‘निसर्ग’ग्रस्त कोकणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मदतीचा हात!

    14-Jun-2020
Total Views |
nisarg_1  H x W

आर्थिक-सामाजिक नुकसान झालेल्या कोकणवासियांना कार्यकर्त्यांनी दिला आधार!

कोकण : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ३ आणि ४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला ‘निसर्ग चक्रीवादळाने’ झोडपले होते. मुख्यतः कोकण किनारपट्टी आणि अलिबाग शहरात यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडे कोसळली असून घरांचे छप्पर उडाले आहे. अलिबाग,रायगडच नव्हे तर रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रचंड नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात फळबागांची संख्या मोठी आहे. पर्यटनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात आहे. चक्रीवादळाने आंबा,काजू,सुपारी बागायतदारांचे पुढच्या २० वर्षांचे नुकसान केले आहे.


रत्नागिरी, सिंधुदुर्गातही चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून काही भागांमधले सर्व विजेचे खांब पडले आहेत. प्रशासनालाही अशा गावांमध्ये पोहचणे आणि त्याठिकाणची प्राथमिक माहिती घेण्यात अजून यश आलेले नाही. वादळाच्या तडाख्याने कोकणातील मुख्य उपजीविकेचे साधन असणारी शेती, फळबागा यामध्ये नारळ, सुपारी, काजू व आंबा आदी व्यावसायिक त्याचप्रमाणे मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या नौका यांचे इंजिन खराब झाल्याने अतोनात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर वीज यंत्रणेचे झालेले नुकसान त्यामुळे छोटे व्यावसायिक संकटात आहेत तसेच पाणीपुरवठा खंडित आहे.


निसर्ग वादळ येऊन गेले मात्र झालेल्या नुकसानीतून कोकणवासीय अद्याप सावरलेले नाहीत. डोळ्यांदेखत झालेली भक्कम झाडांची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या कोकणवासीयांच्या डोळ्यात अजूनही त्या दिवसाचे भय दिसते. या नुकसानाबद्दल आणि एकंदरीत कोकणातील सध्य परिस्थिती विषद करताना स्थानिक रहिवासी असलेले डॉ. विनोद जोशी सांगतात, ‘निसर्ग वादळाने कोकणचा भूगोल बदलला. मात्र आता कोकणाची अर्थव्यवस्था बदलते की काय? इथले स्थानिक जनजीवन बदलते की काय अशी धास्ती इथल्या रहिवाशांना आहे. वादळाच्या तडाख्यामुळे कोकणातील सामाजिक परिस्थितीदेखील गंभीर बनत चालली आहे. साधारण ३५% बागायती आणि ६५% डोंगरी भूभाग असलेला हा कोकणचा परिसर. समुद्र सपाटीपासून जवळ असल्याने कोकणची अर्थव्यवस्था ही निसर्ग आणि पर्यटनावर अवलंबून आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे या सगळ्यावर परिणाम झाला असून, अर्थार्जनाचे सगळे मार्ग जवळजवळ ठप्प झाले आहेत.


कोकणात मोठ्या प्रमाणात लघु उद्योग आहेत. शेती काम करणारे मजूर, फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग, स्थानिक उद्योग अशा सगळ्याच वर्गांना वादळाचा तडाखा बसला आहे. पुढचे ५ वर्ष तरी या सगळ्या नुकसानाची भरपाई होणे शक्य नाही. साधारणपणे ५ टन गरे, ३०० टन आंब्याचे प्रोसेसिंग छोट्या गावांमधून चालते. अशा गावांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथल्या लोकांमध्ये पुढे हे सावरायचे कसे अशी चिंता निर्माण झाली असल्याचे, डॉ. विनोद जोशी सांगतात.


या नुकसानातून सावरण्यासाठी कोकणवासियांना आज मदतीची गरज आहे. यासाठी आवाहन करताना ते म्हणतात, झालेल्या नुक्सानातून सावरण्यासाठी वेगवेगळ्या संस्था पुढे येत आहेत. त्याचबरोबर अनेक एनजीओंकडून मदत मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्या मदत कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ते सगळे प्रकारची मदत करत आहेत. तरी आज छोट्या गावातील उद्योजक आणि आपला समाज यांना या संकटातून सावरण्यासाठी विश्वासात घेऊन मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.


या वादळामुळे साधारणपणे ४८ गावांचे नुकसान झाले आहे. यांपैकी १२ गावांमध्ये संपूर्ण बागायती उध्वस्त झाली आहे, तर इतर गावांमध्ये घरांचे नुकसान झाले आहे. ९८% घरांची छपरे उडून गेली आहेत. नुकसानातून बचावलेल असे एकही घर नाही. काही घरांमध्ये पाणी भरले आहे. सेवा सहयोग, सेवा इंटरनॅशनल, सेवा विभाग अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने चालणारे काम सुरु आहे. साधारण २८ पूर्णवेळ कार्यकर्ते, सर्वेक्षण करणारी १२ कार्यकर्त्यांची टीम, आणि दापोली, देवरुख, राजापूर, संगमेश्वर, खेड इथून येणाऱ्या जवळजवळ ७० कार्यकर्त्यांची कटर, कोयती, कुऱ्हाड अशी सगळी सामग्री घेऊन येणारी ही टीम स्थानिकांची मदत करत आहे.


१८००० कौलांचे वितरण, १५० पत्र्यांची व्यवस्था हे गेल्या १० दिवसांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. पावणे तीनशे कुटुंबांना शिधावाटप केले गेले आहे. येणाऱ्या दिवसांतही अशीच सुनियोजित कामे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात येणार आहेत. ४८ पैकी ३८ गावांचे सर्वेक्षण विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केले आहे. उर्वरित १० गावांचे सर्वेक्षण येत्या एक-दोन दिवसांत पार पडणार आहे. रोज या सर्वेक्षणाचे मुल्यांकन करून, कोणत्या गावात कोणत्या समस्या आहेत आहेत हे लक्षात घेऊन तातडीने त्यावरच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून कार्यकर्ते तिथे रवाना होतात. दुर्गम भागातील गावात मदत पोहचवली जात असून, ३० गावातील विहिरींची साफसफाई केली गेली आहे. तिथले रस्ते मोकळे करून पुढील मदत कार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.