वृक्षलागवडीतून जलव्यवस्थापन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2020   
Total Views |


tree plantation_1 &n


मान्सूनचा काळ हा शेतीबरोबरच वृक्षलागवडीसाठीही अत्यंत पोषक समजला जातो. तसेच या काळात अतिवृष्टीमुळे पूरस्थितीही उद्भवते. तेव्हा, खासकरुन नदीकिनारी पूरस्थिती नियंत्रणासाठी आणि जलसंधारणासाठी वृक्षलागवडीतून जलव्यवस्थापनाच्या केलेल्या काही प्रयोगांची ही यशोगाथा...


कोरड्या पडलेल्या नद्या पुन्हा प्रवाहित करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. कारण, साहजिकच त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे काम कठीण असते. पण, या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा असा की, नदीकिनारी वसलेल्या रहिवाशांना नदीपासून अनेक प्रकारचे फायदे उपलब्ध होत असतात. मात्र, बरेचदा सरकारचा नद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा धोरणात्मक वा कायद्याच्या अंतर्गत येणार्‍या कामांपुरता मर्यादित दिसतो. तसेच सामाजिक संस्था नद्यांकडे समाजहिताच्या दृष्टीने बघतात. नदीच्या छोट्या वा त्यांच्या आवाक्यातील भागाकरिता जल-व्यवस्थापनामध्येही लक्ष घालणार्‍या काही पाणी वाटप संस्था आहेत. म्हणूनच, सरकारी वा बिगर सरकारी संस्थांनी नदीविषयक कामांमध्ये लक्ष घातले, तर ती कामे एकमेकांना पूरक आणि समाजोपयोगी निश्चितच ठरु शकतील.

 
तामिळनाडूमधील काही नद्यांची स्थिती


पंबार आणि कोट्टाकरिअर नद्यांच्या खोर्‍यांकडे लक्ष घातले तर आढळते की, या नद्या सर्व प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. यामध्ये नदी तीराच्या क्षेत्रात जंगलतोड, पर्जन्याचे दुर्भीक्ष, नदीचे पाणी आटणे, नदी-तीरांवर अतिक्रमण, कधी पुराचा धोका तर कधी दुष्काळ पडून उपासमारीची परिस्थिती या नदीकिनारी भागात राहणार्‍या लोकांवर उद्भवते. तसेच नदीतील बेसुमार वाळू उपसा हे देखील नदीचे पात्र कोरडेठाक पडण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. तामिळनाडूमधील ऐतिहासिक ऊरानी जलाशय प्रणालीत थोड्याशा पर्जन्यातून नद्यांना प्रवाहित करण्याची व्यवस्था केलेली असताना, प्रत्यक्षात मात्र त्याचे फळ मिळताना दिसत नाही. कारण, या नद्या पूर्णपणे वाहत नाहीत. त्यात अनियमित पर्जन्यमान व टाकी गाळांनी भरलेली वा जलाशयाच्या उंची क्षमतेत बदल झाल्यामुळे साठा केला जात नाही.
 
नदी रुपी धन...


‘धन फाऊंडेशन’ या संस्थेने अ‍ॅक्सिस बँकेच्या आर्थिक मदतीने २०११ मध्ये येथील जलव्यवस्थापन प्रणाली सुधारण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यांनी तामिळनाडूमधील ६६८ नैसर्गिक जलाशये वा पाणवठ्यांचे नूतनीकरण करून त्यांची साठवणूक क्षमता १.५५ लाख घनफळापर्यंत वाढविली. त्यामुळे ११,९५३ शेतकरी कुटुंबांना जलसिंचनाकरिता मुबलक जलसाठा उपलब्ध झाला. जलाशये वा पाणवठ्यांच्या तळाकडील पाझरण्यातून २,५५० कूपनलिकांचा जलसाठास्तर वाढविला गेला व त्यातून १५,४८२ कुटुंबांना पिण्याचे पाणी मिळाले. नदीच्या किनारी प्रदेशातील रहिवाशांना या कार्यक्षम जलव्यवस्थापनातून अनेक लाभ मिळाले व त्या दोन नद्यांमध्ये प्राणही ओतला गेला. या यशस्वी प्रयोगानंतर ‘धन फाऊंडेशन’ संस्थेने नदीच्या खालच्या अंगाची कामेही उरकली. दुसरीकडे, वाळवंटी, रुक्ष राजस्थानमध्ये ‘तरुण भारत’ नामक बिगर सरकारी संस्थेने अल्वर जिल्ह्यात जलसाठा वाढविण्याचा प्रयोग यशस्वी केला. या संस्थेचे मुख्य जलपुरुष राजेंद्र सिंग होते. त्यांनी जलसंधारण योजना आखून कित्येक ठिकाणी झर्‍यांचे नूतनीकरण केले व विहिरींचा जलसाठा वाढविला. वनक्षेत्रेही जलसंधारणाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात. जलव्यवस्था शिक्षण संस्था असा नियम सांगतात की, बाष्पयुक्त वार्‍यांमुळे ढगांचे व पावसाचे प्रमाण वाढू शकते. अबुधाबी व दुबईला अशा स्थानिक परिवर्तन केलेल्या वार्‍यांमुळे आधीच्या काळापेक्षा हल्ली पावसाचे प्रमाण वाढले आहे.
 
घणसोली येथे वनक्षेत्रे निर्माण करण्याची किमया


पुण्याच्या ‘बीएआयएफ’ संशोधन आणि विकास उद्योग या संस्थेचे नारायण हेगडे म्हणतात की, “औद्योगिक मलजल प्रक्रियेनंतर ते घणसोलीच्या खडकाळ अशा २०० हेक्टर क्षेत्राच्या टेकडीवर जलसिंचनाकरिता वापरले गेले व त्यातून पाच-सहा वर्षांच्या काळानंतर मोठे हरित वनक्षेत्र निर्माण झाले. ५० हून अधिक जाती-प्रजाती आज तिथे आढळतात.” वर उल्लेखलेल्या नवीन क्रियाशीलतेच्या प्रयोगातून दोन उद्दिष्टे साधली गेली. एक तर मलजल विनियोग आणि दुसरे म्हणजे जंगलतोडीला आळा घालणे, ही दोन्ही उद्दिष्टे ‘बीएआयएफ’ने पार पाडली आहेत. शिवाय नेहमीचे मलजल खाडीमध्ये सोडण्याची प्रक्रियाही बंद झाली.
 

जलव्यवस्थापन तंत्रातील बदल आणि नगदी पिकांची लागवड


तामिळनाडूतील पालर नदीचे पाणी पूर्णपणे आटले होते. त्यामुळे १६ एकर जमिनीचा मालक असलेल्या शेतकरी सुरेशकुमारने ‘ईशा फाऊंडेशन’च्या मदतीने जास्त पाणी लागणारी भात व डाळींची पिके फक्त पाच एकरांमध्ये घेतली. तसेच कमी पाणी लागणार्‍या टिंबर व कॅज्युअरिना झाडांची पिके ११ एकरमध्ये बदलून घेणे सुरू केले. भात-डाळींकरिता कूपनलिकांचे पाणी दिले व इतर पिके कमी पाण्यात वाढविली. त्यामुळे सुरेशकुमारना दुहेरी फायदा झाला. टिंबर व कॅज्युअरिना पिकांमुळे जमिनीचा नत्र-कस वाढला व या बदललेल्या पिकातून जास्त किंमत पण मिळाली. यासाठी त्यांना करावे लागले ते योग्य जलव्यवस्थापन. ९० किमी दक्षिणेकडील भागात कुड्डालोरची ५० एकर जमीन मालक असलेले कस्तुरीबाई व भास्करन म्हणतात की, “जवळची नदी हंगामी झाली आहे व कूपनलिकेतूनही चक्क खारट पाणी मिळते.” पण, तरीही त्यांनी जमिनीवर ‘कॅशक्रॉप कॅनोपी’ बनवून जलक्रांती केली. कॅज्युअरिना, साग, रोझवूड, रेड सॅन्डलवूड, महोगनीच्या झाडांची पिके घेतली. शिवाय फळझाडे नारळ, पेरू आणि सापोटाची पिके घेतली. अशा पुनर्वृक्षवाढीतून त्या ठिकाणचे पर्जन्यमान सुधारले. पाणी फुकट वाहून जाण्याचे प्रमाण कमी झाले. जमिनीची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढली. तसेच कावेरी खोऱ्यात राहणारे व ५० एकर जमिनीचे पुडूकोट्टूचे मालक आर. नरसिंहन यांनी जास्त शाश्वत अशी रेड सॅन्डर, महोगनी व सिल्व्हर ओकची झाडे व बरोबर २०० टन आंबे व ६० टन केळींच्या फळबागा फुलवल्या. आध्यात्मिक नेता सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी नद्यांच्या जागरुकतेकरिता २०१७ मध्ये सात हजार किमीची १६ राज्यांमधून जाणारी मोठी यात्रा कोईम्बतूरहून सुरू केली होती. त्या यात्रेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, पंजाबचे राज्यपाल व्ही. पी. सिंग बदनोरे, क्रिकेटवीर वीरेंद्र सेहवाग, क्रिकेटपटू मिथाली राज, शर्यतवीर नारायण कार्तिकेयन आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. या यात्रेतूनही मोठ्या प्रमाणावर नद्यांविषयी जनजागृती करण्यात आली.
 
नदीच्या तीरावरील वृक्षलागवडीतून काय मिळते?


. वृक्षांची मुळे जमिनीची धूप थांबवतात. नदीत गाळ वाढू देत नाहीत.
 
. मुळांभोवतीच्या जमिनीत स्पंजसारखे बनून जमिनीची बाष्पक्षमता म्हणजेच जलवाढ करतात.
 
. पाणी जमिनीत शिरण्याच्या आधी शेतातील खतामधील विषारी द्रव्ये शोषून घेऊन ती नष्ट करतात.
 

आपण जीवंत आहोत कारण आपल्या नद्या अजून शाश्वत आहेत. मोहेंजोंदडो-हडप्पा संस्कृती टिकून राहिल्या जोपर्यंत नद्या जीवंत होत्या आणि त्या संस्कृतीतील माणसे नष्ट झाली, जेव्हा या नद्यांनी त्यांचा मार्ग बदलला. सध्याच्या काळातील आपल्या नद्यांची अवस्था अतिशय विदारक आहे. या सगळ्या नद्या पुढील २० वर्षांत हंगामी बनायला लागल्या आहेत. तामिळनाडूमधील कमीत कमी १२ नद्या कोरड्या पडल्या आहेत. आज दक्षिणेकडील महत्त्वाच्या कावेरी, कृष्णा आणि गोदावरी या नद्या फक्त महासागरापर्यंतच जातात. त्यामुळे मानवाला सुखी जलजीवन मिळवायचे असल्यास नद्या जीवंत ठेवण्यावाचून पर्याय नाही. वृक्ष पाण्यावर जगत नाहीत, तर नद्यांना पाणी वृक्षांकडून मिळते असे म्हणणे रास्त ठरेल. कधी झटक्यात काही वर्षांत आपल्याला जादा पर्जन्यमान मिळते. परंतु, हे जागतिक वाढीव तापमानामुळे मिळालेले असावे. दक्षिण पठाराच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंना महासागर आहेत आणि जे जादा पर्जन्यमान मिळते ते सागरात पोहोचून लुप्त होते. मुंबईसारख्या किनारी भागात पावसाळ्यात पूर येतात. चेन्नईला डिसेंबरमध्ये पूर येतो. त्यामुळे अशा पुरांचे योग्य असे जलव्यवस्थापन करून पुराचा बंदोबस्त करणे जरुरी आहे.
 
 
बिगर सरकारी व सरकारी संस्थांनी मिळून करावे जलव्यवस्थापन


 
नदी किनार्‍यावरील अतिक्रमण, वाळूउपसा, मलजलाचे प्रक्रियेविना नदीत वा समुद्रात विसर्जन या गोष्टी बंद करण्याकरिता सरकारकडून कायद्यांच्या मदतीने कडक बंदोबस्त करून त्या अंमलात आणणे गरजेचे आहे. तसेच गंगा व यमुना नद्यांची शुद्धीकरण योजना कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुर्भाग्याने यशस्वी झालेली दिसत नाही. त्याकरिता जनजागृती व नागरिकांची स्वत:हून शुद्धीकरण योजनेत भाग घेण्याची तयारी असणे गरजेचे आहे. या शुद्धीकरण योजनेतील व्यापारी सौद्यांवर बंदी आणून, नदीलाच केंद्रस्थानी ठेवून योजना आखायला हव्यात. आपल्या देशात अशा कार्यक्षम जलव्यवस्थापनेची कामे ठिकठिकाणी सुरू करावयाला हवीत.
 
 
 

@@AUTHORINFO_V1@@