पोटाला द्या आराम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020
Total Views |

vividha_1  H x

आपण अन्न ग्रहण करताना, शिजवताना जे विचार करु ते रुजतात, शांतपणे हसतखेळत सेवन करावे आणि त्रासदायक विषय टाळावेत.
घरी केलेल्या स्वयंपाकात माया, प्रेम आणि आपलेपणा असतोच. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ती काळजी. इच्छा एकच असते त्रास नको व्हायला. बरोबर ना? कारण पोटच तर आहे सगळ्या गोष्टींचं मूळ. भीती वाटली की पोटात गोळा येतो, राग आला, त्रागा झाला की पोटात कसं तरी होतं. (अनइझी) त्यात चुकीचा आणि तेलकट मसालेदार आहार घेतला, तर मग काय एकट्या पित्ताने अनेक आजारांना आमंत्रण! रिपोर्ट सगळे नॉर्मल, पण त्रास, आजारपण संपत नाही. मग गॅसेस होणं, छातीत धडधडणं, धाप लागणं, कफाचं प्रमाण वाढणं, श्वास घ्यायला त्रास होणं वगैरे वगैरे.

सगळं केवळ एका पोटाची काळजी न घेण्यामुळे होतं. त्यामुळे आहार हा योग्य वेळी, सात्विक आणि योग्य प्रमाणात घ्यावा. ‘सात्विक’ याचा अर्थ पोटाला त्रास न देणारा. आज जेवायच्या वेळा या ठरलेल्या नाहीत. वेळ मिळेल तेव्हा आणि मिळेल ते खाण्यामुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते. उष्णता वाढते. याचा परिणाम नकळत चिडचिड होणे, अस्वस्थता, वर सांगितल्याप्रमाणे सुरू. रक्तामध्ये याचे प्रमाण वाढू लागते आणि शरीराला आवश्यक असणार्‍या प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन विषारी द्रव्ये, वायू वाढू लागतात. मग डोकेदुखी, सांधेदुखी यांसारखे आजार होऊ लागतात. इथे ‘लंघन’ हा अगदी सोपा उपाय आहे. फक्त रसाहार करावा, जेणेकरून रक्तातील पित्ताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. म्हणून पूर्वी उपवास सांगितले आहेत. म्हणजे ‘पोटाला आराम नाही, तर दुप्पट खाशी’ ही आपली वृत्ती. लिंबांचं गूळ घालून सरबत सगळ्यात उत्तम शुद्धी करणारं आणि ऊर्जा निर्माण करणारं. नंतर येते काकडी, लाल भोपळा, सुरण, रताळं ही सगळी मंडळी पोटाला शांत ठेवतात. रोज जेवणानंतर थोडा तरी गूळ खावा. त्याने पचनास मदत होते. उपवासाच्या दिवशी फोडणी तूप-जिर्‍याची देतात. जिरे पचनाला मदत करते आणि तूप स्नेहाचं काम करते.


आपण अन्न ग्रहण करताना, शिजवताना जे विचार करु ते रुजतात, शांतपणे हसतखेळत सेवन करावे आणि त्रासदायक विषय टाळावेत. हिंग हासुद्धा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. हा फोडणीत असणं आवश्यक आहे. ज्यांना पोटदुखी, गॅस यासारखे त्रास आहेत, त्यांनी हिंगाष्टक चूर्ण भाताच्या पहिल्या घासावर चिमुटभर घालून तूप घालून आधी खावा किंवा चिमुटभर हिंग घालून तूप घालून भात खावा. खूप छान फरक पडतो. लहान मुलांच्या पोटात दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून नाभीच्या भोवती लावावा. कफ दाटला असेल तर दुधात मिसळून पातळ लेप छाती, गळा, पाठीला लावावा. कफ मोकळा होतो. बरेचदा थंडी कानात दडे बसतात. त्यावेळी हिंग कापसात गुंडाळून कानात ठेवावा. थंडीचा विषय निघालाच आहे म्हणून सांगते खूप थंडी वाजत असेल तर उजव्या कानात कापूस घालून ठेवावा. त्याने थंडी वाजणं कमी होतं. खूप पित्त झाले असेल तर सुंठीचे दोन ग्रॅम चूर्ण १४ दिवस साखरेबरोबर घ्यावे. फायदा होतो. खूपच गॅसेस पास होत असतील आणि बाहेर जाणं कठीण असेल, तर एक छोटा उपाय करून बघा. आपला अंगठा सोडून चारही बोटांच्या मधल्या पेराच्या मध्यभागी पेरावर असलेल्या दोन रेषांच्या मध्यभागी एक काळ्या रंगाचा ठिपका देऊन पाहा. काही दिवस स्केचपेन किंवा मार्कर पेनाने न विसरता मला कळवा तुमचा अनुभव. एक एक घोट पाणी दर दहा मिनिटांनी प्या. लाळ पोटात जाऊ दे, रस्त्यावर नको. पोटातल्या गडबडीचे अजून एक सूचक लक्षण आहे चेहर्‍यावर पुरळ येणं, मुरुम येणं, काळा पडणं वगैरे. आपण हे पुढच्या भागात पाहू.

- सीता भिडे
@@AUTHORINFO_V1@@