कट कारस्थान आमची मजबुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2020   
Total Views |
mahavikas aaghadi_1 




आमचे सरकार घरी बसून कोमट पाणी पित आहे आणि याने राज्यात समांतर सरकार चालवले. काय करू काही सुचत नाही. कुठे सत्ता घेऊन निवांत बसायची इच्छा होती, तर या कमळवाल्यांमुळे त्यातही फडणवीसांमुळे आम्हाला काम करावे लागते. म्हणजे तसे दाखवावे लागते. पण आमचे लोकही असे ना? की जरा लोकांत फिरण्याचा विषय आला की आमचे दिग्गज आजारी पडतात. काम करण्यापूर्वीच आजारी पडले तर मग काम कुणी करायचे? मग मलाच या वयातही घराबाहेर पडावे लागते. आता काय करणार? सत्तेचा वेताळ मानगुटीवर बसवला आहे. त्याला जपले नाही तर तो छूऽऽ होईल. लहानपणी एक गोष्ट ऐकायचो, राक्षसाचा जीव पोपटात होता. तसा आमच्या सरकारचा जीव सत्तेत आहे. सत्ता गेली की आम्ही संपलो. तो सत्तेत असताना, त्याला हजार प्रयत्न करून त्रास दिला. पण त्याने ताकास तूर लावू दिले नाही. मग आमचे खास पाठीत वार करण्याचे तंत्र वापरून काही शिष्य तयार केले. त्यांच्या साहाय्याने कशीबशी राज्यात सत्ता मिळवली, तर या कोरोनाने पार दमछाक केली ना राव. ‘सोचा था क्या... क्या हो गया...’ त्यात ते कमळवाले गप्प बसत नाहीत. सत्ता नाही, काही नाही, तरी महाराष्ट्रासाठी काम करण्याची त्यांना काही गरज आहे का? गपगुमान घरी बसावं, तर यांचे कोरोनापीडितांसाठी काम सुरू. कुठे हॉस्पिटलच्या व्यवस्थेला पाहतात, कुठे गरिबांना अन्नधान्य आणि मदत करतात. आम्ही सत्तेत आल्यावर काय करणार? हे काय लपलेले होते. छगनभाऊ, ‘आदर्श’ अशोक यांच्यासारखी मंडळी आमच्यासोबत आहेत, हे सार्या देशाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही काही लपवले-छपवले नाही. पारदर्शकच आहे सगळे. असे असूनही यांनी गप्प बसावे ना? तर कोरोनाच्या काळातही हे आमची कारस्थानं बाहेर काढतात. आमच्या सर्वच गरीब मंत्र्यांना-आमदारांना पोटापाण्यासाठी काही ना काही उचापती कराव्या लागतात. आता तो प्रत्येकाचा स्वभावधर्म असतो ना! आम्ही कारस्थान करणार नाही तर कोण करणार? महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संत सांगून गेलेत की, विंचवाचा गुणधर्म असतो चावण्याचा. संतांची शिकवण आम्ही सर्वार्थाने जगतो. त्यामुळे आम्ही कट कारस्थानं करण्याचा स्वभावधर्म सोडत नाही. नाही नाही ही आमची मजबुरी आहे.

सगळा महाराष्ट्र आपला नाही


कोरोनाची भीती, त्यात चक्रीवादळाने झालेले भयंकर नुकसान, यामुळे कोकण सध्या भरडले गेले आहे. त्यातही राज्य सरकार केवळ कोमट पाण्यावर निभवायला सांगत आहे. अशा परिस्थितीमध्ये कितीही ज्ञानी असेल तर कोण कसे ज्ञान वाटेल? पण शरदचंद्र पवारांना वाटले कोकणात दौरा केल्याने ज्ञान वाढते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावर पवार यांचे म्हणणे होते की, ‘ते कोकणात येणार असतील तर चांगलंच आहे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल.’ शरद पवारांच्या मते, नागपूरला समुद्र नाही, हा दौरा केल्यामुळे देवेंद्र यांच्या कोकण, समुद्र आणि त्यासंबंधीच्या ज्ञानात भर पडेल. सगळ्यांनाच माहिती आहे की, कोकणामध्ये ज्ञान वाटपाचा कार्यक्रम सुरू नव्हता की त्यातून ज्ञान घेण्यासाठी तिथे कुणी जाईल. पण शरदचंद्र पवारांना असे वाटले. अर्थात, काका स्वानुभवानुसार सांगत आहेत. नव्हे ते तसे म्हटलेही की, मी बारामतीचा असून मला कोकणचे ज्ञान मिळेल. काय म्हणावे? ‘राजकारण करू नका करू नका,’ असे म्हणत अष्टोप्रहर राजकारणात आकंठ बुडालेले काका. सत्तेत नसतानाही कमळवाले आणि त्यातही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर का फिरत आहेत? यामुळे ते कासावीस झाले आहेत. अशा प्रकारे कासावीस झाल्यामुळे ते हेसुद्धा विसरले की देवेंद्र फडणवीस या राज्याचे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्याआधीही आणि आताही महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नागपूर, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भौगोलिक क्षेत्रांचा त्यांचा अभ्यास आणि संपर्क दांडगाच आहे. त्यामुळे कोकण काही देवेंद्र यांना नवीन नाही आणि नव्हते. तसेच भाजप आणि रा. स्व. संघाशी संबंधित असल्याने अख्खा भारत आपलाच आहे, सगळे भारतीय आपले सख्खे बांधव आहेत, ही भावना भाजपच्या नेतृत्वाकडे असणारच. हे कोकण, हे नागपूर, ही बारामती अशी संकुचित वर्गवारी केवळ काकाच करू शकतात. हो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे केवळ बारामती अशी वृत्ती कोणी बाळगली? अर्थात, एकट्या बारामतीचा विकास झाला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पण काका, कधी बारामती-नागपूरच्या बाहेर पडणार आहेत का? सगळा महाराष्ट्र आपलाच आहे, ही भावना कधी त्यांच्यात निर्माण होणार का?



@@AUTHORINFO_V1@@