कल्पक उद्योजक

    11-Jun-2020
Total Views |

sandeep_1  H x


कोरोनानंतरचं औद्योगिक जग वेगळं असणार आहे. याची जाणीव झाल्यानेच दरपेल यांनी डिजिटल मीडियाकडे आपलं लक्ष वळवलेलं आहे. मार्केटिंग क्षेत्रातील सर्व सेवा एकाच छत्राखाली देणारी संस्था म्हणून ‘माईंड डिझाईन’ची आज स्वतंत्र ओळख आहे.



“अरे वाह, निमंत्रण पत्रिकेचं डिझाईन फार उत्तम झालंय. ज्याने तयार केलंय त्याला सांगा डिझाईन आवडल्याचं.” अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. जोशी सर पुलंना दादर येथे भरणार्‍या ७२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रण द्यायला गेले होते. मुंबईला परतल्यानंतर त्यांनी त्या तरुणाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली अन् पुलंनी केलेले कौतुकदेखील सांगितले. त्या तरुणाला साक्षात साहित्याचंच नोबेल मिळाल्याचा आनंद झाला होता. १९९९ साली दादरला भरलेल्या त्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिका आणि इतर साहित्याचं सगळं डिझाईन त्याने तयार केलं होतं. साक्षात भाईंनी कौतुक केल्यावर माणसाला अजून काय पाहिजे. हेच संचित आयुष्यभर जपत त्या तरुणाने जाहिरातक्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. हा तरुण म्हणजे माईंडडिझाईन मार्केटिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्स प्रा. लि.चे संचालक संदीप दरपेल होत.




संदीप मूळचा गिरगावकर. त्याचं संपूर्ण बालपण गिरगावात गेलं. शंकरराव दरपेल आणि प्रमिला दरपेल यांचा संदीप चिरंजीव. शंकररावांचा हॉटेल आणि गारमेंटचा व्यवसाय होता. त्यामुळे गिरगावात ‘दरपेल’ हे नाव चांगलंच परिचयाचं. संदीपचं सारं शालेय शिक्षण गिरगावच्याच आर्यन हायस्कूलमध्ये झालं. दहावीनंतर चौपाटीच्या भवन्समध्ये विज्ञान शाखेत त्याचा प्रवेश झाला. मात्र, संदीपचं मन त्या विज्ञानाच्या विषयात रमलं नाही. त्याचा कल कलेकडे होता. चित्रकलेत त्याला चांगलीच गती होती. शेवटी जे.जे, स्कूल ऑफ आर्ट या कलेच्या पंढरीमध्ये त्याने प्रिन्ट टेक्नॉलॉजी आणि फोटोग्राफी विषयात डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. तीन वर्षांची पदविका तिथे त्याने प्राप्त केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने प्रभादेवीच्या एका जाहिरात संस्थेत इंटर्नशिप केली. संदीपचे बहुतांश सर्व मित्र हे मारवाडी आणि बोहरा मुस्लीम या उद्योजकीय समाजातील. त्यामुळे उद्योजकतेसोबतसुद्धा त्याची मैत्री आपसूकच जुळलेली. बाबा उद्योजक प्रवृत्तीचे त्यामुळेच संदीपचा ओढासुद्धा उद्योगाकडे वळला तर नवल ते काय! तसा आठवीमध्ये असताना तो ओळखीच्या फोटोग्राफरकडे जायचा. त्यांच्याकडे फोटोग्राफी शिकला. ते त्याला कॅमेरा हाताळण्यास द्यायचे. संदीपला मग लग्नाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. ही उद्योजकता त्याच्या अंगी अशाप्रकारे रुजली होती. म्हणूनच की काय पठ्ठ्याने कुठेच नोकरी न करता, १९९०साली स्वत:चीच जाहिरात कंपनी सुरु केली.




बँकेकडून कर्ज घेऊन शिवडी येथे गाळाच विकत घेतला. त्यावेळी संगणयुग हवं तसं रुळलेलं नव्हतं. अ‍ॅनालॉग प्रणालीवरच सगळी कामे होत. मात्र काहीच दिवसात डिजिटल युग आलं आणि संदीप दरपेल यांनी संगणक तंत्रज्ञानसुद्धा आत्मसात केलं. त्यावेळेस हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जाहिरात संस्थांकडेच संगणक होते. संदीप दरपेल यांची संस्था त्यापैकी एक होती. त्यांच्या संस्थेने ९०च्या दशकात डिझाईनमध्ये डिजिटायझेशन आणलं. वेगवेगळ्या कॉर्पोरेट्ससाठी जाहिरातीसोबत मार्केटिंगचं काम सुद्धा ते करु लागले. कलाप्रांतातील अनेक दिग्गजांशी त्यांचा स्नेह होता. १९९९चं ७२वं साहित्य संमेलन दादरला भरणार होतं. दादर सार्वजनिक वाचनालयाकडे त्याचं आयोजकत्व होतं. संदीप दरपेल यांनी तयार केलेलं डिझाईन त्यांना पसंत पडलं. आतापर्यंत झालेल्या संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचे डिजिटल बुक ही संकल्पना सगळ्यांना आवडली. अनेक दिग्गज स्पर्धेत असतानासुद्धा निव्वळ कल्पकतेमुळे त्या साहित्य संमेलनाच्या डिझाईनचे काम दरपेल यांच्या ‘माईंडडिझाईन’ या संस्थेला मिळाले. त्यांनी डिजिटल बुकसोबत निमंत्रण पत्रिका, मुद्रित साहित्याचं संपूर्ण डिझाईन तयार केलं. आध्यात्मिक गुरु उदयराज गडणीस यांच्यामुळे त्यांना ‘टाईम्स’ समूहाच्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्याचे काम मिळाले. यामुळे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ या क्षेत्रातसुद्धा त्यांनी पदार्पण केले.


‘माईंड डिझाईन’ या संस्थेने ३०वर्षे पूर्ण केली आहेत. वेबडिझाईन, प्रिंट डिझाईन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी या सेवा ही संस्था देते. औद्योगिक प्रदर्शनामधील स्टॉल्सचे डिझाईन, प्रॉडक्ट फोटोग्राफी ही त्यांची खासियत. इव्हेंट्सचं नियोजन आणि व्यवस्थापनसुद्धा ते करतात. शेकडो कॉर्पोरेट संस्थांसह अनेक औद्योगिक संस्थांना त्यांनी आतापर्यंत सेवा दिलेली आहे. एका औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. निव्वळ स्टॉल उभारण्यापेक्षा काहीतरी सर्जनशीलता हवी म्हणून त्यांनी रांगोळी काढण्यात वाकबगार असणार्‍या मित्राला बोलावले. मित्राने संदीप यांच्या कल्पनेनुसार तिथे एक रांगोळी काढली होती. विजेची बचत कशी करावी, या अनुषंगाने ती रांगोळी होती. अनेक उद्योजक खास ती रांगोळी पाहण्यास त्या स्टॉलवर येत. यातूनच सौरऊर्जा व्यवसायाची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. ‘स्मार्ट सोलर इंडिया’ नावाने ते सौरऊर्जा क्षेत्रात आपली घोडदौड वेगाने करत आहेत. यासर्व प्रवासात त्यांना त्यांची पत्नी संगीता यांनी मोलाची साथ दिली. त्याकाळी नोकरी करणारा मुलगा हा निकष नाकारुन उद्योजक असलेल्या मुलाची पती म्हणून निवड केली. या दाम्पत्यांना एक कन्या आणि पुत्र अशी दोन अपत्ये आहेत. कोरोनानंतरचं औद्योगिक जग वेगळं असणार आहे. याची जाणीव झाल्यानेच दरपेल यांनी डिजिटल मीडियाकडे आपलं लक्ष वळवलेलं आहे. मार्केटिंग क्षेत्रातील सर्व सेवा एकाच छत्राखाली देणारी संस्था म्हणून ‘माईंड डिझाईन’ची आज स्वतंत्र ओळख आहे. कल्पकता आणि नाविन्यता जर आपल्या उद्योगात असेल, तर तो उद्योजक उत्तुंग भरारी घेऊ शकतो. संदीप दरपेल यांनी ते सिद्ध केलेलं आहे.