तूच तुझा तारणहार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2020
Total Views |

mumbai_1  H x W


महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि या महामारीत जनतेने काय करू नये आणि काय करावे, याची नकळतपणे शिकवण दिली. मात्र, जनता एवढी निर्ढावलेली निघाली की, जे करू नये, तेच नेमके करताना दिसते आणि परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो. शिंकणे, थुंकणे यातून या कोरोनाचा फैलाव होतो. त्यामुळे एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून चालणे आणि तोंडावर मास्क लावणे हाच यावर एकमेव उपचार आहे. परंतु, सुमारे अडीच महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’नंतर राज्य शासनाकडून थोडी शिथीलता देण्यात आल्यानंतर कोरोना जणू पळालाच, अशा आविर्भावात लोक सैराट सुटले. शेवटी ‘...तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेलअसा इशारा मुख्यमंत्र्यांना द्यावा लागला. जर पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याची वेळ आली, तर तो पहिल्यापेक्षा अधिक कडक असेल याची जाणीव जनतेने ठेवायला हवी. ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असे समाजसुधारकांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘तूच तुझा तारणहार’ हे तत्त्व प्रत्येकाने अंगी बाणवायला हवे, तरच कोरोनाला आपण हरवू शकू; अन्यथा अनेक ‘कोरोना योद्धे’ धारातीर्थी पडतील, पण कोरोना हद्दपार होणार नाही. तो अधिक आक्रमक होईल आणि आपले जीवनच शून्यवत होईल. आपल्याला आता कोरोनाबरोबर जगायची सवय लावून घ्यायला हवी’ असे म्हणत कोरोना इतक्यात जाणार नाही, हे शासनकर्त्यांनी त्यांच्या उक्तीतूनच कबूल केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता सावध भूमिका घ्यायला हवी. ‘लॉकडाऊन’ शिथील करण्याच्या वेळी मुंबईची रुग्णसंख्या दिवसाला १००० ते १२००च्या आसपास होती. पण ‘लॉकडाऊन’ शिथील केल्यानंतरच्या चारपाच दिवसांनंतर रुग्णसंख्या १५००च्या पुढे गेली आहे. त्यापैकी मृत किती याचा थांगपत्ताच नाही. मनुष्यबळ कमी म्हणा वा मृतांची संख्या कमी दाखवायची म्हणून असेल, रुग्णालयातूनच रुग्ण गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी आहेत. मात्र, अजूनपर्यंत गायब रुग्ण न सापडता त्यांचे मृतदेह रुग्णालयाच्या बाहेर बेवारस अवस्थेत सापडले आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात संघर्ष केलेल्या माणसाच्या हालअपेष्टा त्याच्या मृत्यूनंतरही संपलेल्या नाहीत. म्हणून स्वयंशिस्त पाळा आणि आपणच आपले तारणहार व्हा!



‘निसर्ग’ची देणगी
 


संकटांमुळे जीवन उद्ध्वस्त होत असले, तरी संकटे माणसाला एकत्र आणतात आणि संकटेच त्या भागाची महती पटवून देत असतात. ‘निसर्ग’ चक्रीवादळाने तांडव केल्याने कोकणाचे फार मोठे नुकसान झाले. किनारट्टीचा भागपूर्ण उद्ध्वस्त झाला. त्यानंतर कोकणाला सावरायला राजकारण्यांचे दौरे सुरू झाले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दुसर्‍याच दिवशी कोकण दौरा केला आणि जास्त नुकसान झालेल्या कोकणवासीयांना दिलासा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे कर्तेकरविते शरद पवार यांनी दौरा केला आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दौरा केला. एवढ्या मोठ्या संख्येने राजकारण्यांना दखल घ्यायला लावणारे ‘निसर्ग’ हे पहिलेच चक्रीवादळ असावे. यापूर्वी ‘फियान’ नावाचे ‘महाभयाण’ चक्रावादळ येऊन गेले. त्यावेळी नुकसानग्रस्तांची केवळ अडीच हजार रुपयांवर बोळवण करण्यात आली होती. पण, यावेळी शासनाने २०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज कोकणात कधी पोहोचेल सांगता येत नाही, तोपर्यंत भाजपकडून कोकणसाठी अत्यावश्यक साहित्याचे १४ ट्रक रवानाही झाले. शिवाय सरकारकडून निकषांत बदल करून वाढीव मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शासनाची एवढी कृपा कोकणावर कधीच झाली नव्हती. कोकणी माणूस दिसायला राकट, परंतु अंतःकरणाने मायाळू असल्याचे सगळ्यांकडूनच गोडवे गायले जातात. परंतु, कोकणी माणूस प्रामाणिक असल्याचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी कोकणदौर्‍यात दिला. कारण, कोकणी माणूस कधी कर्ज घेत नाही. घेतलेले कर्ज तो प्रामाणिकपणे फेडतो. त्यामुळे त्याला कर्जमाफीचा कधीच फायदा होत नाही. यास्तव कोकणी माणसाकडे असलेले चालू कर्ज माफ केले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. साधारण परिस्थितीच्या कोकणी माणसांकडे असलेले कर्ज माफ झाले तर ती‘निसर्ग’ची देणगी असेल. कारण, श्रद्धाळू कोकणी माणूस ‘देश हा देव असे माझा’ असे मानतो. म्हणून कर्ज बुडवून तो देवाची फसवणूक करत नाही. पण, जेथे कर्जापायी आत्महत्या होतात, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींकडून कोकणी माणसाला प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र मिळणे ही ‘निसर्ग’ची फार मोठी देणगी आहे.

 

- अरविंद सुर्वे

 
@@AUTHORINFO_V1@@