अति घाई संकटात नेई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2020   
Total Views |


country_1  H x

 

काहीच दिवसांपूर्वी स्वत:ला ‘कोरोनामुक्त’ घोषित करणार्‍या न्यूझीलंडमध्येही पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळल्याने, न्यूझीलंड सरकारच्या कोरोनामुक्तीच्या दाव्यावर पाणी फेरले. त्यामुळे कोरोनामुक्तीची घोषणा करुन जागतिक शाबासकी मिळवणार्‍या न्यूझीलंडने देशातील सर्व निर्बंध शिथील करुन अतिघाई तर केली नाही, असाच प्रश्न आता उपस्थित होतो.


 

‘कोरोना’ महामारीने गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरले. ‘लॉकडाऊन’ने अख्खे जग जवळपास स्थिर, स्तब्ध झाले. पण, आता हळूहळू या सर्वार्थाने बैचेन करणार्‍या स्तब्धतेतून शहरं, राज्य, देश बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहेत. कारण, साहजिकच, कोरोनामुळे २०२०चे सुरुवातीचे सहा महिने आरोग्य, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत निराशाजनक आणि एक मोठा आघात करुन गेले. विकसित राष्ट्रांच्या विकासाचा फुगा फुटला, तर चीनसारख्या इतकी वर्षं पडद्याआड जगाला वेठीस धरण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या देशाचे बिंगही फुटले. त्यामुळे या महामारीतून महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली. युद्धाचे काळे ढग अजूनही विरलेले नाहीत. परंतु, या बिकट परिस्थितीतही अर्थचक्र पुन्हा वेगवान करण्यासाठी कित्येक देशांनी ‘लॉकडाऊन’मधून ‘अनलॉक’च्या वाटा पत्करल्या. पण, सध्याची जागतिक स्थिती पाहता, कोरोनाचा प्रादुर्भाव हा वर्षअखेरपर्यंतही कमी होईल, याची मुळीच शाश्वती नाही. फक्त आणि फक्त एक परिणामकारक लसच या कोरोनाला कायमस्वरुपी आटोक्यात आणण्यासाठी आशेचा किरण ठरु शकते. पण, ते होईल तेव्हा होईला. किमान तोपर्यंत तरी माणसाने जगणेही महत्त्वाचे आणि कार्यप्रवण राहणे हे त्याच्यासाठी, देशासाठीही तितकेच महत्त्वाचे. म्हणजे, एकीकडे जीवही जपायचाय आणि दुसरीकडे देशही. याच विवंचनेतून बहुतांशी युरोपीय राष्ट्रांनीही ‘पुनश्च हरिओम’ करत निर्बंध शिथील केले. परंतु, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही अति घाई मात्र अधिक संकटांना आमंत्रण देणारी ठरु शकते.


कोरोनाचे संकट, प्रादुर्भावाचा धोका आजही कायम आहे. ज्या चीनच्या वुहानमधून ही विषवल्ली पसरली, ते शहर आज कोरोनामुक्त झाले असले, तरी आता कोरोना चीनची राजधानी बीजिंगभोवती विळखा घट्ट आवळताना दिसतोय. तेथील झिनफाडी मार्केट हा कोरोनाचा नवा केंद्रबिंदू असून ३० मे रोजी तब्बल दोन लाख लोकांनी या मार्केटला भेट दिली होती. गेल्या काही दिवसांत या मार्केटशी संबंधित असलेल्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने बीजिंगमधील काही भागांमध्ये कडक ‘लॉकडाऊन’ सुरु झाला. एवढेच नाही तर शहरातील सर्व अन्नधान्याची दुकाने, बाजारपेठा, तेथे काम करणारे कर्मचारी यांची तपासणीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाने आणि तेही चीनच्या राजधानीत डोके वर काढल्याने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. चीनची जिरवण्यासाठी बीजिंगमध्ये मुद्दाम कोरोनाचा विषाणू अन्नधान्याच्या मार्केटमध्ये पेरला तर गेला नाही ना, याचा शोधही आता चीन सरकारकडून सुरु आहे. पण म्हणतात ना, करावे तसे भरावे!


काहीच दिवसांपूर्वी स्वत:ला ‘कोरोनामुक्त’ घोषित करणार्‍या न्यूझीलंडमध्येही पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळल्याने, न्यूझीलंड सरकारच्या कोरोनामुक्तीच्या दाव्यावर पाणी फेरले. त्यामुळे कोरोनामुक्तीची घोषणा करुन जागतिक शाबासकी मिळवणार्‍या न्यूझीलंडने देशातील सर्व निर्बंध शिथील करुन अतिघाई तर केली नाही, असाच प्रश्न आता उपस्थित होतो. तिथे ४४ युरोपीय देशांपैकी ३५ देशांनी केवळ युरोपवासीयांसाठी आपल्या सीमा खुल्या केल्या. खरंतर अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला तो युरोपमध्ये. पण, कोरोना रुग्णांची तुलनेने कमी झालेली संख्या पाहता, बहुतांशी युरोपियन देशांनी ‘अनलॉक’ करुन टाळेबंदीतून नागरिकांची मुक्तता केली. फ्रान्समध्ये बार, रेस्टॉरंट, कॅफे पुन्हा गजबजले, तर २२ जूनपासून शाळा सुरु होणार असून विद्यार्थ्यांसाठी हजेरी अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे, फ्रान्समध्ये १ लाख, ९० हजारांवर कोरोना रुग्ण आढळले असून २९ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण, जूनमधील कोरोना रुग्णवाढीचा घटलेला दर बघता, फ्रान्सने ‘अनलॉक’चा निर्णय घेतलेला दिसतो. पण, याच युरोपियन राष्ट्रांनी नागरिकांसाठी सीमा खुल्या करण्याचा निर्णय धोक्याची घंटाही ठरु शकतो. तसेच कोरोनाची दुसरी मोठी लाट युरोपमध्ये पुन्हा हाहाकार माजवू शकते, अशीही शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे ‘अनलॉक’ करताना, उगाच अति घाई करुन भविष्यात संकट ओढवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आणि महत्त्वाचे म्हणजे, नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह मार्गक्रमण करण्याशिवाय कुठल्याही देशाला गत्यंतर नाही.

@@AUTHORINFO_V1@@