परदेशातील एक स्वदेशी खेळाडू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2020
Total Views |


Robin Singh_1  


रॉबिन सिंगचा जन्म वेस्ट इंडिजमध्ये झाला. मात्र, या खेळाडूने क्रिकेटमध्ये करिअर घडविले ते भारतीय खेळाडू म्हणून. परदेशातील एक स्वदेशी खेळाडू म्हणून ओळख असलेल्या या खेळाडूवषयी...


क्रिकेट हा तसा अनिश्चिततेचा खेळ. या खेळात कधी काय घडेल, याचा नेम नाही. अनेक देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या या खेळात आंतरराष्ट्रीयस्तरावरील खेळाडू म्हणून नाव कमावण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी किती कालावधी लागेल, याची काहीच शाश्वती नाही. म्हणूनच मग काहींचे हे स्वप्न पूर्णत्वास जाते, तर काहींचे स्वप्न हे स्वप्नच बनून राहते. ज्यांना संधी मिळते ते आपल्या कामगिरीच्या जोरावर क्रिकेटमध्ये करिअर घडवितात. मात्र, संधी हुकलेल्या क्रिकेटपटूंपैकी अनेकांच्या क्रिकेट करिअरला पूर्णविराम लागतो. मात्र, क्रिकेटविश्वात आजच्घडीला असेही काही खेळाडू आहेत की, ज्यांनी दुसर्‍या देशाचे नागरिकत्व स्वीकारत त्या देशामधून क्रिकेट करिअर घडविले आहे. क्रिकेटविश्वात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्या जन्म एका देशात झाला. मात्र, क्रिकेट खेळले ते दुसर्‍याच देशासाठी. क्रिकेटविश्वात हे पूर्वापारपासून चालत आले आहे. भारतीय क्रिकेटमध्येही हा प्रकार ९०च्या दशकात झाला आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंग हा त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. रॉबिनचा जन्म वेस्ट इंडिजमधील त्रिनिदाद येथे झाला. तसे सिंग कुटुंबीय हे मूळचे भारतीय.

 
अगदी १९८०च्या दशकातच हे सिंग कुटुंबीय वेस्ट इंडिजमध्ये स्थायिक झाले. व्यवसायानिमित्त हे कुटुंबीय परदेशी स्थायिक झाले असले तरी या कुटुंबीयांची भारताशी नाळही कायमची जोडलेली होती. त्यामुळे आपल्यापैकी कुणी तरी एका सदस्याने भारतासाठी काही तरी करावे, अशी सिंग कुटुंबीयांची फार इच्छा होती. त्यावेळी ही इच्छा पूर्ण झाली नसली तरी काही काळानंतर हा योग अखेर जुळून आलाच. १४ सप्टेंबर, १९६३ साली सिंग कुटुंबात एका बाळाच जन्म झाला. कुटुंबीयांनी त्याचे नाव ‘रॉबिन’ असे ठेवले. वेस्ट इंडिजमधील त्रिनिदाद येथे जन्म झाल्यामुळे त्याचे नाव ‘रॉबिन’ असे ठेवण्यात आले. मात्र ‘सिंग’ या आडनावामुळे तो भारतीय वंशाचा असल्याची त्याची ओळख कायम होती. रॉबिनला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. वेस्ट इंडिज हे क्रिकेटचे माहेरघर मानले जाते. भारताप्रमाणे येथे अनेकांना क्रिकेटचे वेड असून देशातील अनेक ठिकाणी हा खेळ आवर्जून खेळला जातो. त्रिनिनादमधील समुद्रकिनारी स्थानिक मुलांसह रॉबिन क्रिकेट खेळण्यास जाई. आपल्या मुलाला क्रिकेटची फार मोठी आवड असल्याचे लक्षात घेत सिंग कुटुंबीयांनी वेस्ट इंडिज संघातील एका नामांकित क्रिकेटपटूच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी घातले होते. मुळातच क्रिकेटची आवड जोपासणार्‍या रॉबिनला याचा फार आनंद झाला.
 
 
कुटुंबीयांनी आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण मिळवून दिल्याने रॉबिन आणखीन कसून सराव करू लागला. वेस्ट इंडिजमधील स्थानिक सामन्यांमध्ये रॉबिनने आपल्या कामगिरीने सर्वांवर छाप पाडण्यात यश मिळवले होते. वेस्ट इंडिज संघाच्या रणजी संघाकडून क्रिकेट खेळण्याची ऑफरही रॉबिनला मिळाली होती. मात्र, भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या रॉबिनने याकडे दुर्लक्ष केले. रणजीमध्ये सहभागी झाला नसला तरी रॉबिनने आपला सराव काही सोडला नव्हता. मात्र, १४ मार्च, १९८९ साली भारतीय संघ ज्यावेळी वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर गेला, त्यावेळी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी रॉबिनला मिळाली. भारताने आपल्या चमूमध्ये त्याला स्थान दिले. वेस्ट इंडिज संघाविरोधात खेळताना रॉबिनने उत्तम कामगिरीही केली. वेस्ट इंडिज संघाचा दौरा आटोपल्यानंतर रॉबिन सिंगला भारतात येऊन इतर दौर्‍यांमध्ये सहभागी व्हायचे होते. मात्र, का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते ते... भारताचे नागरिकत्व नसल्याने त्याला पुढील दौर्‍यात सामील करून घेता आले नाही. मूळचा भारतीय वंशाचा असला तरी त्यावेळी एकूण सात वर्षे रॉबिनला नागरिकत्व मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.
 
 
१९९६ साली त्याला नागरिकत्व मिळाले आणि त्यानंतर पुन्हा भारतीय संघात स्थान देण्यात आले. तारुण्यातील ऐन सात वर्षे रॉबिनला क्रिकेटपासून दूर राहावे लागले. नागरिकत्व मिळविण्याच्या प्रयत्नात प्रतीक्षा करावी लागली तरी रॉबिनने क्रिकेटचा सराव मात्र सुरुच ठेवला होता. सात वर्षांनी संधी मिळाल्यानंतरही रॉबिनने पुन्हा त्याच दमाने पुनरागमन केले. रॉबिनने भारताकडून एकूण १३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकूण २,३३६ धावा त्याच्या नावावर असून ६९ विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. २००१ साली रॉबिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही स्वीकारली. भारतीय संघातील एक चपळ खेळाडू म्हणून तो ओळखला जायचा. अचूक क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून चमकला. आजच् अनेक नावाजलेल्या संघामध्ये तो फिल्डींग कोचम्हणून प्रसिद्ध आहे. परदेशात वाढला असला तरी नवख्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. म्हणून क्रिकेटविश्वात तो परदेशातील स्वदेशी खेळाडू म्हणून ओळखला जातो.
 
 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@