बालश्रम कामगार पद्धतीचा निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2020   
Total Views |

child labour_1  

‘द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ने २००२ साली, १२ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालश्रम कामगार प्रथे’विरूद्धचा दिवस निश्चित केला. कारण, अर्थातच होते बालकामगारांची होणारी पिळवणूक बंद व्हावी, नव्हे कोणत्याही बालकाला स्वत:साठी किंवा इतर कुणासाठीही शिक्षण सोडून श्रम करायला लागू नयेत. बालकांचे शोषण होऊ नये.

हातावर रेषा माझ्याही होत्या...
पण नकळत्या वयातच,
हातात पेन-पेन्सिल नाही
तर छिन्नी हतोडा आला...
कष्टाला ना नाही
पण कष्टाचेही वय असते
इथे वयाआधीच माझे
वय संपून गेले
बालकामगारांची ही व्यथा. आज १२ जून. ‘आंतरराष्ट्रीय बालश्रम कामगार निषेध दिन.’ जगभरात आज बाल कामगार प्रथेविरूद्ध निषेध व्यक्त केला जाईल. हा दिवसही जगाला अस्तित्वात आणावा लागला, हे माणुसकीला लांच्छनास्पदच आहे. ‘द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ने २००२ साली, १२ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालश्रम कामगार प्रथे’विरूद्धचा दिवस निश्चित केला. कारण, अर्थातच होते बालकामगारांची होणारी पिळवणूक बंद व्हावी, नव्हे कोणत्याही बालकाला स्वत:साठी किंवा इतर कुणासाठीही शिक्षण सोडून श्रम करायला लागू नयेत. बालकांचे शोषण होऊ नये. जगभरात बालकामगारांची संख्या सातत्याने वाढत होती. ही संख्या वाढण्याचे कारण होते अर्थातच गरिबी. त्यातून निर्माण होणारे प्रश्न.


जागतिक सर्वेक्षणानुसार बालकामगारांच्या स्थितीची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार आज जगभरात साधारण ५ ते १७ वर्षांपर्यंतची १६ कोटी बालके मजुरी करत आहेत. या बालकांचे बालपण कष्टाच्या चक्रात पिळले गेले आहे. त्यापैकी ५८ टक्के मुलं आहेत आणि ४८ टक्के मुली आहेत. त्यामध्येही वयानुसार या बालकामगारांची वर्गवारी केली तर ५ ते ११ वयाची ४८ टक्के मुले बालकामगार आहेत, तर १२ ते १४ वर्षांची २८ टक्के बालकं काम करतात आणि १५ ते १७ वर्षांपर्यंतची २४ टक्के मुले आहेत. यामध्येही कृषी क्षेत्रामध्ये ७०.९ टक्के बालकामगार काम करतात, सेवा क्षेत्रामध्ये १७.२ टक्के मुलं काम करतात, उद्योग क्षेत्रामध्ये ११.९ मुलं काम करत आहेत. या वर्गवारीमध्येही ६९.१ टक्के मुलं घरातल्यांसाठी काम करतात. घरची गरिबी असते. घरात पैसे दिले तरच अन्न मिळेल किंवा निदान आसरा तरी मिळेल, अशी परिस्थिती असते. अन्न-निवार्‍यासाठी ही मुलं काम करतात. २७.२ टक्के मुलांच्या बाबतीत असेही आढळले की, यांनी काम केले नाही तरी अन्न किंवा निवारा मिळू शकतो. पण, या मुलांच्या कष्टाचा पैसा या मुलांशी संबंधित लोकांना हवा असतो. त्यासाठी ही मुलं काम करतात, तर ३.७ टक्के मुलं स्वत:साठी काम करतात.


जागतिक सर्वेक्षणानुसारची बालकामगारांची ही वर्गवारी बरेच काही सांगून जाते. या वर्गवारीनुसार एक सत्य समोर आले की, ५ ते १७ वर्षापैकी ५ ते ११ वयोगटातील मुलं लहान आहेत आणि बालकामगार म्हणून त्यांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर १५ ते १७ वयोगटातील बालकं मोठी आहेत. मात्र, बालकामगार म्हणून त्यांची टक्केवारी कमी आहे. याचाच अर्थ लहान वयोगटातील बालकांचे कामगार म्हणून मोठ्या प्रमाणात शोषण होते. त्यांना काही समजत नसते, ना मानसिक ताकद असते ना शारीरिक ताकद. त्यामुळे या बालकांचे शोषण करणे, त्यांना फसवून त्यांच्या कष्टावर एैश करणे समाजातील काही विकृतांना सोपे जाते. पण हे इतकेच नसते, तर मानवतेला काळीमा फासत बालकांना वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांची तस्करी यामध्येही अत्यंत भयानक पद्धतीने वापरले जाते. दहशतवादी, अतिरेकीही बालकांना आपले हस्तक बनवू पाहत आहेत. त्यांनी बालकांनाच दहशतवादी प्रशिक्षण कारवायांमध्ये वापरायला सुरुवात केली. हे खूप भयंकर आहे. वैचारिक बालमजुरी. दुसरीकडे बालकांचा टीव्ही, सिनेमा आणि इतर रिअ‍ॅलिटी शोमध्येही श्रमिक म्हणूनच वापर केला जातो. पण, त्यांच्या श्रमांना ‘श्रम’ न म्हणता प्रसिद्धीची चमक असते. आज जगभरात आफ्रिका खंडातील देश हे बालमजुरीच्या क्षेत्रात कुख्यात आहेत. ऑस्कर वाईल्ड या लेखकाने म्हटले आहे की, “मुलांसाठी काही चांगले करायचे असेल तर त्यांना आनंद द्या.” ऑस्कर यांनी जे सांगितले, त्याही पुढे जाऊन आपण म्हणू शकतो की, तो आनंद बालसुलभ निर्मळ निर्व्याज आणि त्यांच्या भवितव्यातील प्रगतीसाठी पूरक असावा. आज ‘आंतरराष्ट्रीय बालश्रम कामगार निषेध’ दिनी एक आशा बाळगू की, कुणाही बालकाचे बालपण अकालीच संपणार नाही, त्या बालकाला त्याचे सगळे हक्क मिळतील. देशाचा नागरिक म्हणून त्याला व्यवस्थित संस्कार आणि माणूसपणाचे जगणे मिळो!
@@AUTHORINFO_V1@@