सुशांतची आत्महत्या म्हणजे एक 'प्लान्ड् मर्डर' : कंगनाचा आरोप

    15-Jun-2020
Total Views |
Kangana Sushant _1 &




मुंबई : बॉलीवूडच्या घराणेशाहीने सुशांत सिंह राजपूतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले, असा खळबळजनक आरोप अभिनेत्री कंगना रनौत हीने केला आहे. एखाद्याला कमजोर करून टाकायचे, त्याच्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचे मानसिक खच्चीकरण करायचे, त्याला बॉलीवूडमधून बाहेर काढून टाकण्यासाठी प्रवृत्त करायचे, असे प्रयत्न बॉलीवूडच्या वर्तूळात कायम होताना दिसतात. 

मग ते पेरलेल्या बातम्यांद्वारे किंवा सहानुभूतीपूर्वक एसएमएसद्वारे एखाद्याचे मानसिक खच्चीकरण करायचे, हे बॉलीवूडला नवे नाही, नेमक्या याच जंजाळात सुशांत अडकला आणि त्याने आत्महत्या केली, किंबहूना त्याला प्रवृत्त करायला लावले, असा आरोप कंगनाने केला आहे. एका व्हीडिओच्या माध्यमातून तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 

'काय पो चे', एम एस धोनी, छिछोरे, केदारनाथ अशा अनेक चित्रपटांतून यशस्वी भूमीका साकारणाऱ्या सुशांतला प्रोत्साहन देणेही कधी बॉलीवुडकरांना जमले नाही. आपल्या चित्रपटांतल्या वठवलेल्या भूमीकांद्वारे प्रेक्षकांची मने तर त्याने जिंकली परंतू बॉलीवूडमध्ये नवख्या चेहऱ्याला मिळालेले यश अनेकांच्या डोळ्यात खुपत होते. त्याचा कुणी गॉडफादर नव्हता, कुणी आधारस्तंभ नव्हता स्वतःच्या जोरावर त्याने मिळवलेले यश अनेकांना खूपत होते. त्यामुळेच त्याच्यावर ही वेळ आली असल्याचा आरोप कंगनाने केला. 

गली बॉय सारखा चित्रपट तुम्हाला ऑस्करला पाठवावा वाटतो. सुशांतच्या एकाही चित्रपटाला का पुरस्कार द्यावासा वाटला नाही. तुम्हाला संजय दत्तचे अॅडीक्शन भावते मात्र, एखादा आजारावर उपचार करण्यासाठी गोळ्या घेत असेल तर त्याला तुम्ही अॅडीक्टेड म्हणता. त्यांची वाहवाह करणारे लाळघोटे पत्रकारही त्यापैकीच एक अशी सणसणीत चपराक तिने समस्त बॉलीवूडला लगावली आहे.