशद्वारातच 'इन्फ्रारेड थर्मामीटर'ने तपासणी करावी लागत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.