मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २७ दिवसांवर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020
Total Views |
Corona_1  H x W


रुग्णवाढीचा दर सरासरी २.६५ टक्के; महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना सुरू

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यात मुंबई महापालिकेला यश येत असून रुग्ण दुपटीचा वेग आता २७ दिवसांवर लांबला आहे. त्याचबरोबर रुग्णवाढीचा दर सरासरी २.६५ इतका कमी झाला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना सुरू आहेत. यामुळे कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पालिकेला यश येत आहे. कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट वाढत असून आता २६ वरून २७ दिवसांवर गेल्याची नोंद झाली आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण डबल होण्याचे प्रमाण २५ होते.


एफ- उत्तर विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल ५५ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचे प्रमाण १.३ टक्के असे सर्वात कमी झाले आहे. तर एम-पूर्व विभागात रुग्ण दुप्पट व्हायला ५३ दिवसाचा कालावधी लागला असून तेथील रुग्ण वाढीचा सरासरी दर एफ उत्तर प्रमाणे १.३ टक्के एवढा आहे.


रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४० दिवसांपेक्षा जास्त आणि रुग्णवाढ सरासरी २ टक्केपेक्षा कमी असलेले विभागही आहेत. यांमध्ये एच पूर्व विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा ४९ दिवसांवर, तर रुग्णवाढ सरासरी १.४ टक्के इतके आहे. जी -उत्तर विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४८ दिवसांवर तर रुग्णवाढीचा दर सरासरी १.५ टक्के, तसेच एल आणि ई विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४६ दिवसांवर व रुग्णवाढीचा दर सरासरी १.५ टक्के इतका आहे. याशिवाय बी आणि ए विभागातही रुग्णवाढीचा सरासरी दर २ टक्केपेक्षा कमी असून तो अनुक्रमे १.८ टक्के आणि १.९ टक्के एवढा असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


झोपडपट्ट्यांच्या दाटीवाटीच्या भागात रुग्ण घटत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा आहे ‘चेसिंग द व्हायरस’ या पालिकेच्या मोहिमेला आता बऱ्यापैकी यश येत आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. रुग्णांवर दर्जेदार उपचार केले जात आहेत. तसेच क्वारंटाइन सेंटरमध्ये लाफिंग थेरपी, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणार्‍या सहायक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिकेकडे सध्या ५० हजारांहून जास्त बेड उपलब्ध आहेत. १० हजार ४०० बेड पालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. तसेच प्रतिदिन ३०० आयसीयू बेड वाढवण्यात येणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत १६८ ठिकाणी डायलिसिची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना विरोधात लढाईत पालिकेची यंत्रणा दिवसरात्र काम करीत असून त्याला यश येते आहे, असेही पालिका प्रशासनाने म्हटले आहे.



@@AUTHORINFO_V1@@