कोरोनामुक्त सोसायटी चॅलेंज ! तुम्ही कधी स्वीकारताय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020
Total Views |
Corona Free Challenge _1&







गोराई, माझगावंकर जिंकले तुम्ही कधी जिंकणार !



मुंबई : लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मित्रमैत्रिणींना हटके चॅलेंज देऊन मित्रमैत्रिणींशी स्पर्धा सुरू केली. 'नथीचा नखरा', 'झुकी नजर', 'साडी चॅलेंज', विविध स्वादीष्ट खाद्यपदार्थ बनवण्याची स्पर्धा असो वा आणखी काही या सगळ्या परीक्षा तर आपण पास झालो पण ज्यासाठी आपण घरी थांबलो तिच गोष्ट दुर्लक्ष करून कोरोनासारखा आजार आपण आपल्या वाड्या, वस्त्या, गावपाड्यावर घेऊन आलो. अनेक जण आपल्या गावी गेले, परराज्यांतील मजूरही निघून गेले. मात्र, या मुंबईत जिथे कोरोनाचा विळखा सुटेनासा झाला त्याच मुंबईतील काही गाव आणि वस्त्यांनी आदर्श घालून दिला आहे. 


मुंबईच्या पूर्व उपनगरांतील गोराई हे गाव. साधारणतः १५ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. इतके दिवस उलटूनही कोरोना या वस्तीत किंचितही शिरकाव करू शकलेला नाही. गावातील साऱ्यांनी एकत्र येत कोरोना विरोधात मोहिम उघडली. विशेष म्हणजे त्यांनी दाखवलेले ऐक्य आज फळाला आहे. आपण जर एकत्र आलो तर कुठल्याही संकटावर मात करू शकतो हे गावकऱ्यांनी मनोमन ओळखले होते. काहीही झालं तरीही कोरोनाला या गावात शिरकाव करू द्यायचा नाही, असा ठाम निर्धार त्यांनी सुरू केला होता. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या लॉकडाऊनमध्ये गावातील काही स्वयंसेवक हे पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले होते. बाहेरील कुणाही व्यक्तीला विनाकारण गावात प्रवेश द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले. येणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र त्याच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेऊन तपासणी करून मगच त्याला प्रवेश दिला जाई. दरम्यानच्या काळात सर्वजण सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन आणि इतर आवश्यक गोष्टींचेही पालन करतात की नाही याकडेही त्यांनी लक्ष दिले होते



.
घराबाहेर पडणारा व्यक्ती केवळ आणि केवळ अत्यावश्यक गोष्टी आणण्यासाठीच बाहेर पडत असे.  या भागात होणाऱ्या मासेमारीमुळे तसेच इथे येणाऱ्या ग्राहकांपासून प्रादूर्भाव होण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मासेमारीही बंद ठेवण्यात आली होती. इथून मासे मागवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनीही योग्य ते सहकार्य केले. बाहेरून कुणी आलेच नाही त्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला नाही. गोराईकरांनी कोरोनाला हरवण्याचे आवाहन स्वीकारले. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले त्यामुळेच हे शक्य झाले. 




दुसरीकडे दक्षिण मुंबईतील तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही एक आदर्श जगासमोर ठेवला. शासनाने लावलेले नियम, उपाययोजनांची अमलबजावणी, स्वच्छते बाबत जागृतता, एकमेकांच्या सहकार्याने प्रत्येकाने काटेकोरपणे पाळले तर कोरोनाला सहज दूर ठेऊ शकतो, त्याचा प्रादुर्भाव रोखू शकतो हे मुंबई माझगाव येथील ताडवाडी बी.आय.टी.चाळ क्रमांक ८० मध्ये राहणार्‍या सुमारे ४०० रहिवाश्यांनी आणि विशेषता तेथील युवा वर्गाने उपक्रम राबऊन कोरोनाला आपल्या चाळी पासून घेऊन दूर ठेवले. 



चाळीतील रहिवाशी घेत असलेली खबरदारी निच्छितच अभिनंदनिय, अनुकरणीय आहे. चाळीच्या दरवाज्यावर पाणी, नियमित फवारणी, सॅनिटराईस, साबण याची व्यवस्था असे उपक्रम अन्य चाळीतील, सोसायटीतील रहिवाशांनी, विशेषता तेथील युवा वर्गाने राबविले तर कोरोनाची साखळी तुटायला असा कितीसा वेळ लागेल, असे मत इथले विश्वनाथ पंडित यांनी व्यक्त केले आहे. कोरोना आपल्या दारावर येऊन पोहोचला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वच्छता आणि सुरक्षितता बाळगली तर आपणही आपला विभाग कोरोनामुक्त बनवू शकतो कोरोनाच्या या संकटात आता सरकारी किंवा अन्य यंत्रणांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःची काळजी घेऊन खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. 






@@AUTHORINFO_V1@@