पाऊस आला तरी डिझास्टर कंट्रोलरूमची जुळवाजुळवच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2020
Total Views |
Ashish shelar_1 &nbs

आमदार आशिष शेलार यांची कंट्रोल रूमला अचानक भेट

मुंबई : मुंबईत पाऊस दाखल झाला, ११, १३ आणि १४ जूनला मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा, अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असला तरी मुंबई महापालिकेचे वॉर्डमध्ये असणारे "कंट्रोल रूम", एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए यांचे कंट्रोल रूम यांच्यामध्ये अद्याप जुळवाजुळवच चालली आहे. भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी आज मुंबईतील डिझास्टर कंट्रोलरूमला अचानक भेट देत पाहणी केली. त्यावेळी या महत्त्वाच्या विभागाचा ढिसाळपणा समोर आला.


मुंबई महापालिका एकीकडे कोविड रुग्णांच्या सेवेत असली तरी या वर्षी मान्सूनपूर्व तयारीच्या कामात दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. आशिष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईची पाहणी केल्यानंतर यावर्षी केवळ ४० टक्के नालेसफाई झाल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळापूर्वी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाला भेट देऊन नियंत्रण कक्ष बेसावध असल्याचेही त्यांनी उघड केले होते. आता पाऊस मुंबईत कधीही दाखल होईल. त्यापूर्वीच नियंत्रण कक्ष सज्ज आहे का, याची त्यांनी पाहणी केली. पण तेथे अद्याप जुळवाजुळव चालल्याचे दिसले.

शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या नियंत्रण कक्षासह, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पाहणी केली. मुंबई महापालिकेचे नियंत्रण कक्ष सध्या कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत, त्यामुळे मान्सूनच्या कामाबाबत अद्याप म्हणावी तशी तयारी दिसत नाही. याबाबत पालिका यंत्रणेचे दरवर्षीपेक्षा दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे.


ज्या एमएमआरडीएचे मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत, त्या एमएमआरडीएचा डिजास्टर मॅनेजमेंट रूम केवळ 200 फुटांचा असून एक संगणक, एक दूरध्वनी, या पलीकडे तिथे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. या कक्षात अधिकारी उपलब्ध नाही, असे चित्र सध्या पाहायला मिळते.


एमएसआरडीसीचा नियंत्रण कक्षात यंत्रणा तुलनात्मक बरी आहे. मात्र मुंबईतील रस्ते आणि उड्डाणपूल याबाबतची जबाबदारी असणाऱ्या एमएसआरडीएकडे पावसाळ्यामुळे खड्डे पडल्यास संबंधित अभियंत्याला कळल्यानंतर कोणत्या ठिकाणाहून कोल्डमिक्स अथवा हॉटमिक्स उपलब्ध केले जाणार त्यासाठीची वाहतूक यंत्रणा कशी असणार, याबाबत कोणतीही सुसज्जता एमएसआरडीसीच्या नियंत्रण कक्षात दिसून येत नाही.


दरवर्षी मुंबईला पाऊस, पुराचा फटका, रस्त्यावर पडणारे खड्डे याचा आजवरचा अनुभव पाहता तिन्ही यंत्रणांचे आपत्कालीन कक्ष अद्याप परिपूर्ण सज्ज नाहीत, असे दिसून आल्याचे आमदार आशिष शेलार यांचे म्हणणे आहे.
@@AUTHORINFO_V1@@