मुंबई : नायर रुग्णालयापाठोपाठ लवकरच सायन रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे. प्लाझ्मा थेरपीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्या रुग्णांची पुन्हा कोरोना चाचणी करणे गरजेचे नाही, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नियमावलीनुसार नायर रुग्णालयात दोन रुग्णांवर प्लाझा थेरपीची चाचणी यशस्वी झाली आहे. यानंतर अन्य रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यात येत असून या चाचणीला रुग्णांचाही प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठोस अशी लस उपलब्ध झालेली नाही. परंतु कोरोनावर मात करण्यासाठी पालिका आरोग्य विभागाकडून विविध उपचार पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग प्लाझ्मा थेरपी आहे. नायर रुग्णालयात सुरुवातीला दोन रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीला दोन्ही रुग्णांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यांनी कोरोनावर मात केली. या यशस्वी चाचणीनंतर अन्य चार रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यात येत आहे. या रुग्णांचा चाचणी अहवाल लवकर येईल. त्यानंतर हळूहळू प्लाझ्मा थेरपी प्रयोग वाढवला जाईल, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. मोहन जोशी यांनी सांगितले.
मुंबईत ९ जूनपर्यंत ५० हजार ८७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यातील १,७५८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर २२, ९४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या औषधोपचारामुळे अनेक अत्यवस्थ रुग्णांची प्रकृतीही सुधारते आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पालिका सर्व प्रकारची काळजी घेत आहे. मात्र याला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. नायर रुग्णालयात दोन रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी यशस्वी झाली असून अन्य चार रुग्णांवर चाचणी सुरु असल्याचे ते म्हणाले.
कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात येते. २८ दिवसांनतर त्या कोरोनाबाधित रुग्णाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या गाईडलाइनुसार ही चाचणी करण्यात येते. नायर रुग्णालयात त्या दोन रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी यशस्वी झाल्याने पुढेही अन्य कोरोना बाधित रुग्णांवर चाचणी करण्यात येत असल्याचे जोशी यांनी सांगितले.