वन विभागाच्या शिळफाट्यामधील नव्या रेस्क्यू सेंटरमधून 'बहिरी ससाणा' गायब ? स्वयंसेवक निलंबित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2020
Total Views |

bird _1  H x W: 

 
  
अवैध वन्यजीव बाळगण्याच्या प्रकरणांमध्ये स्वयंसेवक हा संशयित आरोपी

 
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वन विभागाने ठाण्यातील शिळफाट्याजवळ नव्याने उभारलेल्या 'वन्यजीव बचाव केंद्रा'तून (रेस्क्यू ट्रान्झिट सेंटर) पक्षी गायब झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील एका वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या केंद्रात दाखल केलेला दुर्मीळ बहिरी ससाणा (शाहिन फाल्कन) पक्षी या केंद्रातून गायब झाल्याची शक्यता आहे. प्रसंगी वन विभागाने केंद्रामध्ये प्राण्यांच्या देखभालीसाठी नेमलेल्या स्वयंसेवकाला काढून टाकण्यात आले आहे. या घटनेमुळे केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे.

 
 
 

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असलेेले शिळडायघर येथील वन्यजीव रेस्क्यू सेंटर आता कार्यान्वित करण्यात आले आहे. ठाणे आणि आसपासच्या परिसरात जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पशू-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी ठाण्यात वन विभागाचे उपचार केंद्र नव्हते. त्यामुळे वन्यजीवप्रेमींसमोर मोठी अडचण निर्माण होत होती. त्यादृष्टीने शिळडायघर पसिरातील वन जमिनीवर वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता 'रेस्क्यू ट्रान्झिट सेंटर' उभारण्यात आले. एक हेक्टर परिसरावर ९१ लाखांचा निधी खर्चून हे केंद्र बांधण्यात आले. गेल्या महिन्यापासून या केंद्रात काही पशू-पक्ष्यांना ठेवण्यात येत आहे. मात्र, गेल्या आठवड्यात या केंद्रातून 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित असलेला बहिरी ससाणा पक्षी गायब झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात 'वाईल्ड वर्ल्ड वेलफेअर असोसिएशन'च्या मिता मालवणकर यांनी ठाण्याच्या उपवनसंरक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

bird _1  H x W: 
 
 

वन विभागाच्या सांगण्यावरुन मालवणकर यांनी २८ मे रोजी ओशिवारा येथील संजिव चोप्रा यांच्याकडून अशक्त अवस्थेतील बहिरी ससाण्याला ताब्यात घेतले होते. वन्यजीवप्रेमी असणाऱ्या चोप्रा यांना हा ससाणा आरे दुग्ध वसाहतीत सापडला होता. २९ मे रोजी मालवणकर यांनी या पक्ष्याला पुढील देखभालीसाठी शिळफाटा येथील रेस्क्यू सेंटर येथे दाखल केले. त्यानंतर ९ जून रोजी ससाण्याची पाहणी करण्यासाठी केंद्राला भेट दिली असता त्याठिकाणी हा पक्षी आढळला नसल्याची माहिती, मालवणकर यांनी 'महा MTB'ला (मुंबई तरुण भारत) दिली. यासंदर्भात वन विभागाने त्याठिकाणी नेमलेल्या स्वयंसेवकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ठाण्याच्या उपवनसंरक्षकांकडे मी लेखी तक्रार केल्याचे, त्यांनी सांगितले. वन विभागाकडून नेमलेला हा स्वयंसेवक मुंबईतील एका वन्यजीव बचाव संस्थेशी संबंधित असून अवैधरित्या वन्यजीव बाळगण्याच्या प्रकरणांमध्ये तो यापूर्वी संशयित असल्याची माहिती वन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. या स्वयंसेवकाच्या घरावर बेकायदा पद्धतीने वन्यजीव बाळगण्याप्रकरणी 'महसूल गु्प्तचर संचालनालया'ची (डीआरआय) धाड पडली होती. त्याच्या घरातून किंग क्रोबाही सापडला होता. शिवाय वन विभागाने हाताळलेल्या अवैध्यरित्या अजगर बाळगण्याच्या एका प्रकरणामध्येही तो संशयित आरोपी होता.

 
 
 

परदेशी पशू-पक्ष्यांच्या व्यापारतही या स्वयंसेवकाचा हात असल्याची माहिती वन्यजीव बचाव संस्थेतील एका कार्यकर्त्याने आम्हाला दिली. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असणाऱ्या माणसाला केंद्रामध्ये स्वयंसेवक म्हणून नेमण्याच्या वन विभागाच्या भूमिकेवरही आता शंका व्यक्त करण्यात येत आहे. वन्यजीवांची निपज करणाऱ्यांमध्ये बहिरी ससाण्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे या कारणासाठी हा पक्षी केंद्रातून गायब करण्यात आल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिल्याने बहिरी ससाणा उडून गेल्याचे त्या स्वयंसेवकाने सांगितले आहे. मात्र, ससाण्याबरोबर पिंजऱ्यात असणारे इतर पक्षी कसे उडून गेले नाही ? असा प्रश्न मालवणकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी अहवाल मागवला असून हा पक्षी उडूनही गेल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. 

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@